पिकाच्या वाढीच्या सर्वच अवस्थांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि लक्षणे दिसून येतात. हळदीसारखी पिवळ्या रंगाची लक्षणे झाडाच्या सर्व भागांवर- पाने, फुले, फळे, शेंडे यांवर दिसून येतात म्हणून या रोगास 'हळद्या' नावाने ओळखले जाते. रोगग्रस्त पानांच्या शिरा अगदी गर्द पिवळ्या रंगाच्या होतात. पान सूर्यप्रकाशाच्या दिशेने पकडल्यास पानामध्ये शिरांची सर्व आळी पिवळीधमक झालेली दिसते. रोगग्रस्त झाडे उंचीने बुटकी, खुजी राहतात. पानांचा आकार लहान होतो. दोन पेर्यांतील अंतर कमी होते. फुले-फळे पांढरट-पिवळी होतात. फुले आकाराने छोटी होतात. मुळांची प्रतवारी आकर्षकपणा कमी होतो.
विषाणू - या रोगकारक विषाणूचे नाव ‘ओक्रा यलो व्हेन मोझॅक व्हायरस’ असे आहे.या विषाणूंचा प्रसार रोगट झाडांपासून निरोगी झाडांकडे रसशोषणाच्या पांढरी माशी या किडीमुळे होतो. कोणत्याही विषाणूचे वैशिष्ट्य असे, की एकदा बाधित झालेले झाड लवकर मरतही नाही आणि त्या बाधित झाडाची निकोप वाढही होत नाही. झाड लावकर मरू देत नाही. कारण हे बाधित झाड लवकर मेले तर यामधील विषाणू मेलेल्या झाडामध्ये जगू शकत नाहीत. रोगाचा भरपूर प्रसार व्हावा यासाठी अशी झाडे खुज्या रूपात शेतात भरपूर काळ टिकतात.
उपाययोजना - 1) रोगाचा प्रसार थांबवणे हे महत्त्वाचे. यासाठी रोगग्रस्त झाडे सुरुवातीलाच उपटून शेताबाहेर जमिनीत गाडावीत किंवा जाळून नष्ट करावीत.2) रोगाचा प्रसार पांढरी माशी या रस शोषणार्या किडीमार्फत होतो.म्हणूनच या रोगाच्या नियंञणाकरिता पांढरी माशीचे प्रभावी एकात्मिक नियंञण सर्वात महत्त्वाचे.शेतामध्ये पिवळ्या चिकट सापळ्याचा वापर करावा.निंबोळी अर्क (4 टक्के) फवारणीने ही पांढरी माशी नियंत्रित करता येते. आंतरप्रवाही कीडनाशकांच्या फवारणीने पांढरी माशी नियंत्रित करावी. उदा. डायमिथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली किंवा इमिडाक्लोरिड 17.8 टक्के एस. एल. 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून आलटून पालटून फवारावे.
फवारणी सांयकाळच्या वेळी केल्यास अधिक प्रभावी नियंञण होण्यास मदत झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.3) रोगप्रतिकारक जातीची लागवड - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीने प्रसरित केलेल्या ‘फुले विमुक्ता’ व वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणीने प्रसारित केलेल्या 'परभणी क्रांती' या जाती हळद्या या विषाणुजन्य रोग प्रतिबंधक आहेत. या जातींना या रोगाची बाधा होत नाही. फुले विमुक्त जातीचे उत्पादन, फळांची प्रत इतर सर्व जातींपेक्षा सरस आहे. याशिवाय 'अर्का अनामिका' या आयआयएचआर, बैंगलोर प्रसारित जातीचीही लागवड करुन हळद्याचा प्रादुर्भाव टाळता येतो.
-Vinod Dhongade
VDN AGRO TECh
Published on: 13 June 2022, 10:42 IST