Agripedia

वर्षानुवर्षे जमिनीत घेत असलेल्या पिकांमुळे आणि अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या नवीन वाणांमुळे जमिनीतील सर्वत्र अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विविध एकात्मिक खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे.

Updated on 15 October, 2020 12:34 PM IST


वर्षानुवर्षे जमिनीत घेत असलेल्या पिकांमुळे आणि अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या नवीन वाणांमुळे जमिनीतील सर्वत्र अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विविध एकात्मिक खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे.

सेंद्रिय खते : वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषापासून सेंद्रिय खते मिळतात. या खतांचे प्रमुख दोन प्रकार आहेत.

१. भरखते : यामध्ये पोषणद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याने भरखते रासायनिक खतापेक्षा मोठ्या प्रमाणात वापरावी लागतात. तसेच ही खते पिकांना सावकाशपणे लागू पडतात. भरखते वापरल्याने जमिनीच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा होते. त्यामुळे जमिनीचा पोत सूधारतो. जलधारणशक्ती वाढते व रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होते.

२. जोरखते : यात पोषणद्रव्यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ही खते कमी प्रमाणात द्यावी लागतात. उदा. सर्व प्रकारच्या पेंडी, हाडांचा चूरा, मासळी खत इत्यादी.

सेंद्रिय खतातील प्रमुख अन्नद्रव्यांचे प्रमाण

अनु.क्र.

  खताचे नाव

 अन्नद्रव्यांचे प्रमाण ( टक्के )

 

 

    नत्र

  स्फुरद

 पालाश

१.

कंपोस्ट

०.८०

०.६५

२.

लेंडी खत

०.६०

०.५०

०.७०

कोंबडी खत

३.०३

२.६३

१.४

४.

शेणखत

०.५६

०.३५

०.७८

५.

सोनखत

१.३०

१.१

०.३५

६.

भुईमुग पेंड

७.१०

१.४०

१.३०

७.

सरकी पेंड

६.४०

२.८०

२.५०

८.

एरंडी पेंड

४.५०

१.७०

०.७०

९.

लिंबोडी पेंड

१.५०

१०.

करंज पेंड

३.९०

०.९०

१.२०

११.

करडई पेंड

४.९०

१.४०

१.२०

१२.

हाड्चुरा

३.५०

२१.५०

१३.

मासळी खत

४.१०

०.९०

०.३०

 सेंद्रिय खतांची गुणवत्ता ठरविणारी प्रमाणके

अ.क्र.

 सेंद्रीय खतातील  घटक

    प्रमाण

१.

सेंद्रीय खतांचा रंग

भुरकट काळा तपकिरी

२.

वास

मातकट

३.

कणांचा आकार

५ ते १० मि.मि.

४.

सामू

६.५ ते ७.५

५.

कर्ब/ नत्र प्रमाण

२० पेक्षा कमी व १० पेक्षा जास्त

६.

जलधारण क्षमता

३० टक्के पेक्षा जास्त

७.

एकूण क्षारांचे प्रमाण

२.५ डेसी सायमन प्रति.मि. 

८.

जिवाणूंचे प्रमाण

 

अ.

जीवाणू

१० ते १०९

ब.

अँक्टीनोमायसिटीज(संख्या प्रति ग्राम)

१०५ ते १०८

क.

बुरशी (संख्या प्रति ग्राम)

१०४ ते १०६

 

एक टन शेखतापासुन मिळणारी अन्नद्रव्ये 

कोबाल्ट १ ग्रॅम , नत्र ५.६ किलो, स्फुरद ३.५ किलो, पालाश ७.८ किलो, गंधक १ किलो, मंगल, जस्त ९६ ग्रॅम, तांबे १५.६ ग्रॅम, बोरॅन २० ग्रॅम, मॉलीब्डेनम २.३ ग्रॅम

मातीची सुपिकता सुधारण्यासाठी सेंद्रिय खते

सेंद्रिय खते वापरायची फायदे :-

१. जमिनीची रचना व पोत सुधारते.

२. जमिनीचा कस व जलधारण शक्तीवाढून अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो.

३. जमीन भुसभुशित होते व त्यामुळे हवा खेळती राहते.

४. जमिनीत उपयुक्त सुक्ष्म जिवाणूंची वाढ होते.

५. जमिनीत आवश्यक अन्नद्रव्ये संतुलित मात्रेत राहते.

६. नैसर्गिक स्वरूपात अन्न मिळाल्याने पिकांचे जोम वाढते.

कंपोस्ट खत

झाडांचा पालापाचोळा, गोठयातील काडीकचरा, मलमूत्र,  बाजारातील टाकाऊ अवशेष, शेतातील तण, पिकांचे ढसकटे, भुसा, पाने, पेंडा, कोंडा, गवत इत्यादीचे टाकाऊ  सेंद्रिय पदार्थांचा वापर करून कुजवून तयार खताला कंपोस्ट खत म्हणतात.

कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धती

१ ) खड्डा पद्धतः

१. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वर उल्लेख केलेले टाकाऊ पदार्थ एकत्र करावे.

२. सेंद्रिय पदार्थ आकाराने मोठे असल्यास त्यांचे लहान-लहान तुकडे करावे.

३. कंपोस्ट खड्डा शक्यतो उंच जागी असावा. खड्ड्याची खोली ३ फूट, रूंदी ६ फूट आणि लांबी आवश्यकतेनुसार ठेवावी. खड्ड्याचा तळ व बाजू ठोकून टणक करावी.

४. खताकरिता वापरावयाच्या सेंद्रिय पदार्थात दगड, विटाचे तुकडे, काचे, खिळे, लोखंडी पट्ट्या, प्लॉस्टिकच्या पिशव्या किंवा तुकडे यासारखे पदार्थ असल्यास वेचून बाजूला काढावे.

५. खड्डा भरतांना प्रथम वित भर जाळीचा ( ६ ते ८ इंच ) बारीक केलेल्या पदार्थाचा आणि त्यावर शेणकाल्याचा ( एक भाग शेण व पाच भाग पाणी ) थर द्यावा, असे आलटून-पालटून थर रचून खड्डा भरावा.

६. शेण काल्यामध्ये प्रति टन सेंद्रिय पदार्थास अर्धा किलोग्रॅम या प्रमाणात कंपोस्ट जिवाणू मिसळावे.

७. खड्डा भरतांना जनावरांचे मूत्र आणि पाणी यांचे मिश्रण करून शेण व कचरा यांच्या प्रत्येक थरावर शिंपडावे.

८. जनावरांचे मूत्र व अर्धा किलो युरिया किंवा एक किलो अमोनियम सल्फेट तसेच सेंद्रिय पदार्थाचा शेकडा टक्के प्रमाणात चुना या सर्व वस्तू सेंद्रिय पदार्थाच्या थरावर पसरुन टाकाव्या.

९. याबरोबर जूने कुजलेले शेणखत वापरल्यास खत कुजण्यास मदत होते.

१०. अशाप्रकारे आलटून पालटून थरावर थर देऊन जमिनीवर साधारण एक ते दीड फूट उंच गेल्यावर खड्डा भरणे बंद करावे.

 ११. नंतर तो ओल्या मातीने सर्व बाजूने लिपावा. या पद्धतीने चार ते पाच महिन्यात कंपोस्ट खत तयार होते. खाण्यातील थर एक महिन्यानी व दोन महिन्यांनी खाली वर केल्यास कुजण्याच्या क्रियेस मदत होते. खड्डा भरतांना एकाच वेळेस भरु नये, तर जसजसे सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होत जाते तसतसे थर देत जावे.

 


२ ) ढीग पद्धत:
कंपोस्ट खड्डा भरतांना जसे सेंद्रिय पदार्थांचे पाणी, मलमूत्र व शेण यांचे आलटून-पालटून थर देतात. त्याच पद्धतीने साधारणत: ९ फूट लांब , ६ फूट रूंद असा विग ४ ते साडेचार फूट उंच रचावा. प्रत्येक थर पायाने दाबावे.  ढीग पद्धतीने पाण्याचा निचरा लवकर होत असल्याने खहम पद्धतीपेक्षा पाणी थोडे जास्त वापरावे लागते. नंतर एक महिना अंतराने ढीग ३ ते ४ वेळा थर खाली-वर करावा. त्यामुळे कुजण्याची क्रिया जलद होते.

३ ) नाडेप पद्धत : या पद्धतीमध्ये विटा, माती आणि सिमेंट वापरून १२ फूट लांब, ५ फूट रूंद व ३ फूट खोल या आकाराचे टाके तयार करतात. आणि त्याची भिंत ९ इंच जाडीची असते . हे टाके तयार करत असतांना चारही भिंतीना विटाच्या रुंदीच्या आकाराची छिद्रे ठेवली जातात. जेणेकरून भरपूर हवा मिळू शकेल.

नाडेप कंपोस्ट तयार करण्यासाठी साधन सामुग्री : शेतातील टाकाऊ पदार्थ - १४०० ते १५०० किलो गाईचे शेण - ९० ते १०० किलो, शेतातील कोरडी गाळलेली माती - १७५० किलो, पाणी -१५०० ते २००० लिटर.

टाके भरणे : पहिला थर :- शेतातील टाकाऊ पदार्थ, पिकांचे अवशेष यांचा ६ इंच जाडीचा थर होईपर्यंत पसरवणे. यात ३ ते ४ टक्के कडूनिंब व पळसाचे पाने वापरल्यास चांगले.

दुसरा थर:- यामध्ये ४ किलो शेणखत अधिक १५० लिटर पाणी यांचे मिश्रण करून सारख्या प्रमाणात शिंपडावे.

तिसरा थर :- शेतातील कोरडी गाळलेली माती ५० ते ६० किलोसारख्या प्रमाणात पसरावीत आणि पाणी शिंपडावे. अशाप्रकारे तीन थराचा एक थर समजून एका थरानंतर दुसरा थर देऊन टाके अशा रितीने भरावे. यात एकूण बारा थर लागतात, अशाप्रकारे ९० ते १२० दिवसानंतर नाडेप कंपोस्ट तयार होते.


गांडूळ खत

टाकाऊ सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी गांडूळांचा उपयोग केला जातो. गांडूळ सेंद्रिय पदार्थाचे तुकडे गिळून चर्षन व पचन करून कणीदार कातीच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकतात. या खतात गांडूळांची लहान पिल्लेच अंडकोष असतात.

गांडूळांची पैदासः

गांडूळांची मोठ्या प्रमाणावर पैदास करण्यासाठी १ मीटर लांब आणि  १ मीटर रुंद व ३० सें.मी उंचीच्या टाक्या अथवा प्लॉस्टिकच्या टबचा वापर करावा. टाक्याच्या तळाशी ३ सें.मी. जाडीचा सावकाश कुजणारा सेंद्रिय पदार्थाचा ( लाकडाचा भुसा , तुस अथवा पाचट ) थर रचावा. त्यावर ३ सें.मी. जाडीचा कुजलेला शेण खताचा अथवा शेणखत + बागेतील मातीचा मिश्रणाचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढ झालेले गांडूळे सोडावे त्यावर गांडूळाच्या खाद्याचा १५ सें.मी. जाडीचा थर पसरवावा. या खाद्यामध्ये १० भाग कुजलेले शेण, एक भाग गव्हाचा कोंडा,  एक भाग हरभऱ्याच्या सालीचा कोंडा व एक भाग भाजीपाल्याचा अवशेष अथवा कुजलेल्या पालापाचोळा यांचे मिश्रण असावे. या थराव पाणी शिंपडून ओले बारदान अंथरावे. सूर्यप्रकाश आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी टाके सावलीत तयार करावे. उंदीर , घूस, मुंग्या, बेडूक यापासून गांडूळांचे संरक्षण करावे. ८ ते १० दिवसानंतर पृष्टभागावर लहान ढिगाच्या स्वरूपात गांडूळांची कणीदार कात दिसून येईल. ही कात वेगळी करून खत म्हणून वापरतात. खाद्य जसजसे कमी होत जाईल, तसतसे वरच्या थरावर खाद्य घालत जावे. साधारणत: आयसेनिया फेटिडा आणि युडीलस युजिनी या जातीच्या एका जोडीपासून ३ महिन्यानंतर ६० गांडूळांची निर्मिती होते. या गांडूळांचा वापर सेंद्रिय खत निर्मितीसाठी करावा.

गांडूळ खत तयार करण्यासाठी ढीग पद्धत:-

साधारण अडीच ते तीन मीटर लांबीचे व ९० से.मी. रुंदीचे पदार्थाचे ढीग तयार करावे. प्रथम जमिनीवर पाणी शिंपडून जमिन ओली करावी. ढिगाच्या तळाशी भुसा, गवत,  भाताचे नूस यासारख्या स्वयकर न कुजणाऱ्या पदार्थाचा ३ ते ५ सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर पुरेसे पाणी शिंपडावे. या धराधर ३ ते ५ सें.मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या मातीचा थर रचावा. या थराचा उपयोग गांडूळांना तात्पुरते निवास स्थान म्हणून होते. साधारण १०० किलोग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून खत तयार करण्यासाठी त्यावर ७ हजार प्रौढ गांडूळे सोडणे गरजेचे आहे. दुसऱ्या थरावर पिकाचे अवशेष, जनावरांचे मालमूत्र, धान्यांचा कोंडा, तण,  गिरीपुष्प, शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने,  कोंबडयांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा.

या सेंद्रिय पदार्थाचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजविलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले ठरते. त्यातील कर्ड नत्राचे गुणोत्तर ३० ते ४० च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची ६० सें.मी.पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमध्ये ४० ते ५० टक्के पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देउन झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थाचे तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असे पाहावे. गांडूळ खत दोन ते अडीच महिन्यात तयार होते. गांडूळ खत तयार झाल्यावर त्याचा शंखु सारखा ढिग करावा. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेले गांडूळे, गांडूळाचे पिल्ले आणि अंडकोष यांचा पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा.

गांडूळ पाणी ( व्हर्मीवॉश ) :

गांडूळ कल्चरमधून झिरपलेल्या पाण्याला व्हर्मीवॉश म्हणतात. यात अन्नद्रव्ये व पिकवर्धक असतात, यामुळे याचा वापर फवारणीसाठी केला जातो. त्यामुळे पिकांची वाढ झपाट्याने होते आणि उत्पादन देखील वाढत असते.

गांडूळ पाणी तयार करण्याची पद्धत :

गांडूळ पाणी तयार करण्यासाठी १ उभट ६० लिटर आकारमानाचे प्लॉस्टिक अथवा पत्राचे पिंप घ्यावे. त्याच्या तळाशी एका बाजूला प्लॉस्टिकचा नळ लावा. उभट भाडयांच्या तळाशी विटाच्या तुकड्यांचा १५ सें.मी. उंचीचा थर रचावा. त्यावर ५ सें.मी. जाडीचा वाळूचा थर रचावा. त्यावर एक जाळी ठेवावी. या थराचा उपयोग गांडूळ पाणी गाळून घेण्यासाठी होतो. या घरावर ३० सें.मी. जाडीचा १५ ते २० दिवस अंशता कुजलेल्या शेणाचा थर रचावा त्यावर पाणी शिंपडून हा घर ओला करावा. या थरामध्ये ५०० पूर्ण वाढ झालेली गांडूळे सोडावी. कुजलेल्या शेणाचा थरावर ३० सें.मी. जाडीचा भाजीपाल्याच्या अवशेषांचा थर रचावा. या थरावर त्यांच्या वजनाच्या ५० टक्के पाणी शिंपडून पुरेसा ओलावा ठेवावा.

दर दोन दिवसाच्या अंतराने पुरेसे पाणी शिंपडून गांडूळांचे खाद्यान्न हे सतत ओले ठेवावे. दोन महिन्यानंतर भांडयातील सर्व सेंद्रिय पदार्थ कुजल्याचे आढळून येईल. गांडूळांच्या खाद्यान्नाचा थर कमी झाल्यास नविन खाद्यान्न भांडयात घालावे. भांडे भरल्यापासून २ महिन्यानंतर १५ दिवसाच्या अंतराने सेंद्रिय पदार्थावर फवारणी करावी. ही फवारणी तीनवेळा करावी. फवारलेले हे पाणी सेंद्रिय पदार्थाच्या सर्व थरातून व गांडूळाच्या शरीरातून पाझरून बाजूच्या थरातून गाळून भांडयाच्या तळाशी साचेल. भांडयाच्या तळाशी सुमारे २४ तास साचलेले हे पाणी नंतर नळाद्वारे गोळा करावे. यालाच गांडूळ पाणी असे म्हणतात.

 गांडूळ पाणी वापरण्याची पद्धत :

पीक फूल व फळांवर आल्यावर १० दिवसाच्या अंतराने २ फवारण्या कराव्यात. १०० लिटर पाण्यात ५ लिटर व्हीयांश ( ५ टक्के ) टाकून फवारणी करावी.

 


हिरवळीची खते

 हिरवळीच्या खतासाठी ताग, शेवरी, चवळी, गवार ही पिके घ्यावीत व ती पेरणीनंतर एक ते दीड महिन्यांची जमिनीत गाडावीत. गिरीपुष्प व सू-बाभूळ यांचा पाला सुद्धा हिरवळीच्या खतासाठी वापरावा. हिरवळीच्या खतापासून हेक्टरी ६०-९ ० किलो नत्र मिळते. जिरायत | कोरडवाहू क्षेत्रात ५ टन हेक्टर आणि बागायत क्षेत्रात १० टन / हेक्टर सेंद्रिय खते द्यावीत.

हिरवळीच्या खतांची विशेषता : १. लागवडीस सोपे व हवेतील नत्र स्थिर करतात.

२. कमी कालावधीत जास्तीत जास्त जैविक भार उत्पादित होतो. ( बायोमास )

३. सहज सडतात व मातीत मिसळतात.

४. प्रभावीपणे तणांचा बंदोबस्त करतात.

५.मुख्य पिकांशी स्पर्धा करत नाहीत.

६. मुळ खोलवर जातात व मातीची धूप थांबवितात.

७. जनावरांना चांगले खाद्य मिळते.

हिरवळीच्या खतांचे प्रकार :

१. हिरवळीच्या खतांचे पीक शेतात वाळवून फुलोरा येण्यापूर्वी ते जमिनीत गाडणे. उदा . : - ताग / बोरू ,  चवळी, गवार,  कुलथी , बरसीम, घेवडा, मसूर,  मूग, उडीद इत्यादी.

२. हिरवळीच्या खतांचे पीक शेताबाहेर बांधावर किंवा पडीत जमिनीवर वाढवून त्याच्या कोवळ्या फांद्या व पाने शेतात आणून जमिनीत मिसळणे / गाडणे. उदा.  - गिरीपुष्प,  सु-बाभूळ, शेवरी, कडुनिम, करंज इत्यादी.

जीवाणू खते

प्रयोगशाळेत नत्र स्थिर करणाऱ्या जमिनीतील स्फूरद विरघळविणाऱ्या व सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या कार्यक्षम जिवाणूंची स्वतंत्ररित्या वाढ करून योग्य अशा वाहकता मिसळून होणाऱ्या मिश्रणाला जिवाणू खत असे म्हणतात .

नत्र स्थिरीकरण करणारी जिवाणू खते

अ ) अॅझोटोबॅक्टर : हे जिवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळांभोवती राहून असहजीवी पद्धतीने कार्य करीत असतात. ते हवेतील मुक्त नत्र शोषून घेतात व पिकांना उपलब्ध करून देतात. हे जिवाणू खत शेगंवर्गीय पिके वगळून इतर सर्व एकदल , तृणधान्य पिकांना उपयोगी पडतात.  उदा. ज्वारी, बाजरी,  ऊस, गहू,  मका,  कापूस, सुर्यफूल,  मिरची,  वांगी,  डाळिंब, पेरू, आंबा इत्यादि.

ब ) अॅझोस्पिरिलम : हे जिवाणू तृणधान्य व भाजीपाला पिकांच्या मुळांमध्ये व मुळांभोवती राहून नत्र स्थिर करण्याचे कार्य करतात. ज्वारी आणि मका पिकांसाठी उपयुक्त.

क ) रायझोबियम : या जीवाणूंचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते. हे जिवाणू शेंगवर्गीय पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. हवेतील नत्रवायू शोषून घेऊन मुळांवाटे पिकास उपलब्ध करून देतात. रायझोबियम जिवाणू खत सर्व शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही. त्यामध्ये वेगवेगळे सात गट आहेत. वेगवेगळया गटातील पिकांना विशिष्ट प्रकाराच्या रायझोबियम गटाचे जिवाणू खत वापरावे.

ड ) अँसिटोबॅक्टर : ऊस व इतर शर्करायुक्त पिकांमध्ये मुळांद्वारे हे जिवाणू प्रवेश करून नत्राचे स्थिरीकरण करतात. हे जिवाणू आंतरप्रवाही असल्याने स्थिर केलेल्या नत्राच्या वाढीमध्ये सर्वाधिक वापर होऊ शकतो. ऊस पिकास ४० ते ५० टक्के नत्राचा पुरवठा करतात.

स्फुरद विरघळविणारे खते : अविद्राव्य स्थिररूपी स्फुरदांचे द्राव्य रासायनिक स्वरूपात रूपांतर करून ते पिकांना उपलब्ध करून देतात. यामुळे रासायनिक स्फुरदयुक्त खताचा वापर द्राव्य स्वरूपात पिकाची वाढ योग्य कालावधीत होणे शक्य होते.

 


जिवाणू खते वापरण्याच्या पद्धती :

१ ) बियाण्यांवर प्रक्रिया :

पाकिटातील जिवाणू संवर्धक पुरेशा पाण्यामध्ये मिसळून बियाण्याला हळूवारपणे अशा पद्धतीने लावावे.  सर्व बियाणांवर सारख्या प्रमाणात लेप बसेल व बियांचा पृष्ठभाग खराब होणार नाही. किंवा बियाणे ओलसर करून घेवून जिवाणू संवर्धन सारख्या प्रमाणात लावावे. जिवाणू संवर्धक लावलेले बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे आणि ताबडतोब २४ तासाच्या आत पेरणी करावी. याशिवाय रोपांच्या मुळांवर जिवाणू खताचे अंतरक्षीकरण, उसाच्या कांडयावर किंवा बटाटयाच्या वेण्यांवर तसेच शेतात मातीत मिसळूनही जिवाणू खतांचा वापर करता येतो.

२ ) रोपांच्या मुळावर जिवाणू खतांचे अंतरक्षीकरण :

या पद्धतीचा वापर पुर्नलागवण करता येणाऱ्या सर्वच पिकांसाठी केला जातो. यामध्ये दोन पाकीटातील ५०० ग्रॅम जिवाणू संवर्धक ४० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करतात. आणि तयार द्रावणात रोपांची मुळे ५ ते १० मिनीट बुडवून ठेवावे. त्यानंतर रोप पुर्नलागवडीसाठी वापरावे.

३ ) मुख्य शेतात वापर :

यात चार पाकीटातील जिवाणू संवर्धक २० किलो सुकलेल्या शेणखतासोबत मिसळून एक एकरासाठी वापरावे. हे मिश्रण रोप किंवा बियाणास लागवडीच्या अगोदर वापरावे .

  • रायझोबियम : सर्व शेंगवर्गीय पिकांचाबियाणासोबत वापरावे.
  • अॅझोटोबॅक्टर / असिटोबॅक्टर / स्फुरद विरघळणारे जिवाण : या जिवाणू खतांचा वापर बियाण्यास , रोपांवर आणि जमिनीवर करता येतो.
  • जैविक खतांचे संयुक्तवापर : स्फुरद विरघळविणारे जिवाण, अझोस्पिरिलम, रायझोबियम सोबत मिसळून वापर करता येतं. पण यासाठी सर्वांचे प्रमाण सारखे असावे.

लेखक - 

   आशुतोष सुरेंद्र चिंचोळकर (९१४६९६६२२२)

   (कृषिमित्र ,यवतमाळ)

English Summary: Methods of preparation of organic manure and quantity of nutrients
Published on: 15 October 2020, 12:33 IST