Agripedia

शेंगवर्गीय भाजीपाला पिकापैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्‍पन्‍न देणारे पिक आहे.

Updated on 24 January, 2022 1:15 PM IST

शेंगवर्गीय भाजीपाला पिकापैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्‍पन्‍न देणारे पिक आहे. महाराष्‍ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक इत्‍यादी जिल्‍हयांमध्‍ये श्रावण घेवडयाची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. घेवडयाच्‍या कोवळया शेंगाची भाजी तसेच सुकलेल्‍या दाण्‍यांची उसळ लोकप्रिय आहे. घेवडयांच्‍या पानाचा उपयोग जनावरांच्‍या चा-यासाठी करता येतो. शेंगामध्‍ये अ आणि ब जीवनसत्‍व तसेच खनिजे, लोह आणि चुना तसेच प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.

 

जमिन व हवामान

घेवडा हेक्‍टरी पिक हलक्‍या ते मध्‍यम जमिनीत पाण्‍याचा निचरा असणा-या जमिनीत उत्‍तम प्रकारे येते. अतिभारी जमिनीत झाडांची वाढ भरपूर होते. परंतु शेंगा कमी लागतात. जमिनीचा सामु 5.5 ते 6 च्‍या दरम्‍यान असावा. 15 ते 40 अंश सेल्सिअस तापमानात हे पिक चांगले येते. अतिथंडी व अतिउष्‍ण हवामान या पिकास मानवत नाही.

पूर्व मशागत

जमिनीची उभी आडवी नांगरट करून, कुळवाच्‍या पाळया देऊन ढेकळे फोडून जमिन भूसभुशीत करावी. जमिनीत 40 ते 45 बैलगाडया हेक्‍टरी या प्रमाणात शेणखत मिसळावे.

 

लागवड हंगाम

महाराष्‍ट्रात या पिकाची लागवड तीनही हंगामात होते. खरीप हंगामासाठी जून, जूलै महिन्‍यात रब्‍बी हंगामासाठी संप्‍टेबर ऑक्‍टोबर महिन्‍यात आणि उन्‍हाळी हंगामात जानेवारी, फेब्रूवारी महिन्‍यात घेवडयाची लागवड करतात. मुख्यत: या पिकाची लागवड खरीप हंगामामध्ये केली जाते. 

 

 

वाण

घेवडयाच्‍या कटेंडर, पुसा पार्वती, अर्का कोमल, व्‍ही.एल., 5 जंपा, पंत अनुपमा, फूले सुयश या प्रकारच्‍या जाती लागवडीयोग्‍य आहेत.

 

बियाण्‍याचे प्रमाण

प्रति हेक्‍टरी 40 किलो बियाणे लागते. टोकन पध्‍दतीने लागवड केल्‍यास हेक्‍टरी 25 ते 30 किलो बी लागते.

 

पूर्वमशागत

जमीनीची उभी आडवी नांगरट करून, कुळवाच्‍या पाळया देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत 40 ते 45 बैलगाडया हेक्‍टरी या प्रमाणात शेणखत मिसळावे.

 

लागवड

खरीप हंगामात पिकाची पेरणी पाभरीने अथवा तिफणीने पहिला पाऊस पडून गेल्‍यावर, जमिन वाफश्‍यावर आल्‍यावर करावी. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर 45 सेमी आणि दोन झाडातील अंतर 30 सेमी ठेवावे. यानंतर विरळणी करून दोन झाडात 30 सेमी अंतर ठेवावे. बिया टोकन पध्‍दतीने 2 ते 3 सेमी खोलीवर पेराव्‍यात. उन्‍हाळी हंगामात बियांची पेरणी 60 ते 70 सेमी अंतरावर सरी वरंब्‍यावर करावी. वरंब्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला बगलेत 30 सेंटीमीटर अंतरावर 2 ते 3 बिया टोकाव्‍यात.

खते व पाणी व्‍यवस्‍थापन

सर्वसाधारणपणे हेक्‍टरी 720 किलो बियाण्‍याचे आणि 630 किलो पाल्‍याचे उत्‍पादन देणा-या घेवडयाचे पीक जमिनीतून 66 किलो नत्र 27 किलो स्‍फूरद आणि 55 किलो पालाश शोषून घेते. यावरून घेवडयाच्‍या पिकाला जमिनीतून लागणा-या मुख्‍य अन्‍नघटकाची आवश्‍यकता लक्षात येते. निरनिराळया प्रयोगावरून घेवडयाच्‍या पिकाला शेणखत आणि रासायनिक खतांच्‍या पुढील मात्रांची शिफारस करण्‍यात आली आहे.

घेवडयाच्‍या पिकाला 40 टन शेणखत, 50 ते 54 किलो नत्र 50 ते 100 किलो स्‍फुरद आणि 50 ते 110 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. स्‍फूद आणि पालाश पूर्ण आणि अर्धा नत्र पेरणीच्‍या वेळी द्यावा आणि उरलेला अर्धा नत्र बी उगवल्‍यानंतर तीन ते चार आठवडयांनी द्यावा.

घेवडयाच्‍या पिकाची मुळे जमिनीत उथळ वाढत असल्यामुळे पिकाला जास्‍त पाणी दिल्‍यास ते मुळांना अपायकारक ठरते. मात्र फूलो-याच्‍या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्‍यास फळधारणा कमी प्रमाणात होते. म्‍हणून घेवडयाच्‍या पिकाला फूले येण्‍याआधी पाणी द्यावे. तसेच पावसाळयात जमिनितील पाण्‍याचा निचरा होणे आवश्‍यक असते. खरीप हंगामातील घेवडयाच्‍या पिकाला पाणी देण्‍यात आवश्‍यकता भासत नाही. परंतू पाऊस नसल्‍यास पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे. उन्‍हाळी हंगामातील पिकाला 8 ते 10 दिवसांच्‍या अंतराने आणि जमिनीच्‍या मगदुरानुसार पाण्‍याच्‍या पाळया द्याव्‍यात.

 

आंतरमशागत

खरीप हंगामात पिकाची पेरणी केल्‍यानंतर 15 दिवसांनी विरळणी करावी. खरीप हंगामात तणांचा योग्‍य वेळी बंदोबस्‍त करणे आवश्‍यक आहे. 1 ते 2 खुरपण्‍या देऊन तण काढावे किंवा पेरणीपूर्वी तणनाशकाची फवारणी करावी. खरीप हंगामात जास्‍त प्रमाणात पाऊस झाल्‍यास आणि योग्‍य प्रमाणात पाण्‍याचा निचरा न झाल्‍यास चर खोदून पाणी शेताबाहेर काढून द्यावे.

रोग व किड

मावा -

मावा कीड घेवडयाच्‍या पानातील रस शोषून घेते. त्‍यामुळे पानाच्‍या कडा वळतात. मावा किड वाढणा-या फांद्या आणि लहान पानांतील रस शोषून घेते. 

शेंगा पोखरणारी अळी -

ही किड प्रथम शेंगाच्‍या पृष्‍टभागावर आढळून येते. ही किड नंतर शेंगेच्‍या आत शिरून आतील दाणे खाऊन फस्‍त करते.

खोडमाशी -

लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांत या किडीचा मोठया प्रमाणावर उपद्रव होतो. या किडीचे मादी फूलपाखरू पीक पहिल्‍या दोन पानांवर असतांना पानांवर अंडी घालते. अंडी उबवल्‍यानंतर अंडयामधून अळया बाहेर पडतात. अळी खोडावर जाते आणि खोडाच्‍या आतील भाग पोखरून खाते. या किडीचे सुप्‍तावस्‍थेत कोश जमिनीलगत खोडामधून पडतात.

भूरी -

हा रोग बुरशीमुळे होतो. या रोगाची पिकाला लागण झाल्‍यास पानावर, काडयावर आणि शेंगावर पांढरी पावडर असलेले ठिपके दिसतात.

तांबेरा -

तांबेरा हा बुरशीजन्‍य रोग असून त्‍यात पानाच्‍या खालच्‍या भागावर तांबूस काळपट रंगाचे फोड येतात.

मर -

मर (विल्‍ट) हा बुरशीजन्‍य रोग असून या रोगाची पिकाला लागण झाल्‍यास झाडांची पाने पिवळी पडून ती गळतात.

कीड व रोग नियंत्रणाकरिता कोणत्याही रासायनिक औषधाचा वापर करण्याअगोदर तज्ञ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा.

 

उत्‍पादन

श्रावण घेवडयाचे हेक्‍टरी सरासरी 22-27 क्विंटलपर्यंत उत्पादन निघते. 

|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||

 

कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य

http://www.krushisamarpan.com

English Summary: Know about rajma plantation
Published on: 24 January 2022, 01:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)