Agripedia

मका या पिकावर वारंवार लष्करी अळीचा हल्ला होत असतो. या अळीमुळे मक्याचे मोठ्य़ा प्रमाणात होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. २०१५ पर्यंत फक्त अमेरिका खंडात आढळणारी ही अळी लष्करप्रमाणे जोरदार अटॅक करून पिकांचे नुकसान करते.

Updated on 12 July, 2020 10:56 PM IST


मका या पिकावर वारंवार लष्करी अळीचा हल्ला होत असतो. या अळीमुळे मक्याचे मोठ्य़ा प्रमाणात होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. २०१५ पर्यंत फक्त अमेरिका खंडात आढळणारी ही अळी लष्करप्रमाणे जोरदार अटॅक करून पिकांचे नुकसान करते.  या अळीचा पिकावर केला जाणार प्रहार हा एखादा सैनिका प्रमाणे जोरदार असतो यामुळे या अळीला लष्करी अळी असे नाव पडले. आता राज्यातील मका उत्पादकांना लष्करी अळीची चिंता सतावत आहे. मागील वर्षीही या अळीने पिकांचे मोठे नुकसान केले होते. यंदाही या अळीने मका पिकावर आक्रमण केले आहे.

फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) अर्थात स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा ही अमेरिकेतील मका पिकावर उपजीविका करणारी कीड आहे.     भारतात सर्व प्रथम २०१८ मध्ये दक्षिण कर्नाटकात नोंद झाली व  एकाच वर्षात महाराष्ट्रासह इतर राज्यात आढळून आली. या किडीचा पतंग एका रात्रीतून १०० कि.मी. पर्यंत उडत जातो व आयुष्यात २००० कि.मी पर्यंतचा  प्रवास करू शकतो.  तर एक मादी एका वेळेस १०० ते २०० अंडी घालते व एकूण १५०० ते २००० अंडी घालू शकते.  यावरून सदर किडीचा प्रसाराचा अंदाज येऊ शकतो. लष्करी अळीचा बंदोबस्त जेवढे लवकर होईल तितके चांगले नाहीतर संपूर्ण मका पिक हातातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

लष्करी अळी सुरुवातीला पाने खाऊन आपली उपजिविका करते व नंतर मक्याचा कणसात प्रवेश करून संपूर्ण दाणे खाऊन टाकते.  तीस ते ८०  दिवसात जीवनक्रम पूर्ण होत असल्यामुळे एका पिकात ३ ते ४ पिढ्या सहज पूर्ण होतात. त्यामुळे किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाय वापरले तरच शाश्वत नियंत्रण मिळेल.

किडीची ओळख;

जीवनक्रम अंडी, अळी, कोष व पतंग या चार अवस्थांमधून पूर्ण होतो.

मादी पानाच्या वरच्या व खालील बाजूस, पोंग्यामध्ये जवळपास एक हजार अंडी घालते. पुंजक्यामध्ये असलेल्या अंड्यांवर लोकरीसारखे आवरण असते. अंड्यांचा रंग पिवळट सोनेरी व घुमटाच्या आकाराची असतात.

  • अंडी अवस्था २ ते ३ दिवसांची असते.
  • अळी  ही अवस्था सहा अवस्थांमधून पूर्ण होते.
  • अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या अन्नाच्या शोधात विखुरतात.
  • प्रथम अवस्थेतील लहान अळ्या हिरव्या आणि डोके काळ्या रंगाचे असते.
  • दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केल्यानंतर डोके तपकिरी. तिसऱ्या अवस्थेमध्ये रंग तपकिरी तसेच अंगावर वरच्या बाजूने तीन पांढऱ्या रेषा असतात.
  • चौथ्या ते सहाव्या अवस्थेत अळीच्या शरीरावर उंचवट्यासारखे ठिपके असतात.
  • अळी अवस्था १४ ते १९ दिवसांमध्ये पूर्ण होते

कोष

  • पूर्ण वाढ झालेली अळी २ ते ८ सेंटिमीटर जमिनीत जाऊन मातीचे ‘वेस्टन’ करून कोषावस्थेत जाते.
  • कोष लालसर तपकिरी असतो.
  • कोषावस्था ९ ते १२ दिवसांत पूर्ण होते .

पतंग

  • नर पतंग राखाडी ते तपकिरी असतो. पुढील पंखाच्या वरच्या कडेला त्रिकोणी आकारात पांढरा ठिपका व पंखाच्या मध्यभागी गोल ठिपका असतो
  • मादी पतंगाचे पुढचे पंख राखाडीअसते.
  • तर नर आणि मादीमध्ये मागील पंख सोनेरी पांढऱ्या रंगाचे असतात.
  • पतंग अवस्था चार ते सहा दिवसांची असते . लष्करी अळीचा जीवनक्रम ३० ते  ८० दिवसांत पूर्ण होतो.

अळी ओळखण्याची खूण

डोक्याच्या पुढील बाजूस उलट इंग्रजी ‘Y’ आकाराची खूण तसेच शरीराच्या आठव्या ‘बॉडी सेगमेंट’ वर चौकोनी आकारात चार ठिपके. त्यात केसही आढळतात. शरीरावर अन्यत्र अशी ठेवण नसते.

नियंत्रणाबाबत महत्त्वाचे

अळीचे पुढील दोन लक्षणावर आधारित व्यवस्थापन करावे

१. पिकावर वाढणारी लक्षणे अळीची वाढ दर्शवतात.

२. अळीची वाढीची अवस्था कोणते कीटकनाशक निवडावे अथवा नियंत्रणाचे उपाय योजावेत हे ठरवते.

नुकसानीचा प्रकार

  • मका पिकात रोपावस्थेत पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळ्या पाने खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे लांबट चट्टे दिसायला लागतात.
  • लहान रोपांवर अशी लक्षणे दिसल्यास प्रादुर्भाव आहे असे समजावे व नियंत्रणाचे उपाय योजावेत.
  • अळी तिसऱ्या अवस्थेत पोंग्यामध्ये प्रवेश करून पाने खाण्यास सुरवात करते. या अवस्थेत पानांवर छिद्रे दिसतात.
  • पाचव्या अवस्थेत पोंग्यामध्ये राहून पाने खाते. त्यामुळे पानांवर मोठी छिद्रे दिसायला लागतात.
  • सहाव्या अवस्थेत अळी आधाशीपणे पाने खाऊन पोंग्यामध्ये मोठ्या प्रमाणात विष्ठा टाकते. या अवस्थेत मक्‍याची पाने झडल्यासारखी दिसतात.
  • तुरा आणि कणीस भरण्याच्या अवस्थेत आर्थिक नुकसान अधिक असते. अळी कणसात प्रवेश करून दाण्यांवर उपजीविका करते. आणि मधुमकावर जास्त प्रमाणात प्रादुर्भाव बघायला मिळतो.

 

एकात्मिक नियंत्रण

  • पाऊस पडण्याआधी खोल नांगरट. त्यामुळे किडीची कोषावस्था प्रखर सूर्यप्रकाशाच्या तसेच पक्षांच्या संपर्कात येऊन मरून जाते.
  • फेरपालट. मका घेतलेल्या शेतात त्यानंतर भुईमूग अथवा सूर्यफूल घ्यावे.
  • पेरणी पाऊस पडल्यानंतर करावी. उशिरा पेरणी टाळावी.
  • एकाच वेळी पेरणी केल्यामुळे एका प्रदेशातील मका एकाच वेळी वाढतो. किडीला प्रत्येक वाढीच्या अवस्थेतील मका उपलब्ध होत नाही.
  • आंतरपीक घेऊन पिकांची विविधता साधावी. उदा. मका+ तूर, उडीद, मूग
  • मक्याच्या बाजूने नेपिअर गवताची लागवड करावी. त्याचा उपयोग सापळा पीक म्हणून होतो
  • मका पेरणीनंतर लगेच एकरी दहा पक्षिथांबे उभारावेत.
  • पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
  • किडीच्या सर्वेक्षणासाठी पीक उगवून येण्यापूर्वी एकरी पाच कामगंध सापळे लावावेत.
  • नर पतंग पकडण्यासाठी हेक्‍टरी १५ कामगंध सापळे लावावेत.
  • पोंगा व्यवस्थित तयार होईल त्या वेळी माती आणि राख किंवा चुना यांचे ९:१ या प्रमाणात मिश्रण घेऊन त्यात टाकावे. त्यामुळे पोंग्यातील अळ्यांवर परिणाम होतो.
  • मधु मका किंवा बेबी कॉर्नमध्ये १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन पाच मिलि प्रति लिटर पाणी प्रमाणात घेऊन सुरवातीच्या वाढीच्या काळात फवारणी घ्यावी.
  • प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक कीटकनाशक नोमुरिया रिलाई ३ ग्रॅम किंवा मेटॅऱ्हायझियम ॲनीसोप्ली ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर गेल्यास खालील कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. द्रावण पोंग्यात जाईल याची काळजी घ्यावी.

रासायनिक नियंत्रण (प्रतिलिटर पाणी )

अळीच्या वाढीच्या पहिल्या अवस्थांमध्ये कडुनिंबावर आधारित कीटकनाशक (१५०० पीपीएम) ५ मि.लि. किंवा  थायमेथोक्झाम (१२.६ टक्के) + लॅम्बडा सायहेलोथ्रीन (९.५ टक्के झेड सी)  संयुक्त कीटकनाशकाची ०.५ मि.लि. किंवा  प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट (५ एस.जी.) ०.४ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड (४५ एस. सी.) ०.३ मि.लि. किंवा   भाताचा भुसा १० किलो आणि गूळ २ किलो पाण्यात एकत्र करून त्याचे गोळे तयार करावेत. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये थायोडीकार्ब (७५ डब्ल्यू.पी.) १०० ग्रॅम मिसळावे. या मिश्रणाच्या लहान गोळ्या तयार करून मक्याच्या पोंग्यात टाकाव्यात.

लेखक - 

डॉ. बी .एन. भोंडे

सहाय्यक प्राध्यापक कृषी कीटकशास्त्र विभाग विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा आश्रम

 गोपाल सहाणे MSc( Agri)

असलम शेख  MSc (Agri)

English Summary: Maize farmer be aware ! Military larvae give 1500 to 2000 eggs 10 july
Published on: 10 July 2020, 07:25 IST