Agripedia

गोंदिया, १ जुलै २०२५: महाराष्ट्राचे हरितक्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १ जुलै रोजी साजरा होणारा 'महाराष्ट्र कृषी दिन' आज गोंदिया जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र, गोंदिया (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) आणि पंचायत समिती आमगाव व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. .

Updated on 03 July, 2025 7:43 PM IST

गोंदिया, १ जुलै २०२५: महाराष्ट्राचे हरितक्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १ जुलै रोजी साजरा होणारा 'महाराष्ट्र कृषी दिन' आज गोंदिया जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र, गोंदिया (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) आणि पंचायत समिती आमगाव व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आमगाव येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन

आमगाव येथे पंचायत समिती आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती आमगावच्या सभापती श्रीमती योगिताताई पुंडे होत्या. तालुका कृषी अधिकारी आमगाव, श्री. महेंद्र दिहारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती श्रीमती सुनंदा उके, जिल्हा परिषद सदस्य श्री. हनवंत वट्टी आणि श्रीमती छबूताई उके, माजी सभापती श्री. राजेंद्र गौतम, पंचायत समिती सदस्य श्री. तारेंद्र रामटेके, कृषी सहाय्यक श्री. अमित यंगट्टीवार आणि श्रीमती सरिता हरिनखेडे यांची उपस्थिती होती.

प्रगतीशील शेतकऱ्यांचा गौरव

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रगतीशील आणि पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा गौरव. त्यांना शाल, श्रीफळ आणि रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये, तालुका आमगावमधील मौजा घाटेमनी येथील प्रगतीशील बागायतदार श्री. विनोद निळकंठ फुंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ०.४० हेक्टर क्षेत्रावर केळी पिकाची यशस्वीपणे लागवड केली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे क्षेत्रातील इतर शेतकऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळत आहे. श्री. फुंडे यांनी INDIAGRO वर्धाचे कृषी मार्गदर्शक श्री. रोशन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली INDIAGRO पॅटर्नने केळीची लागवड केली असून, त्यांच्या केळी उत्पादनातील या यशस्वी प्रयत्नामुळे आमगाव तालुक्यासह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील केळी उत्पादनाला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी (पंचायत) श्री. के. एम. रहांगडाले यांनी केले, तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी (कृषी) श्री. विलास राठोड यांनी केले.

एकंदरीत, गोंदिया जिल्ह्यातील कृषी दिन कार्यक्रम हा शेतकऱ्यांसाठी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला, ज्यामुळे त्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि यशस्वी प्रयोगांबद्दल सखोल माहिती मिळाली.

श्री. उल्हास पवार, वर्धा

फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण (राष्ट्रीय कृषी मीडिया)

English Summary: Maharashtra Agriculture Day celebrated with enthusiasm in Gondia district; Glory and honor to the farmers who boost banana production in the district!
Published on: 03 July 2025, 07:43 IST