सध्या पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रासह प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात विकसित होणाऱ्या हिरव्या बोंडातील आतील भाग सडण्याची समस्या आढळून येत आहे.
काही बोंडांवर रसशोषक किडींच्या प्रादुर्भावाची लक्षणे सुद्धा दिसून येतात तर ही बोंडे फोडून पहिल्यानंतर आतील विकसित होणारे कपाशीचे तंतू व बिया मुख्यतः पिवळे ते गुलाबी रंगाचे होऊन सडते.
बोंडे सडण्याची कारणे -
बोंडांच्या बाहेरील बाजूने होणारा प्रादुर्भाव:
ढगाळ वातावरण, सतत पडणारा पाऊस आणि हवामानातील अधिक आर्द्रता असे घटक ह्या प्रकारच्या सडण्याला पोषक असतात. बहुतेक वेळा बोंडावर बुरशीची वाढ झाल्याचे आढळते.
बोंडे आतून सडणे:
पावसाळ्यात होणारा संततधार पाऊस, ढगाळ हवामान, हवेतील अधिक आर्द्रता, कळ्यांवर व बोंडावरील रस शोषणारे लाल ढेकूण यांचा प्रादुर्भाव या घटकांमुळे बोंड आतून सडण्याची समस्या दिसून येते. बोंडाच्या बाह्य भागावर बुरशीची वाढ दिसून येत नाही. अशी बोंडे फोडून पाहिली असता जीवाणूंच्या प्रादुर्भावाने आतील रुई पिवळसर ते गुलाबी-तपकिरी रंगाची किंवा डागाळलेली दिसून येते.
बोंडे सडण्यावर उपाययोजना -
बोंडाना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. यामुळे त्याठिकाणी रोगकारक घटकांची वाढ होणार नाही.
पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत रस शोषणारे लाल ढेकूण या किडीच्या नियंत्रणासाठी योग्य त्या कीटकनाशकाची फवारणी करावी. सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अतिआर्द्रता व रिमझिम पाऊस दीर्घ काळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून बोंड सडण्याच्या विकृती व्यवस्थापनासाठी पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या कालावधीत क्लोरोथॅलोनील (कवच)- ३० ग्राम किंवा प्रोपीनेब (एन्टराकॉल)- ४५ ग्राम किंवा डायफेनकोनॅझोल (स्कोर) १० मिली किंवा सायमोक्सिनिल+मॅंकोझेब (कर्झेट)- ३० ग्राम किंवा कासुगामायसिन +कॉपर ऑक्सिक्लोराईड (कोणिका) - ३० ग्राम किंवा
टेबुकोनाझोल +ट्रायफ्लोक्झिस्ट्रोबीन (नेटीओ) ८ ग्राम किंवा मेटीराम+ पायराक्लॉस्ट्रोबीन (कॅब्रिओटॉप)- २२ ग्राम किंवा अझोस्ट्रोबिन+डायफेनकोनाझोल (अमिस्टर टॉप) ८ मिली प्रति १५ ली पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
संकलन - संजय घानोरकर
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 28 September 2021, 11:35 IST