Agripedia

तयार होत असलेले गांडूळ खत, ज्या बेडमध्ये तयार होत आहे, त्या गांडूळ खताच्या बेडमध्ये, कल्चरला ओलावा राहण्यासाठी हालक्या हाताने किंवा झारीने शिंपडलेले पाणी बेडच्या तळाशी जमा होते.

Updated on 19 January, 2022 11:30 AM IST

तयार होत असलेले गांडूळ खत, ज्या बेडमध्ये तयार होत आहे, त्या गांडूळ खताच्या बेडमध्ये, कल्चरला ओलावा राहण्यासाठी हालक्या हाताने किंवा झारीने शिंपडलेले पाणी बेडच्या तळाशी जमा होते. ते जमा झालेले पाणी लहानशा पाईपच्या सहाय्याने बेडच्या बाहेर एका बादलीत किंवा लहान भांड्यात साठवले जाते. हे साठवलेले पाणी म्हणजे व्हर्मिवॉश होय, हे एक द्रवरूप खत म्हणून उपयोगात आणता येते. त्याचा फवारणीसाठीही उपयोग होऊ शकतो. व्हर्मिवाशमध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे ऑक्झीन, सायटोकायिनन ही संप्रेरके तसेच नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर सुक्ष्म अन्नद्रव्ये असतात. व्हर्मिवॉशमध्ये azotobactor, arobactericum, rhizobium नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळविणारे जीवाणू असतात. तसेच व्हर्मिवॉश हे वनस्पतीचे शक्तिवर्धक म्हणून काम करते. तसेच ते वनस्पतीची रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यास मदत करते.

 

व्हर्मिवॉशचे फायदे

१) व्हर्मिवाश १ लीटर, आणि गोमुत्र १ लीटर, १० लीटर पाणी यांचे मिश्रण हे जैविक कीडनाशक आणि द्रवरूप खत म्हणून कार्य करते. यामुळे मावा, फुलिकडे यासारखे रस शोषणारे कीटक यांचे प्रमाण कमी होते.

२) वनस्पतींच्या आणि पिकांच्या प्रकाश संश्लेषण क्रियेत वाढ होते.

३) जिमनीतील सूक्ष्मजीवाणूंची संख्या वाढते.

४) पिकांची उत्पादन क्षमता वाढते.

५)वनस्पतीची रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यास मदत करते.

६)कंपोस्टमध्ये कुजविण्याची क्रिया वाढवते.

 वर्मी वाश मध्ये असणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये : सोडियम, चुना, तांबे, लोह, मॅग्नेशिअम, मंगल, जस्त

 

व्हर्मिवॉश तयार करण्याची पद्धत

१)व्हर्मिवॉश तयार करण्यासाठी २०० लिटरचे मोठे ड्रम वापरावे.

२) व्हर्मिवॉश बाहेर पडण्यासाठी ड्रमच्या तळाशी एक छिद्र पाडावे

३) ड्रमच्या तळाशी विटांचे तुकडे आणी लहान दगडांचे तुकडे याचा १५ सेंमीचा थर देऊन त्यानंतर १५ सेंमी वाळूचा थर द्यावा.

४)नंतर अर्धवट कुजलेला व पाणी धरून ठेवणारा काडीकचरा टाकावा.

५) कुजलेल्या शेणखताचा १५ सेंमीचा थर द्यावा

६) यानंतर त्यामध्ये २००० गांडुळे सोडावित

७)त्यानंतर पुन्हा माती, शेण, कुजलेला काडीकचरा १५ सेंमी टाकावा

८)या ड्रममध्ये सारखे पाणी पडेल यासाठी ड्रमवर एक मडके टांगून ठेऊन त्या मडक्यातून रोज ४-५ लीटर पाणी पडत राहील अशी व्यवस्था करावी

९)१० दिवसानंतर व्हर्मिवॉश तयार होण्यास सुरुवात होईल

१०) ड्रममधून बाहेर पडणारे व्हर्मिवॉश गोळा करणेसाठी प्लास्टिकचा डबा, किंवा बादली ठेवावी

 

 वर्मी वाश वापराचे प्रमाण आणि उपयोग

१) रोपांची मुळे बुडवीने :व्हर्मिवॉश व पाणी अनुक्रमे १ : ५ या प्रमाणात घेऊन त्यात १५ - २० मिनिटे रोपांची मुळे पुनर्लागवडीपुर्वी बुडवावीत. तसेच लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या फळ झाडांच्या काड्या व्हर्मिवॉशमध्ये बुडवाव्यात. व्हर्मिवॉशमध्ये जीबरेलीन, ऑक्झिन्स, सायटोकायनीन असते. त्यामुळे रोपांची वाढ जोमाने होऊन फळ झाडांच्या काड्यांना मुळे फुटण्यास मदत होते.

२) फवारणीसाठी : व्हर्मिवॉश व पाणी द्रावण अनुक्रमे १:५ या प्रमाणात घेऊन त्याची कीड नियंत्रणासाठी पिकावर फवारणी करावी. यामुळे स्पोडोप्टेरा यासारख्या अळ्यांचे तसेच मावा, फुलिकडे यासारखे रस शोषणारे कीटक यांचे प्रमाण कमी होते.

 

३) झाडांभोवती आळवणी करण्यासाठी : व्हर्मिवॉश व पाणी द्रावण अनुक्रमे १:१० या प्रमाणात घेऊन ते पिकांच्या मुळाजवळ ओतावे म्हणजे जिमनीतील जिवाणूंपासून होणाऱ्या पिकांच्या मर रोगांचा प्रसार थांबवता येतो. व्हर्मिवॉशमध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारे ऑक्झिन्स व सायटोकायनीन ही संप्रेरके तसेच नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.

 

संकलन : प्रविण सरवदे,कराड

English Summary: Know about use of vermiwash total information
Published on: 19 January 2022, 11:30 IST