पिकांची लागवड करण्यापूर्वी मातीच्या काही महत्त्वाच्या प्राकृतिक गुणधर्माचा विचार करायला हवा.
पोत
जमिनीचा पोत म्हणजे जमिनीतील वाळू जाड किंवा बारीक, गाळ पोयटा व चिकणमाती यांचे परस्परांशी असणारे प्रमाण, वाळू, गाळ व चिकणमाती योग्य प्रमाणात असलेली मिश्रमाती सर्वात उत्तम. जमिनीच्या पोतावर तिचे अनेक गुणधर्म व जमिनीतील पाण्याची चलनवलन क्षमता अवलंबून असतात.
जमिनीची घडण किंवा रचना पीक उत्पादनामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे. आपण जमिनीची घडण किंवा रचना यामध्ये फार बदल घडवून आणू शकत नाही. परंतु सेंद्रिय पदार्थाचा वापर, हिरवळीच्या खतांचा वापर, मशागतीच्या योग्य पद्धती, मशागतीच्या वेळी योग्य ओलाव्याचे प्रमाण या सर्व गोष्टींचा अवलंब करून जमिनीची रचना चांगली ठेवू शकतो. जर जमिनीची रचना बिघडली तर जमिनीचे भौतिक गुणधर्मावर त्यांचा विपरीत परिणाम होतो.
मातीचा रंग हा मुख्य करून जमिनीमध्ये असलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या प्रमाणावर तसेच इतर रासायनिक घटकांवर अवलंबून असते. ज्या मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ पुरेशा प्रमाणात आहेत, त्या मातीचा रंग काळा असतो. मातीला पांढरा-पिवळा रंग हा सिलिकाचे प्रमाण जास्त असेल तर प्राप्त होतो. तसेच लाल रंग हा मुख्य करून आर्यन ऑक्साइडमुळे प्राप्त होतो.
मातीच्या रंगावर जमिनीमध्ये घडणा-या वेगवेगळया रासायनिक क्रिया तसेच जीवजंतूचे कार्य अवलंबून असते. मातीचा आणखीन एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे सच्छिद्रता. ज्या मातीची सच्छिद्रता चांगली आहे त्या जमिनीमध्ये पाण्याचे चलन चांगले राहते.
ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहिल्यामुळे जैविक क्रियेचा वेग चांगला असतो आणि जीवजंतूंची संख्या चांगली राहते. आपण असे म्हणू शकतो की, १०० ग्रॅम मातीमध्ये ५ ग्रॅम सेंद्रिय पदार्थ, ४५ ग्रॅम खनिज पदार्थ, २५ ग्रॅम हवा आणि २५ ग्रॅम पाणी हे प्रमाण असणे आवश्यक आहे. जर यापैकी हवा किंवा पाणी या दोघांचे प्रमाणात बदल झाला तर त्याचा जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
जास्त पाण्यामुळे जीवजंतू गुदमरून जातात आणि कमी पाण्यामुळे त्यांचे कार्य मंदावते. तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा वरील घटकांच्या प्रमाणावर अवलंबून असते. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण योग्य त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची क्षमता चांगली असते.
मातीचा शेवटचा आणि महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तापमान. मातीचे तापमान खूप कमी असेल अशा वेळी बियाण्याची उगवण उशिरा होते आणि तापमान जास्त असेल तर काही वेळा बियाण्यांची उगवणसुद्धा होत नाही.
बियाण्याच्या उगवणीपासून पीक काढणीपर्यंत जमिनीचे तापमान योग्य असणे गरजेचे आहे. कारण वनस्पतींच्या वेगवेगळया जैविक क्रियांचा वेग हा या तापमानावर अवलंबून असतो.
मातीचे तापमान योग्य असेल तर जमिनीमध्ये असलेले उपलब्ध अन्नघटकांचे वहन पिकांच्या मुळांपर्यंत तसेच वनस्पतीच्या प्रत्येक भागात चांगल्या प्रकारे होऊन पीक उत्पादन चांगले होते. जमिनीचे भौतिक गुणधर्म हे एकमेकांशी ब-याच अंशी निगडित असतात.
ज्या जमिनीची रचना चांगली, त्या मातीची सच्छिद्रता चांगली अशा जमिनीमध्ये पाण्याचे चलनवलन चांगले राहते. तसेच मातीची पाणी धारणक्षमता पण चांगली राहते.
हवा आणि पाण्याच्या योग्य प्रमाणामुळे मातीचे तापमान योग्य राखले जाऊन सेंद्रिय पदार्थ कुजवण्याची क्रिया जलद होते. त्यामुळे मातीला काळा रंग येतो. या काळया रंगामुळे सूर्यकिरण शोषून घेण्याची क्षमता वाढते आणि तापमान चांगले राहते. अशा प्रकारे हे सर्व भौतिक गुणधर्म एकमेकांशी निगडित असतात.
जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे दोन भाग पडतात. एकूण सेंद्रिय पदार्थ व सेंद्रिय पदार्थाचा कुजलेला भाग सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मावर चांगला परिणाम होतो. त्यापैकी काही महत्त्वाचे परिणाम खालीलप्रमाणे आहेत.
जमिनीतील मातीचे कण एकमेकांना चिकटून राहतात व त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. ठिसूळ जमिनीत चिकटपणा वाढून, पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
जमिनीचा रंग गडद होतो व त्यामुळे जमीन सूर्याची उष्णता लवकर ग्रहण करू शकते. सेंद्रिय पदार्थामुळे जमिनी चांगल्या फुगून येतात व त्यामुळे पाण्याचा चांगला निचरा होण्यास मदत होते.
जमिनीतील जीवाणूंना सेंद्रिय पदार्थामधून अन्नाचा पुरवठा होतो. सेंद्रिय पदार्थ हळूहळू कुजतात. त्यामुळे पिकांना हळूहळू अन्न मिळत जाते.
सेंद्रिय पदार्थामुळे वनस्पतींना व्यवस्थित पोषणद्रव्ये उपलब्ध होतात.
Published on: 21 February 2022, 11:36 IST