पट्टापेर पद्धत म्हणजे काय?सोयाबीन, मूग, अथवा उडीद पिकाची प्रचलित पद्धतीने पेरणी करताना त्यामध्ये किंचित बदल अथवा सुधारणा करून, पेरणी करताना ठराविक ओळीनंतर एक ओळ खाली सोडली जाते.त्या ठिकाणी डवऱ्याच्या फेराच्या वेळी जानोळ्याला दोरी गुंडाळून सऱ्या पाडून घेतात, त्यामुळे मूलस्थानी जलसंवर्धन होऊन उत्पादकतेत वाढ होण्यास मदत होते.पट्टापेर पद्धतीचे फायदे- पिकाची सूर्यप्रकाश, जागा, अन्नद्रव्ये, जमिनीतील ओल या बाबींसाठी होणारी स्पर्धा कमी होते.- पिकाची निगराणी, निरीक्षण योग्य प्रकारे करता येते. किडी व रोगांचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येतो.- चांगल्या रीतीने फवारणी होऊ शकते.
- मधील सऱ्यामधून अतिरिक्त पावसाचे पाणी सरीमध्ये उतरते. मूलस्थानी जलसंवर्धन शक्य होते. कमी पावसाच्या स्थितीमध्ये ओल टिकून राहते. सरीमध्ये जमा झालेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्यासाठी वाव राहतो.- मोकळ्या ओळीमुळे शेतात हवा खेळती राहते. पर्यायाने बुरशीजन्य रोगांपासून पिकाचा बचाव होतो.ट्रॅक्टरद्वारे पट्टापेर पद्धत सात दात्याचे पेरणी यंत्र - ट्रॅक्टरचलित सात दात्याच्या यंत्राने पेरणी करताना पट्टापेर पद्धतीचा तीन प्रकारे अवलंबता येतो - सात ओळींचा पट्टा एक ओळ खाली.पाच ओळींचा पट्टा- पेरणीयंत्राच्या दोन्ही बाजूंकडील काठावरील प्रत्येकी एक छिद्र बंद केल्यास पाच ओळींचा पट्टा तयार होईल. प्रत्येकी सहावी ओळ खाली राहील.
तीन ओळींचा पट्ट- पेरणी यंत्राचे मधीच म्हणजेच चौथे छिद्र बंद करावे. म्हणजे पेरणी तीन ओळी - खाली ओळ - तीन ओळी अशी होईल. ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना एक ओळ खाली सुटेल या प्रमाणे जागा सोडावी.सहा ओळींचा पट्टा- ट्रॅक्टरचलित सहा दात्याचे पेरणीयंत्र असल्यास, पेरणी करताना ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना एक ओळ सुटेल असे नियोजन करावे. म्हणजेच शेतात प्रत्येक सातवी ओळ खाली राहील.चार ओळींचा पट्टापेरणी यंत्राच्या काठावरील दोन्ही बाजूचे एक छिद्र बंद करावे. ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना शेवटचे दाते खाली ठेवलेल्या काकरातच ठेवावे.बैलजोडीचलित तिफण, पाभर, काकरी, सरत्याने पेरणी बैलजोडीने पेरणी करताना तीन दाती, चारदाती अथवा पाच दाती काकरी वापरली जाते.
पट्टापेर पद्धतीचे नियोजन - करण्यासाठी तीन दाती काकरी असेल तर चौथी ओळ, चार दाती काकरी असेल तर पाचवी ओळ व पाच दाती काकरी असेल तर सहावी ओळ प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना खाली ठेवावी. म्हणजेच शेतात तीन ओळी, चार ओळी अथवा पाच ओळींमध्ये पट्टापेर पद्धतीचे नियोजन होईल.ट्रॅक्टरचलित अथवा बैलजोडीने अशा प्रकारे पट्टापेर पद्धतीचा अवलंब करताना खाली ठेवलेल्या प्रत्येक ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या फेराच्या वेळी, जानोळ्याला गच्च दारी गुंडाळून दांड, सरी अथवा गाळ पाडून घ्यावा. वरीलप्रमाणे पट्टापेर पद्धतीने पेरलेले सोयाबीनची पीक गादीवाफ्यावर येऊन, प्रत्येक खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या फेराच्या वेळी सऱ्या तयार होतात.महत्त्वाचे- शिफारशीनुसार सलग सोयाबीनसाठी एकरी ३० किलो बियाणे आवश्यक असले तरी आता ओळींची संख्या कमी होणार आहे. प्रत्येकी चौथी ओळ खाली ठेवल्यास पेरणीसाठी २५ टक्के बियाणे कमी होईल. प्रत्येकी पाचवी ओळ खाली ठेवल्यास २० टक्के, प्रत्येक सहाव्या ओळीसाठी १५ टक्के यानुसार बियाण्याचे प्रमाण कमी होईल.
Published on: 30 May 2022, 04:42 IST