Agripedia

पेरणीनंतर ४५ ते ६० दिवसामध्ये कपाशी पीक असून, बहुतांश ठिकाणी पाते आणि फुले धरण्याच्या अवस्थेमध्ये पीक आहे.

Updated on 12 July, 2022 10:52 AM IST

पेरणीनंतर ४५ ते ६० दिवसामध्ये कपाशी पीक असून, बहुतांश ठिकाणी पाते आणि फुले धरण्याच्या अवस्थेमध्ये पीक आहे. यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणात पडत असला तरी त्याचे वितरण अनियमित आहे. ज्या ठिकाणी पाऊस भरपूर आहे, तिथे कपाशीच्या झाडांची वाढ जोमात झालेली दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या संततधार पावसामुळे बऱ्याच शेतांमध्ये पावसाचे पाणी साठलेले आढळून येत आहे. सतत पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण, पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न होणारी जमीन अशा कारणांमुळे जमिनीत पाणी फार काळ साचून राहते. अशा ठिकाणी काही प्रमाणात झाडे पिवळी व मलूल पडून आकस्मिक मर रोगांची लक्षणे दिसून येत आहेत.

आकस्मिक मर रोगाच्या (पॅराविल्ट) प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक अनेक रोगकारक घटकांमुळे दिसून येणाऱ्या मर रोगाच्या तुलनेत आकस्मिक मर रोग हा तुरळक प्रमाणात दिसतो. रोगाचे प्रमाण आणि त्यामुळे उत्पादनावर होणारे नेमका परिणाम मोजणे अवघड ठरते.शास्त्रीयदृष्ट्या सखोल अभ्यासाअंती या विकृतीसाठी कुठलीही रोगकारक बुरशी, जिवाणू, विषाणू किंवा सूत्रकृमी कारणीभूत नसल्याचे दिसून आले आहे.या आकस्मिक मर रोगासाठी बी टी कपाशीसह अनेक संकरित वाण हे देशी कपाशी वाणांच्या तुलनेत अधिक संवेदनशील असल्याचे आढळले आहेत.आकस्मिक मर रोगाची कारणेझाडाकडून पोषण अन्नद्रव्यांची आणि पाण्याची अधिक आवश्यकता असणे.

दीर्घकाळ उच्च तापमान व सूर्यप्रकाशासह पाण्याचा ताण, त्यानंतर अतिवृष्टी किंवा सिंचनाद्वारे शेतात अधिक पाणी दिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.भारी आणि खोल जमिनीत पाणी साचत असल्याने त्या जमिनी या रोगास पोषक ठरतात. चांगला निचरा होणाऱ्या जमिनीच्या तुलनेमध्ये पाणी साचलेल्या जमिनीत रोगाचे प्रमाण जास्त आढळते.लक्षणेआकस्मिक मर (पॅराविल्ट) हा रोग एकतर हळू किंवा जलद गतीने विकसित होऊ शकतो.रोगाचे प्रमाण झाडांची अधिक वाढ किंवा पात्या, फुले आणि बोंडाचे प्रमाण अधिक झाल्यास वाढलेले दिसून येते.प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या हिरव्या पानांवर मर रोगाची लक्षणे दिसतात. ती पाने पिवळसर व तांबूस किंवा लाल होऊन सुकतात.अकाली पानगळ, पाते व बोंडगळ सुद्धा होऊ शकते.पानांच्या वाढलेल्या श्वसनामुळे पाने मलूल पडतात.अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते.

रोगग्रस्त झाडात अँथोसायनिन (जांभळा-लाल) रंगद्रव्याचा विकास झाल्याचे दिसून येऊ शकते.एकात्मिक व्यवस्थापन ःशेतात पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अतिशय महत्त्वाचे आहे.प्रदीर्घ काळ कमी पाण्याचा ताण पडू देऊ नये. झाडाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेत सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास सिंचन करावे.भारी जमिनीत शेणखताचा आणि रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा.प्रादुर्भावाची लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी आळवणी करावी. (प्रमाण प्रति लिटर पाणी) कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लू.पी.) २.५ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम (ॲग्रेस्को शिफारस) किंवा कार्बेन्डाझिम (५०% डब्लू.पी.) २ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम. (लेबल क्लेम).

 

डॉ. शैलेश गावंडे, ९४०१९९३६८५ (वनस्पती रोगशास्त्र, पीक संरक्षण विभाग, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.)

English Summary: Measures for control of sudden death in cotton
Published on: 12 July 2022, 10:52 IST