Agripedia

गहु हे पीक रब्बी हंगामात महाराष्ट्रातील बरेचसे शेतकरी घेतात.

Updated on 07 January, 2022 4:38 PM IST

गहु हे पीक रब्बी हंगामात महाराष्ट्रातील बरेचसे शेतकरी घेतात. मात्र त्यांना आपले पीक चांगले येण्याकरीता गव्हावरिल अनेक किडींचा सामना करावा लागतो. याचं संदर्भात या लेखामध्ये आपण गव्हावरील अनेक किडींचा अभ्यास करणार आहोत.

१) मावा: 

गव्हाचे पिकावर दोन प्रकारचे मावा दिसुन येतो. एकाचा रंग पिवळसर तर दुस-याचा रंग हिरवा असतो. हे किटक लांब व वर्तुळाकार असते. या किडीचे पिल्ले व प्रौढ मावा पानातुन व कोवळ्या शेंड्यातुन रस शोषन करतात. तसेच आपल्या शरीरातुन मधासाखा गोड व चिकट पदार्थ सोडतात.

व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. या किडीचे नियंत्रणासाठी शेतामध्ये पिवळे चिकट कार्डचा (स्टिकी ट्रॅप) वापर एकरी पाच ते दहा या प्रमाणात लावावे. तसेच थायामिथोक्झाम(२५ डब्ल्यूजी) एक ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड पाच ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे. जैविक उपायांमध्ये व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम ॲनिसोप्ली प्रत्येकी ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.

२) तुडतुडे: 

हे किटक आकारने लहान व पाचरीच्या आकाराचे असतात. त्यांचा रंग हिरवट राखडी असतो. तुडतुडे व त्यांची पिल्ले पानातुन रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडुन ती वाळु लागतात. व पिकांची वाढ खुंटते तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट (३० ईसी) १५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. 

पिकावर मावा आणि तुडतुडे एकत्रितपणे आढळून आल्यास मावा किडीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या उपायांचा वापर करावा. त्यामुळे तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी वेगळी उपाययोजना करण्याची गरज नाही.

३) वाळवी किंवा उधई : 

या किडीचा प्रादुर्भाव पिक वाढीच्या अवस्थेत दिसुन येतो. ही किड गव्हाच्या रोपाची मुळ खाते. व त्यामुळे रोपे वाळतात व संपूर्ण झाड मरते.

 वाळवीचा बंदोबस्त करण्यासाठी-

बांधावर असलेली वारूळे खणुन काढावित व त्यातील राणीचा नाश करावा. वारुळ नष्ट केल्या नंतर जमीन सपाट करावी व मध्यभागी सुमारे ३० से.मि. खोलवर एक छिद्र करावे 

आणि त्यात क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही हे किटकनाशक १५ मि.लि. १० लिटर पाण्यात मिसळुन हे औषधाचे मिश्रण ५० लिटर एका वारुळासाठी या प्रमाणात वारुळात टाकावे तसेच फोरेट १० टक्के दाणेदार किंवा कार्बोफ्युरॉन ३ % दाणेदार हेक्टरी २५ किलो जमिनीत टाकावे. आणि जमिनीमध्ये निंबोळी पेंड २०० किलो प्रति हेक्टरी टाकावी.

English Summary: Know about wheat insect and pest management
Published on: 07 January 2022, 04:38 IST