घोसाळी या भाजीला पारशी दोडका किंवा गिलके असेही म्हणतात. घोसाळीचा उपयोग भाजीसाठी आणि भज्यांत टाकण्यासाठी करतात. पक्व होऊन वाळलेल्या घोसाळ्याच्या सालीचा उपयोग परदेशात ब्रश तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात करतात.पडवळाचा उपयोग भजी करण्यासाठी करतात. पडवळाच्या भाजीला पावसाळ्यात विशेष मागणी असते.या पिकांखालील क्षेत्र वाढत आहे. बिशेषत: खेड्यांमध्ये घरोघरी कुंपणात परसबागेत या भाज्यांची लागवड करतात.घोसाळी जाती : १) फुले प्राजक्ता : हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने निवड पद्धतीने विकसित केला आहे. लागवडीपासून ५२ दिवसांत पहिला तोडा मिळतो. फळाचे सरासरी वजन ११५ ग्रॅम असून हेक्टरी सरासरी उत्पन्न १४ - १५ टन इतके मिळते.२) पुसा चिकणी : ही लवकर फळे देणारी जात आहे. पेरणीनंतर ४५ दिवसांत फळे यायला सुरुवात होते. फळांच्या सालीचा रंग हिरवा असून ती चोपडी असते. एका वेलीला १५ ते २० फळे लागतात. ही जात उन्हाळी आणि पावसाळी हंगामातील लागवडीसाठी योग्य आहे. सरासरी उत्पन्न हेक्टरी २० ते ३२.५ टन येते. याशिवाय कल्याणपूर चिकनी ही घोसाळीची सुधारित जात आहे.
पडवळ जाती : १) कोईम्बतूर -४ : ही पडवळाची सुधारित जात असून ६० दिवसांत फळे तयार होतात. फळाची लांबी १६० ते १९० सेंमी इतकी असते. फळांचा रंग गडद हिरवा असून त्यावर पांढऱ्या रेषा असतात. गर फिकट हिरव्या रंगाचा असून पेरणीपासून ७० दिवसांत पहिली काढणी येते. एका वेलीला १० ते १२ फळे येतात.२) कोकण श्वेता : कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या या वाणाची फळे ९० सेंमी लांब असतात. फळाचा रंग हिरवट पांढरा असून त्यावर तुरळक रेषा असतात. हेक्टरी उत्पादन १५ - २० टन मिळाले.या व्यतिरिक्त पडवळाचे कोइम्बतूर - १ आणि टी.ए - १९ हे दक्षिण भारतात प्रचलित सुधारित वाण आहेत. टी.ए.-१९ या वाणाची फळे ६० सेंमी लांब, किकट हिरव्या रंगाची, पांढरे पट्टे असलेली असतात. सरासरी हेक्टरी उत्पादन २२ टन एवढे येते.बियाण्याचे प्रमाण : एक हेक्टर लागवडीसाठी घोसाळी २.५ ते ३ किलो तर पडवळाचे ३.५ ते ४ किलो बियाणे लागते. या फळभाज्यांच्या बियाण्याचे कवच जाड असते, त्यामुळे बियाण्याला जर्मिनेटरची बीजप्रक्रिया अत्यावश्यक असते.बीजप्रक्रिया : जर्मिनेटर ३० मिली + १ लि. पाणी या द्रावणात १ किलो बी रात्रभर भिजत ठेवून सकाळी सावलीत सुकवून नंतर लागवडीसाठी वापरावे. बीजप्रक्रीयेमुळे बियांची नेहमीपेक्षा २ ते ३ दिवस लवकर व जास्तीत - जास्त उगवण होवून रोपे लवकर वाढीस लागतात. पांढऱ्या मुळ्यांचा जारवा वाढत असल्याने मर होत नाही
लागवडीचे अंतर आणि लागवड पद्धती : काकडीवर्गीय पिकांची पाट पद्धतीने किंवा आळे पद्धतीने करतात. आळे पद्धतीने पिकाला जास्त पाणी द्यावे लागते आणि तणांची वाढही जास्त होते. घोसाळी आणि पडवळ यांच्या लागवडीसाठी रुंद सरी - वरंबा पद्धत चांगली मानली आहे. फळभाजीच्या जातीनुसार घोसाळीची लागवड ५ फूट अंतरावर बी टोकून करतात. दोन वेलींत ४ फूट अंतर ठेवावे. पडवळाची लागवड ७ x ४ फूट अंतरावर करावी. पाटाच्या एका बाजूने ठराविक अंतरावर खुरप्याच्या सहाय्याने लहानसा खळगा (खड्डा) करून त्यामध्ये १ ते २ बिया एका ठिकाणी टोकून मातीने झाकून हाताने दाबून घ्याव्यात. पाटात पाणी सोडून सऱ्या भिजवाव्यात.खते आणि पाणी व्यवस्थापन : घोसाळी आणि पडवळ या पिकांसाठी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश दर हेक्टरी द्यावे. मशागतीच्या वेळी हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत देऊन बी टोकताना त्या जागी. अगोदर १ चहाचा चमचाभर कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. ते मातीने झाकून त्यावर बी टोकावे. पुन्हा १ ते १।। महिन्यांनी कल्पतरू सेंद्रिय खत एकरी १०० किलो द्यावे.लागवडीपुर्वी सऱ्या ओलवून घ्याव्यात. बियांची टोकण केल्याबरोबर पाणी ताबडतोब देऊन पाट भिजवून घ्यावेत. उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने जमिनीचा मगदूर, पिकाची वाढ, हवामानाचा विचार करून पाणी द्यावे. पाणी हे सकाळी १० च्या अगोदर किंवा सायंकाळी ६ नंतर द्यावे. पाट पद्धतीने लागवड केल्यास पाणी पाटाच्या बाहेर वाहणार नाही याची काळजी घ्यावी.
वळण, आधार देणे आणि आंतरमशागत : घोसाळी आणि पडवळ ही वेलवर्गीय पिके असल्यामुळे या पिकांच्या वेलींना वळण देणे आवश्यक आहे. मुख्य वेलीची वाढ भराभर होण्यासाठी बगलफुटी काढाव्यात. वेल तारेच्याखाली एक फुटावर आल्यावर बगलफूट काढणे बंद करावे आणि ३ - ४ चांगल्या फुटी ठेवाव्या आणि त्या तारेवर पसरू द्याव्यात.कीड व त्यांचे नियंत्रण : घोसाळी आणि पडवळ या पिकांवर प्रामुख्याने लाल भुंगे आणि फळमाशीचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो.१) लाल भुंगे : लाल भुंगे पीक असताना पाने कुरतडून खातात, बियांची उगवण झाल्याबरोबर या किडी चा उपद्रव होतो. ही कीड सर्वच काकडीवर्गीय पिकांवर येते.कीड पानांचा कोवळा भाग कुरतडून खाते. या किडीच्या नियंत्रणासाठी सत्पामृतासोबत स्प्लेंडर २० मिली/१० लि. पाणी याप्रमाणे ८ - ८ दिवसांनी २ वेळा फवारावे.२) फळमाशी :फळमाशी ही एक महत्त्वाची कीड असून काकडीवर्गीय पिकांचे फार मोठे नुकसान करते. फळमाशी ही फळे लहान असताना फळाच्या सालीखाली अंडी घालते, या अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. या अळ्या फळातील गर खातात आणि त्यानंतर फळे सडतात. फळमाशीच्या नियंत्रणासाठी स्प्लेंड २० मिली/१० लि. पाणी याप्रमाणे ८ - ८ दिवसांनी सप्तामृतासोबत २ वेळा फवारावे.
रोग आणि त्यांचे नियंत्रण :१) भुरी: भुरी हा रोग बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण झाल्यास पानांवर आणि फळांवर पांढरे डाग पडतात, त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, फळे वाढत नाहीत, उत्पादन घटते. याच्या नियंत्रणासाठी थ्राईवर ३० मिली. + हार्मोनी २० मिली./१० लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी.२) केवडा : केवडा हा रोग आर्द्रतायुक्त दमट हवामानात मोठ्या प्रमाणात वाढतो. या रोगाचा उपद्रव झाल्यानंतर पानाच्या खालील भागावर पिवळसर डाग पडतात. पूर्ण पानावर परिणाम होऊन पाने गळून पडतात. पाने आणि खोड रोगाला बळी पडतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी हार्मोनी २० मिली/१० लि. पाणी ८ - ८ दिवसांनी २ वेळा फवारावे.काढणी आणी उत्पादन : बियाण्यांच्या उगवणीनंतर साधारण ५५ - ६० दिवसांत पहिला तोडा मिळतो. त्यानंतर ४ - ५ दिवसांच्या अंतराने तोडे होतात. घोसाळीचे साधारणपणे हेक्टरी १५ ते १६ टन उत्पादन मिळते.पडवळाचे तंत्रज्ञानाचा नियमित वापर केल्यास मालाचा दर्जा सुधारून उत्पादनात ४ - ५ टनाने निश्चित वाढ होते. तसेच प्रतिकूल हवामानावर मात करता येते. ह्या पिकांची फळे कोवळी असताना तोडावीत.फळे जास्त जुनं झाल्यास फळाची साल टणक होऊन आतील बियाही टणक होतात आणि फळांची प्रत खराब होते. वरील तंत्रज्ञानाने चांगली निगा ठेवलेल्या पिकापासून १८ - २० तोडे मिळतात. तोडणी सकाळी करावी. फळे सावलीत ठेवावी. प्रतवारी करून फळे बांबूच्या पाट्या, लाकडी खोके किंवा कागदी पुठ्ठ्यांच्या खोक्यांत व्यवस्थित रचून भरावीत. तळाशी कडूलिंबाचा पाला टाकावा व त्यावर वर्तमानपत्राचा वापर करून फळे रचावीत.
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
Published on: 16 June 2022, 09:08 IST