राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. तसेच येत्या २४ तासांत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिमी चक्रवातामुळे (Western Disturbances) राज्यात गारठा वाढला आहे. सलग तिसऱ्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यात थंडीची लाट कायम आहे.
गेल्या २४ तासांत अनेक भागांत कमी तापमानाची नोंद करण्यात आली असून उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड इथं थंडीची लाट होती.
या जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भामध्ये देखील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली असून पुढील २४ तासांत कडाक्याच्या थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
तसेच मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांच्या तापमानात कमालीची घट पाहायला मिळाली आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस जाणार आहे. दिवसभर वातावरणात गारवा राहू शकतो, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
'या' १० राज्यांमध्ये थंडी वाढणार : भारतीय हवामान खात्याने येत्या 3-4 दिवसांत 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी थंड लाटेचा इशारा दिला आहे.
पुढील 2 दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, तर पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये पुढील -4 दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Published on: 28 January 2022, 02:16 IST