उन्हाळ्यात भुईमूगचं पीक घेतलं जातं . जगभरात ८५ देशांमध्ये भुईमुगाची लागवड केली जाते. भुईमुगाच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भुईमुग हे खाद्य तेलाचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पीक समजले जाते. उन्हाळी हंगामात हे पीक ०.८२४ लाख हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते.
महाराष्ट्रात धुळे, जळगाव,नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर व उस्मानाबाद येथे भुईमुग उत्पादन घेतले जाते. दरम्यान उन्हाळी भुईमूग पिकात प्रामुख्याने खालील दोन पतंग वर्गीय किडीचा प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो. आज आपण या लेखात याची माहिती घेणार आहोत....
पाणी पोखरणारी किंवा पाने गुंडाळणारी अळी :
या किडीचा मादी पतंग भुईमुगाचे पानावर खालच्या बाजूस अंडी घालतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी सर्वप्रथम भुईमुगाची पाने पोखरते त्यामुळे भुईमुगाचे पानावर शिराच्या मध्यभागी किंवा टोकावर फोडा सारखा फिकट रंगाचा ठिपका दिसतो. असा ठिपका फोडल्यास त्यात हिरव्या रंगाची लहान अळी दिसते व हीच पाने पोखरणारी अळी होय. जवळपास ८ दिवस ही अळी पानात शिरून पाने पोखरून पिकाचे नुकसान करते. त्यानंतर ही अळी भुईमुगाची जवळची पाने एकत्र करून किंवा एकाच पानाच्या दोन कडा एकत्र करून पानाची गुंडाळी करुन पाने खाते अशी गुंडाळी उघडल्यास आत अळी किंवा तिचा कोश दिसतो.
साधारणत या किडीच्या दोन अळ्या प्रति झाड किंवा झाडाच्या मध्यवर्ती भागात १० टक्के पाने पोखरलेली आढळल्यास या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे, असा त्याचा संकेतार्थ घेऊन योग्य निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची निर्देशीत प्रमाणात फवारणी करावी. क्विनाल्फॉस (Quinalphos) 25% EC 20 मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा Thiamethoxam थाएमेथॉक्सम 12.6% + Lambda Cylahothrin लँबडा सिहॅलोथ्रिन n 9.5% ZC या संयुक्त कीटकनाशकाची 3 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
तंबाखूवरील पाने खाणारी अळी :
शेतकरी बंधूंनो ही बहू भक्षी कीड असून या किडीचा मादी पतंग साधारणता 150 ते 350 अंडी पुंजक्यात घालतो. अंड्यातून बाहेर पडलेल्या आळ्या सुरुवातीला सामूहिकपणे पानातील हरितद्रव्य खातात व त्यामुळे पाणी जाळीदार झालेली आढळतात मोठ्या म्हणजे साधारण तिसऱ्या अवस्थेत ह्या अळ्या विलग होऊन झाडाची पाने खातात शेंगे खातात व फांद्या सुद्धा खातात व तीव्र प्रादुर्भाव आता पानाच्या फक्त शिरा शिल्लक ठेवतात. या किडीची अळी वेगवेगळ्या रंगछटा आढळत असली तरी तिच्या शरीरावर काळे ठिपके पिवळसर तपकिरी रेषा व शरीराच्या दोन्ही बाजूने पांढरे चट्टे आढळून येतात. साधारणता या किडीच्या दोन अळ्या प्रति झाड त्यापेक्षा जास्त अळ्या आढळून आल्यास या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे असा त्याचा संकेतार्थ घेऊन खालील पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची योग्य निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यकतेनुसार फवारणी करावी
Flubendiamide (फ्लुबेन्डायमाइड) 20% WG. 6 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी किंवा Quinalphos (क्किनॉलफॉस) 20% AF 16.67 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करावी. शेतकरी बंधूंनो कीटकनाशके वापरण्यापूर्वी योग्य निदान करून व आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन गरजेनुसारच त्याचा वापर करावा.
Published on: 25 February 2021, 09:13 IST