Agripedia

तीन महिन्यांच्या सहवासानंतर गर्ध हिरव्या पानांनी फांद्यांची साथ सोडली.

Updated on 28 June, 2022 8:37 AM IST

तीन महिन्यांच्या सहवासानंतर गर्ध हिरव्या पानांनी फांद्यांची साथ सोडली. आता जमिनीवर फक्त देठ आणि शेंगेचे अस्तित्व दिसून येत होते. शिवाराचा एका तुकड्यावर मात्र पानांनी देठाची साथ अजूनही सोडली नव्हती, परतीचा पाऊस मळणीमध्ये अडथळा निर्माण करू शकेल ह्या शंकेने शेतकऱ्यांने मळणी लवकरात लवकर उरकून घेण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी दहा मजुरांची टोळी घेऊन शेतकरी शिवारात हजर झाला. मजुरांनी सोयाबीनची कापणी करून तिथेच एक ढीग तयार करून ठेवला. आता फक्त उद्या मळणी करून सोयाबीनची विक्री करायच्या नियोजनामध्ये शेतकरी रमुन गेला. त्याच दिवशी सायंकाळी काही मिनिटांमध्ये वातावरणात वेगाने बदल होऊ लागले, वाऱ्याचा वेग वाढू लागला. काही क्षणातच पावसाचा सरी बरसू लागल्या, मुसळधार पावसाने अवकाळी हजेरी लावली आणि बळीराज्याचं तोंडचा घास हिरावून घेतला.सोयाबीन भिजले, काही दाण्यांना बुरशी लागली,कित्येक किलो सोयाबीन जमिनीवर पडून खराब झाले.शेवटी शेतकऱ्यांने कवडीमोलाने आपला शेतमाल व्यापार्यांकडून सुपूर्द केला.पिकाचा नफा तोटा मोजण्याचे धाडस ही शेतकऱ्यांकडून झाले नाही. ही घटना हे फक्त हिमनगावरचे टोक आहे. कारण जस सामान्य शेतकऱ्याचा शेतमाल खराब झाला होता तसा बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचेही नुकसान झाले होते. मागील आठ नऊ महिने बरेच तज्ञ मंडळी ह्या बियाणे समस्ये बद्दल बोलत होते. ह्या बियाणे टंचाईमध्ये काही शेतकऱ्यांची मदद करता यावी म्हणून आम्ही उन्हाळ्यात केडीएस-७२६ फुले संगम ह्या जातीचे बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेतला. 

ह्या वाणाची निवड करण्याचे मुख्य कारण होते त्याची उत्पादन क्षमता. आमचा एका शेतकरी मित्राने सेंद्रिय शेती पध्दतीचा अवलंब केला त्यांना फुले संगम ह्या वाणाचे एकरी १६ क्विंटल उत्पादन आले. सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये इतके चांगले उत्पादन येणार असेल तर ह्या वाणामध्ये आगळी वेगळी ताकत असणार हे निश्चित होते. ह्याची प्रचिती काही दिवसातच दिसून आली आमचा हातून बऱ्याच चुका झाल्या तरीही ह्या वाणाने आम्हाला उन्हाळ्यात १३क्विंटलचा उतारा दिला.आज मी सोयाबीन पिकामध्ये केलेल्या चुकांबद्दल लिहणार आहे.सर्वप्रथम आपण बियाणे निवडते वेळेस त्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणे गरजेचे आहे. आम्ही १०० बियाण्याची मातीमध्ये पेरणी करून त्याचे परीक्षण करतो. त्या बियाण्याचा डोळा किंवा अंकुर सुस्थितीत असावा. त्याची उगवण क्षमता किमान ७०% असावी. उगवणक्षमता चांगली असल्यास त्या बियाण्यावर बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी फक्त रासायनिक बीजप्रक्रियेवर अवलंबून राहू नये. त्यासोबत जैविक बीजप्रक्रियेचा ही वापर करावा. वेळे अभावी आम्ही कोरडी रासायनिक बीजप्रक्रिया केली. त्याचा खास काही फायदा झाला नाही. ह्यावेळेस आम्ही रासायनिक व जैविक बीजप्रक्रियेचा अवलंब केला आहे, त्याचा पुढील एक महिना पीक निरोगी राहण्यास मदद मिळते.

वाण,उगवणक्षमता आणि बिजप्रक्रिये पसच्यात उत्पादन वाढीसाठी मदद करणारा घटक म्हणजे दोन रोपांमधील अंतर उन्हाळी लागवडीसाठी तज्ञांचा सल्ल्यानुसार आम्ही २फूट×९इंच एवढे अंतर ठेवले. अंतर अतिशय योग्य ठरले पण आमच्याकडून एक चूक झाली.आम्ही सर्रास सर्व सरी मधून सोयाबीनची टोकन केली.त्यमुळे झाडांची कायिक वाढ झाल्यावर फवारणी करण्यास अडथळे येऊ लागले. त्यामुळे आम्ही आता ८ सरी टोकन केल्यावर एक सरी मोकळी ठेवतो.त्यामुळे जाते वेळेस उजवीकडील ४ साऱ्यांमध्ये फवारणी करू शकतो व येते वेळेस डाव्या बाजूच्या ४ साऱ्यांमध्ये फवारणी करतो. काही ठिकाणी आम्ही दोन सरी नंतर एक सरी मोकळी ठेऊन बघितली पण आपण फवारणी करतेवेळेस एक आड एक सरी वापरतो, त्यामुळे मधील सरीचा वापर होत नाही.उन्हाळी सोयाबीनसाठी आम्ही रासायनिक खतांचा वापर केलेला नव्हता. हे पीक आम्ही फक्त शेणखताचा जोरावर पिकवले. शेतकऱ्यांनी एक एकर क्षेत्रासाठी किमान दोन डबे शेणखताचा वापर करावा. सेंद्रिय शेतकऱ्यांना दोन डबे शेणखत, जीवामृत आणि जिवाणू खतांचा वापर केल्यास चांगले उत्पादन येते. रासायनिक शेतीचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये खते सरी सोडतेवेळेस टाकायची पद्धत आहे.पण ह्या पद्धतीमध्ये खत १००% पिकाला उपलब्ध होईल ह्याची शाश्वती नसते.ह्या खतांचा वापर तनांकडून आपल्या वाढीसाठीही होऊ शकतो. रासायनिक खतांचा जास्तीजास्त उपयोग हा मुळ पिकाला होणे गरजेचे आहे. ह्या करिता आम्ही रासायनिक खतांचा वापर बियाण्याची उगवणी नंतर १० दिवसानंतर करतो. 

जसे द्राक्ष शेती मध्ये खत दोन वेलीच्या मध्यावर दिला जातो त्याच प्रमाणे रासायनिक खतांचा वापर आम्ही दोन टोकणीचा मध्यावर करतो व त्यावर थोडी माती झाकून घेतो. त्यामुळे रासायनिक खत फक्त सोयाबीन पिकासाठी उपलब्ध होतो. रासायनिक खतांमध्ये आम्ही ४पोती सिंगल सुपर फॉस्फेट,१पोत म्युरेट ऑफ पोटॅश व १०किलो गंधक ह्याचा वापर करतो. दहाव्या दिवशी २पोती सिंगल सुपर फॉस्फेट +५किलो गंधकाचा वापर करतो. चाळीस दिवसानंतर उर्वरित दोन पोती सिंगल सुपर फॉस्फेट व ५किलो गंधक दोन टोकणीचा मध्ये किंवा झाडा जवळ देतो.म्युरेट ऑफ पोटॅश हे विद्राव्य असल्यामुळे ठिबक संचामधून दर आठवड्याला ५किलो ह्या प्रमाणात संपूर्ण पीक कालावधी मध्ये आम्ही ५०किलो वापरतो.ह्या सर्व रासायनिक खतांची उचल होण्याकरिता आम्ही स्फुरद विरघळवणारे जिवाणू पालाश उपलब्ध करणारे जिवाणू,सुष्मअन्नद्रव्य उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंचाही वापर करत असतो. केडीएस-७२६ ह्याची कायिक वाढ खुप जास्ती होत असते त्याची उंची कमी ठेवणे महत्त्वाचे आहे. दोन पानातील अंतर दोन इंचाहून कमी असावं. फुटवा जास्त असावा.चांगले उत्पादन आपल्या तेव्हाच मिळेल ज्यावेळी झाडाला भरपूर शेंगा लगडल्या असतील. जास्ती शेंगेची संख्या म्हणजे जास्ती फुलांची संख्या आवश्यक आहे. फुल हे नेहमी पेर्यात तयार होते. त्यामुळे जेवढे जास्ती पेरे किंवा पानं तेवढी जास्त फुले. त्यामुळे सायटोकायनिंनची निर्मिती झाडाचा मुळीला होणे गरजेचे आहे. सुडोमोनास,बॅसिलस सबटीलिस व जीवामृत मुळे झाडांमध्ये सायटोकायनिंनची निर्मिती चांगली होते. झाडं बुटकी राहून पेर्यातील अंतर कमी राहते.

सोयाबीन १० दिवसांनी आपल्या बाल्यवस्थेत पोहचतो त्यावेळेस त्याच्यावर खोड कीड किंवा अळीचा प्रादुर्भाव होऊ नये ह्यासाठी निंबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्क नावाचा लशींचा वापर करावा. फवारणी मध्ये सिलिकॉन पावडरचा वापर केल्यास झाडांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते. फवारणी न केल्यास विसाव्या दिवशी खोड कीड व अळीचा प्रकोप दिसून येतो. जमिनीमधून बिव्हेरिया मेंटरहायझम ह्या बुरशीचा वापर केल्यास किडीवर प्रादुर्भाव होण्याआधी नियंत्रण ठेवता येते. बहुतांश किडींची सुप्तावस्था ही जमिनीत असते. ज्यावेळी आपण बिव्हेरिया मेटरहायझम ह्या बुरशींचा वापर करतो त्यावेळेस ह्या किडींवर सुप्तावस्थेत नियंत्रण होते.प्रत्येक शेतकरी हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. निसर्ग आपल्याला रोज एक नवीन आव्हान देतो आणि आपण रोज त्याचा सामना करतो. मागील पिकामध्ये केलेल्या चुका भविष्यात होऊ नयेत ह्यासाठी ही अनुभवाची शिदोरी तुमच्यासमोर उघडली. ह्या अनुभवी शिदोरीचा वापर करून शेतकऱ्यांनी योग्य ते बदल आपल्या शेती मध्ये केले तर त्याचा उत्पादन वाढीसाठी फायदा होईल.

 

विवेक पाटील,सांगली

९३२५८९३३१९

English Summary: Look at the soybean crop planning now, it will be beneficial
Published on: 28 June 2022, 08:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)