Agripedia

शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळे अन्नद्रव्यांची वेगवेगळी मदत लोकांना होते.

Updated on 04 May, 2022 7:18 PM IST

शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळे अन्नद्रव्यांची वेगवेगळी मदत लोकांना होते. त्याचबरोबर त्यांची संपूर्ण कार्य आपण आज जाणून घेणार आहोत.

स्फुरदाच्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक - खालील सर्व विविध घटक स्फुरदाच्या उपलब्धतेवर परिणाम करतात. 

1) माती ज्या प्रकारच्या खडकांपासून तयार होते ते खडक, 

2) खडकांची झीज होण्याचे प्रमाण, 

3) त्या भागातील हवामान, 

4) तसेच, त्या भागातील माती वाहून जाण्याचे प्रमाण. 

5) पीक काढणीद्वारे (शोषणाद्वारे) आणि 

6) स्फुरदयुक्त खतांच्या वापराचे प्रमाण. 

या व्यतिरिक्त जमिनीतील रासायनिक घटकही कारणीभूत असतात. ते म्हणजे जमिनीचा सामू व इतर पोषणद्रव्यांचे प्रमाण

1) सामू - जमिनीचा सामू हा स्फुरदाच्या उपलब्धतेवर परिणाम करणारा सगळ्यात मुख्य घटक आहे. कारण चुनखडीयुक्त जमिनीचा सामू हा 8.0च्या जवळ असतो. त्यामुळे चुनायुक्त स्फुरदाची विद्राव्यता ही कमी होते. आम्लधर्मी जमिनीमध्ये स्फुरद हा आयर्न (Fe) किंवा ऍल्युमिनिअम (Al) बरोबर संयुक्त स्वरूपात आढळतो, त्यामुळे स्फुरदाची विद्राव्यता कमी असते. सर्वांत जास्त स्फुरदाची उपलब्धता ही 6.0 ते 7.0 या सामूमध्ये आढळते. ही स्थिती आम्लधर्मी जमिनीत चुन्याचा वापर केल्यास जमिनीचा सामू उदासीन होण्यास मदत होते. या सामूच्या प्रमाणात (6.0 ते 7.0) स्फुरद H2PO4- स्वरूपात पिकांना उपलब्ध होतो व त्यामुळे पिकांना सहज उपलब्ध होतो, तर जमिनीचा सामू 7.0च्या वर असल्यास HPO4- या स्वरूपात स्फुरद पिकांना उपलब्ध होतो.

2) इतर अन्नद्रव्यांचे प्रमाण - संतुलित पोषणतत्त्वांचा वापर पिकांसाठी केल्यास स्फुरदाचे शोषण पिकांद्वारे जास्त होते; तसेच आमोनियमयुक्त नत्र खते स्फुरदयुक्त खतांबरोबर पिकांना दिली असता स्फुरदाचे शोषण पिकांद्वारे जास्त होते; परंतु जर नत्रयुक्त व स्फुरदयुक्त खतांच्या मात्रा जर वेगवेगळ्या स्वरूपात दिल्या, तर स्फुरदाच्या शोषणावर परिणाम होतो. तसेच, गंधकही उदासीन व अल्कधर्मी जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढवण्यास मदत करतो.

3) सेंद्रिय कर्बाचे प्रमाण - जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त असेल, तर त्या जमिनीत सेंद्रिय स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे स्फुरदाची विद्राव्यता ही अशा जमिनीत जास्त असते व पिकांना स्फुरद लवकर व जास्त उपलब्ध होतो. या व्यतिरिक्त सेंद्रिय आणि स्फुरदयुक्त खतांचा एकत्रित वापर केल्यामुळे सेंद्रिय घटकांचे विघटन होत असताना सेंद्रिय आम्ले तयार होतात, त्यामुळे स्फुरदाचे आयर्न व ऍल्युमिनिअमसोबत स्थिरीकरण होत नाही, परिणामी स्फुरदाची पिकांना उपलब्धता जास्त होते.

4) चिकण मातीचे प्रमाण - अति लहान कणांचे प्रमाण ज्या जमिनीत जास्त असते, अशा जमिनीत स्फुरदाचे स्थिरीकरण जास्त होत असते, त्यामुळे चिकन मातीयुक्त जमिनीत स्फुरद स्थिरीकरण क्षमता ही वालुकायुक्त जमिनीपेक्षा जास्त असते, त्यामुळे उपलब्धता कमी होते. तसेच, जास्त पाऊस व तापमान जेथे जास्त असते, अशा ठिकाणच्या जमिनीत केओलिनचे प्रमाण जास्त असल्याकारणाने तेथे स्फुरदाचे स्थिरीकरण जास्त होते. जास्त पाऊस व तापमान हे जमिनीत आयर्न व ऍल्युमिनिअमचे ऑक्‍साईडचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात, त्यामुळे स्फुरदाचे स्थिरीकरण अशा स्थितीमध्ये जास्त होते.

5) स्फुरद मात्रा देण्याची वेळ - जमिनीतील विद्राव्य स्फुरद व मातीचे कण या दोघांमधील संपर्क काळ जितका जास्त असतो, अशा स्थितीमध्ये स्फुरदाचे स्थिरीकरणही वाढत जाते, त्यामुळे हा काळ कमी करण्यासाठी व स्फुरदाचे कार्य वाढवण्यासाठी पेरणीपूर्वीच स्फुरदाची मात्रा द्यावी. ही पद्धत ज्या जमिनीमध्ये स्फुरदाचे स्थिरीकरण क्षमता जास्त असते, त्या जमिनीमध्ये अवलंब करावी. म्हणजे स्फुरदाची विद्राव्यता वाढण्यास मदत होते. तसेच, जास्त स्फुरद स्थिरीकरण क्षमता असणाऱ्या जमिनीत स्फुरदाची पट्टा पद्धत (दोन ओळींमध्ये) वापरली असता अशा जमिनीत स्फुरदाची उपलब्धता पिकांना जास्त होते.

6) जमिनीचे तापमान - जमिनीचे तापमान जास्त असल्यास स्फुरदाचे पिकांद्वारे शोषण जास्त होते. याउलट थंड किंवा कमी तापमानाच्या पिकांद्वारे स्फुरदाचे शोषण कमी होते. या व्यतिरिक्त काही रासायनिक व जैविक क्रियांमुळेही स्फुरदाच्या उपलब्धतेवर परिणाम होतो.

7) जमिनीचा टणकपण (घट्ट होणे) -स्फुरदाचे मातीमध्ये वहन फार कमी प्रमाणात होते, त्यामुळे पिकांच्या मुळांना वाढीसाठी व स्फुरदाच्या शोषणासाठी जमिनीमध्ये नवीन ठिकाण शोधावे लागते. जर जमीन घट्ट बनली (कमी हवा व पाणी), तर पिकांच्या मुळांच्या वाढीवर परिणाम होतो व परिणामी स्फुरदाचे शोषणही कमी होते. तसेच, जमिनीत हवाही खेळती राहत नाही आणि पिकांच्या मुळांना प्राणवायूही कमी मिळतो. प्राणवायू जर पिकांच्या मुळांना व्यवस्थित मिळाला नाही, तर पिकांद्वारे शोषल्या जाणाऱ्या स्फुरद क्षमतेत 50 टक्केपर्यंत घट होते. त्यामुळे जमीन ही भुसभुशीत असणे अत्यंत गरजेचे आहे.

8) पिकांचे अवशेष -पिकांचे अवशेष जमिनीत गाढले गेल्यामुळे त्यामधील स्फुरदाचे शोषण करण्यासाठी / मिळवण्यासाठी (वाढीसाठी) सूक्ष्म जिवाणूंमध्ये स्पर्धा लागते. विघटन प्रक्रिया होत असताना वनस्पती व सूक्ष्म जिवाणूंमध्ये स्फुरद मिळवण्याची स्पर्धा होत असते. या जिवाणूंद्वारे शोषल्या गेलेल्या स्फुरदाची उपलब्धता हळूहळू जमिनीमध्ये होत असते. कारण, ज्या वेळी हे जिवाणू मृत होतात, त्या वेळी त्यांच्या शरीरातील स्फुरद आपोआपच जमिनीत मिसळला जातो व तो पिकांना लवकर उपलब्ध होतो.

9) मायकोरायझा बुरशी -जमिनीमध्ये असणाऱ्या मायकोरायझा बुरशीमुळे स्फुरदाची उपलब्धता पिकांना जास्त होते. कारण, ही बुरशी पिकाच्या मुळांमध्ये प्रवेश करते व सहजीवी पद्धतीद्वारे मातीत वाढत जाते व जमिनीतील स्फुरद शोषण करून पिकाच्या मुळांपर्यंत वहन केले जाते. मायकोरायझा बुरशीचा वापर केल्यास पिकांना उपलब्ध नसलेला स्फुरद उपलब्ध करून देण्यास मदत होते. 

उपाय योजना -

1) जमिनीची मशागत - जमिनीच्या मशागतीमुळे जमिनीचे तापमान, हवा यांचे चक्रीकरण यावर चांगला परिणाम होतो. जमिनीत जर ओली असताना मशागत केली, तर जमीन घट्ट होते, त्यामुळे जमिनीतील उपलब्ध स्फुरदावर परिणाम होतो. म्हणून जमिनीची मशागत योग्य वाफसा झाल्यावरच करावी. 

2) जमिनीचा निचरा - जमिनीत जर पाण्याचा योग्य निचरा होत नसेल, तर स्फुरदाची उपलब्धता पिकांना कमी होते; तसेच हवेच्या कमतरतेमुळे व सतत मुळांजवळ पाणी साठल्याने मुळे कुजून जातात, त्यामुळे जमिनीचा योग्य निचरा होईल याची व्यवस्था करणे अगत्याचे ठरते. 

3) खतांची योग्य मात्रा - स्फुरद खतांबरोबरच इतरही खतांची मात्रा योग्य प्रमाणात द्यावी. कारण खतांच्या असंतुलित वापरामुळे स्फुरदाच्या उपलब्धतेवर परिणाम होतो. उदा. जस्तयुक्त खतांचा जास्त वापर किंवा नत्रयुक्त खतांचा कमी वापर केल्यास पिकांना स्फुरद कमी उपलब्ध होतो, त्यामुळे हे टाळण्यासाठी खतांचा संतुलित वापर करणे फायदेशीर ठरते. 

4) स्फुरदयुक्त खतांची पिकांना मात्रा देण्याची पद्धत - स्फुरदयुक्त खतांचा पिकांना जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी शक्‍यतो पेरणीपूर्वी पूर्ण मात्रा द्यावी; तसेच अशी खते बियांच्या खालच्या बाजूस पाच - सहा सें.मी. पडतील याची काळजी घ्यावी, त्यामुळे स्फुरदाचे पिकांच्या मुळांद्वारे जास्त शोषण होते. मुळांची वाढ खोलवर होते, त्यामुळे माती आणि मुळे यांचा जास्त संबंध येतो. पाणी व अन्नद्रव्ये पिकाच्या मुळांशी धरून ठेवली जातात, तसेच अनहायड्रस अमोनिया व अमोनिअम फॉस्फेट खतांची मात्रा पिकांना एकत्रित रोप अवस्थेत दिल्यास ते जास्त फायदेशीर ठरते. 

5) सेंद्रिय घटकांचा वापर - सेंद्रिय घटक व पिकांचे अवशेष जमिनीत टाकले असता सेंद्रिय घटकांचे विघटन जिवाणूंद्वारे होते. कुजवण क्रियेमुळे सेंद्रिय आम्ल तयार होते, परिणामी अविद्राव्य स्फुरद विद्राव्य होण्यास मदत होते. सेंद्रिय पदार्थ चिकणमातीयुक्त जमिनीत टाकल्यास स्फुरदाचे स्थिरीकरण कमी होण्यास मदत होते आणि पाण्याचा निचराही चांगला होतो. त्यामुळे सेंद्रिय घटकांचा वापर करणे स्फुरदाची उपलब्धता वाढवण्यस फायदेशीर ठरते.

English Summary: Main and importance works of phosphorus you know
Published on: 04 May 2022, 07:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)