सध्या खरीपतील उशीरा रांगडा कांदा लागवडी सुरू आहेत तसेच पुढील रब्बी कांदा रोपे टाकण्याची तयारी सुरू आहे. पण मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही खरीप कांदा पिकामध्ये बऱ्याच ठिकाणी पीळ पडणे कांदा रोपे वेडीवाकडी होणे हा प्रकार सुरू झाला आहे. शेतकरी म्हणून कांद्याला पीळ पडण्याच्या रोगाबद्दल काही गोष्टी वेळीच समजून घणे आवश्यक आहे अन्यथा नुकसान हे ठरलेलेच आहे.
या रोगाला ट्वीस्टर डिसीज (twister disease) असे म्हणतात. म्हणजे पीळ वेडेवाकडे होणे हा रोग रोपे लागवड झाली की मातीतील ३ ते ४ प्रकारच्या बुरशी व काही जमिनीत एक प्रकारचा निमेटोड हे एकत्र जमिनीलगत रोपावर एकत्र वाढतात. मग रोप तिथेच वाकडे व्हायला सुरुवात होते. मग ह्या बुरशी जशा वाढतात तशा रोपे अजून वाकडे पीळ पडलेले दिसतात. कांदा पात किंवा पाने हे लांबट होत वेडेवाकडे वाटोळे घातलेले गोल गोल होतात. याचे कारण म्हणजे ह्या बुरशीमुळे कांद्यात नैसर्गिकरित्या जिब्रेलीक (GA व IAA) तयार होते. त्यामुळे पाने लांबट होतात त्यामुळे एकदा पाने लांबट झाले की असा कांदा परत सरळ होत नाही आणि आपली नुकसान पातळी वाढते.
पावसाचे अतिप्रमाण किंवा काळी भारी जमीन किंवा शेतात पाणी प्रमाण जास्त झाल्यामुळे या बुरशी वाढतात. विशेषत: पावसाळी वातावरण किंवा ओल जास्त असलेल्या ठिकाणी तसेच पाणी साचून राहिलेल्या जमिनीत हा प्रकार जास्त आढळतो. याचे कारण म्हणजे जमिनीतल्या बुरशीना ओलावा मिळून बुरशीचे प्रमाण वाढत जाते.
पीळ पडू नये म्हणून करा या उपाययोजना
एकदा कांद्यांना वेडावाकडा पीळ पडला की तो सरळ होणे जवळजवळ शक्य नाही. पण लवकर उपाय केला तर पुढचे प्रमाण कमी करू शकतात पण सुरुवातीपासून हा रोग समजून घेतला तर हा वाढणार नाही हे नक्कीच..रोप गादी वाफ्यावर टाका म्हणजे पाण्याचा निचरा चांगला होईल.कांदा रोपवाटिका करतानाच ट्रायकोडर्माचा नियमित वापर करा.
ट्रायकोडर्माची ड्रेनचिंग किंवा वरून फवारणी ५ मिली प्रति लिटर ने केली तरी चालेल.कांदा रोपे रोपवाटिकेतून काढण्याच्या आठवडाभर ट्रायकोडर्मा ची ड्रेनचिंग द्या किंवा वापसा चांगला असेल तर रासायनिक बुरशीनाशके जसे बविस्टीन व एम ४५ एकत्र ड्रेनचिंग करू शकता.
कांदा रोपे लागवडीपूर्वी रासायनिक बुरशीनाशक बविस्टीन किंवा साफ किंवा रिडोमिल (प्रमाण १ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी) मध्ये रोपे बुडवून लागवड करू शकता. किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति लिटर व सुडोमोनास ५ ग्रॅम प्रति लिटर यात रोपे बुडवून मग लागवड करा.कादा लागवडही सहसा गादीवाफ्यावर किंवा सरीवर केली तर पाण्याचा निचरा चांगला होईल बुरशीचे प्रमाण कमी राहील.
वापसा किंवा ढगाळ वातावरण असल्यास जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति लिटर किंवा सुडोमोनास ५ ग्रॅम प्रति लिटर किंवा बॅसिलस सबटिलीस ५ ग्रॅम प्रति लिटर ने फवारणी स्वतंत्र अथवा एकत्र अथवा ड्रेनचिंग करा. हे ३ ते ४ दिवसानंतर परत फवारणी करा तसेच यात कोणतेही रासायनिक बुरशीनाशकांची फवारणी करू नका.कांदा लागवडीनंतर आठवड्यात ०:५२:३२ हे ३ ग्रॅम प्रति लिटर व त्यात बोरॉन अर्धा ग्रॅम प्रति लिटर फवारणी घेऊन अशी नियमित फवारणी दोन महिन्यांपर्यत करू शकता.
वापसा किंवा पाऊस नसल्यास रासायनिक बुरशीनाशके व कीटकनाशके शिफारशी प्रमाणे वापरू शकता.. जसे प्रोफेनोफोस व हेक्साकोनाझोल किंवा टिल्ट किंवा इतर बुरशीनाशकांची फवारणी करू शकता.
या व्यतिरिक्त काही योग्य प्रॅक्टिकल उपाय योजना शेतकऱ्यांनी सांगाव्यात त्यामुळे इतरांना त्याचा शेतकरी म्हणून फायदा होईल.
विनोद धोंगडे नैनपुर
ता. सिदेवाहि जि. चंद्रपूर
Published on: 05 January 2022, 03:36 IST