बळकट होण्यासाठी, खराब हवेपासून वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी, जमिनीतील नायट्रोजनाचे प्रमाण व्यवस्थित राखण्यासाठी इ. कारणांसाठीही या खतांचा उपयोग होतो.
पोटॅशियम लवणांपैकी क्लोराइड, सल्फेट व नायट्रेट ही लवणे खत म्हणून वापरली जातात. ती पाण्यात विद्राव्य असून त्यांचे वनस्पती शोषून घेऊ शकतील अशा पोटॅशियम आयनांत अपघटन होते. पृथ्वीवर पोटॅशियम हे विविध खनिजांचा भाग म्हणून सर्वत्र आढळते. बहुतेक सर्व पोटॅश खते ही सिल्व्हाइट, कार्नालाइट, कायनाइट, लँगबेनाइट, सिल्व्हॅनाइट या जलविद्राव्य खनिजांपासून आणि काही प्रमाणात लवणद्रवांपासून तयार करतात.
पोटॅशियम क्लोराइड: हे म्युराइट ऑफ पोटॅश या नावाने विकले जाते. नेहमीचे ९८% शुद्ध पोटॅशियम क्लोराइड खत व्यवसायात ६०% म्युराइट म्हणून ओळखले जाते, तर अशुद्ध पोटॅशियम क्लोराइडला ५०% म्युराइट म्हणतात.
हे मिठासारखे दिसणारे व कडू चव नसलेले खत आहे. त्यातून ६०% पोटॅश मिळते. खनिजांपासून ते स्फटिकीकरणाने व प्लवनाने (तरंगवून) तयार करतात. ते चूर्ण स्वरूपात तसेच दाणेदार स्वरूपात तयार करतात. ते जलविद्राव्य असून जास्त प्रमाणात वापरात असणारे पोटॅशयुक्त खत आहे.
पोटॅशियम सल्फेट : या खतात ४८–५०% पोटॅश असते. हे खत पोटॅशियम क्लोराइड व सल्फ्यूरिक अम्ल यांच्या विक्रियेने, तसेच लँगबेनाइट या खनिजापासून तयार करतात. हे खत जलविद्राव्य असले, तरी ते वाहून जात नाही.
पोटॅशियम नायट्रेट : नायट्रिक अम्ल व पोटॅशियम क्लोराइड यांच्या विक्रियेने हे खत तयार करतात. हे कमी जलशोषक असल्याने त्याचा खत म्हणून वापर करतात. यात ४४% पोटॅश व १३% नायट्रोजन असतो.
इतर पोटॅशयुक्त खते : पोटॅशियम–मॅग्नेशियम सल्फेट (२५–३०% पोटॅश) हे लँगबेनाइटापासून तयार करतात. सिमेंट निर्मितीच्या भट्ट्यांतील वाया जाणारी धूळ, साखर व्यवसायात निर्माण होणारी मळी, राख, लोकर धुतल्यावर निघणारा मळ यांपासूनही पोटॅश मिळवितात.
जटिल खते : खनिज फॉस्फेटांवर नायट्रिक अम्लाची विक्रिया केल्यावर मिळणाऱ्या खतांना जटिल खते म्हणतात. ही खते फॉस्फोनायट्रिक (१६-२३-०), सल्फोनायट्रिक (१४-१४-०), कार्बोनायट्रिक (१६-१४-०), ओड्डा (२०-२०-०), पोटॅशियम सल्फेट (११-१२-१२), अमोनियम सल्फेट (१७-१३-०) इ. पद्धतींनी तयार करतात. कंसातील आकडे, त्या त्या पद्धतीने तयार होणाऱ्या खतातील नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांच्या प्रमाणाचे आहेत. ह्या सर्व पद्धतींमध्ये अम्लीकरणामुळे कॅल्शियम नायट्रेट तयार होऊ नये अशी काळजी घेतली जाते. कारण हे संयुग आर्द्रताशोषक व अस्थिर आहे. हे संयुग तयार होऊ नये म्हणून फॉस्फोरिक अम्ल, सल्फ्यूरिक अम्ल, अमोनियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट इत्यादींचा उपयोग करून कॅल्शियमाचे कॅल्शियम सल्फेट, डाय कॅल्शियम फॉस्फेट इत्यादींत रूपांतर करून त्याचे स्थिरीकरण करतात. भारतात तुर्भे येथील कारखान्यात सल्फोनायट्रिक आणि कार्बोनायट्रिक या दोन्ही पद्धतींनी जटिल खत (नायट्रोफॉस्फेट) तयार करतात.
दुय्यम पोषक द्रव्ये : नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या तीन मूलद्रव्यांखेरीज इतर बऱ्याच मूलद्रव्यांची वनस्पतींच्या वाढीस आवश्यकता असते. ही मूलद्रव्ये कमी प्रमाणात लागत असल्याने त्यांचा समावेश असलेल्या खतांना दुय्यम मूलद्रव्ययुक्त खते म्हणतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक ही तीन मूलद्रव्ये दुय्यम स्वरूपाची होत. नायट्रोजनयुक्त, फॉस्फरसयुक्त आणि पोटॅशयुक्त खतांबरोबर काही वेळा ती दिली जातात.
कॅल्शियम : वनस्पतींच्या वाढीस मदत, रोग प्रतिकार, चयापचयामध्ये निर्माण होणाऱ्या अम्लांचे उदासिनीकरण करणे इत्यादींसाठी वनस्पतींना कॅल्शियम लागतो. विशेषतः शिंबावंत वनस्पतींना त्याची जरूरी असते.जमिनीची अम्लता कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डोलोमाइट, जिप्सम किंवा चुनखडी यातून तसेच सुपरफॉस्फेट, नायट्रोचॉक, नायट्रोलाइमस्टोन इ. खतांतून कॅल्शियमाचा वनस्पतींना पुरवठा होतो.
मॅग्नेशियम : हे मूलद्रव्य हरितद्रव्याचा (क्लोरोफिलाचा) एक घटक आहे. वनस्पतींमध्ये फॉस्फेटांच्या वहनास, कार्बोहायड्रेटे व न्यूक्लिओप्रथिने [ → प्रथिने] यांच्या निर्मितीस तसेच बी तयार होण्यास व त्यांचा विकास होण्यास आणि त्यात स्निग्ध पदार्थ तयार होण्यास मॅग्नेशियमाची मदत होते. नायट्रोलाइमस्टोन, सुपरफॉस्फेट इ. नायट्रोफॉस्फेटांत वापरण्यात येणाऱ्या काही स्थिरकारकांत मॅग्नेशियम अपद्रव्याच्या स्वरूपात असतो. त्यामुळे या खतांबरोबरच ते जमिनीस मिळते. जमिनीची अम्लता कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डोलोमाइटातून तसेच सल्फेट ऑफ मॅग्नेशियातून ते जमिनीस मिळते.
गंधक : याची वनस्पतीच्या श्वासोच्छ्वासास मदत होते. ते कमी असल्यास हरितद्रव्य तयार होण्यास वेळ लागतो व झाडे पिकट पिवळसर रंगाची दिसतात. मोहरी, कांदा, लसूण इत्यादींचे वास आणि चव गंधकावरच अवलंबून असतात. वनस्पतींमध्ये गंधक प्रथिने, ॲमिनो अम्ले, ग्लुटाथायोन, ट्रायपिटाइड इत्यादींमध्ये आढळते. गंधक जमिनीस सुपरफॉस्फेट, अमोनियम सल्फेट, जिप्सम यांच्याद्वारे तसेच मूलद्रव्याच्या स्वरूपात दिले जाते.
सूक्ष्म पोषक द्रव्ये : वर उल्लेख केलेल्या मूलद्रव्यांव्यतिरिक्त तांबे, बोरॉन, लोह, मँगॅनीज, जस्त, मॉलिब्डेनम इ. मूलद्रव्यांचीही वनस्पतींना अल्प प्रमाणात आवश्यकता असते. त्यांचा वनस्पतींना कशाप्रकारे उपयोग होतो हे निश्चित कळलेले नाही. तथापि वनस्पतींच्या वाढीचे नियमन करणाऱ्या एंझाइमांचे कार्य ह्याच्यावर अवलंबून असते असे मानले जाते. नवीन संकरित पिकांच्या बाबतीत अशा पोषक द्रव्यांची गरज अधिक असल्याचे आढळून आल्यामुळे ती खतांद्वारे जमिनीला पुरवावी लागतात.
तांबे : याच्या कमतरतेने वनस्पतींच्या पानातील कोशिका (पेशी) तुटतात. मोरचूद (कॉपर सल्फेट) या तांब्याच्या संयुगापासून २३–३५% तांबे मिळते. ते जलविद्राव्य असून पानांवर फवारून तसेच जमिनीतून दिल्यास वरील दोष नाहीसा होतो.
बोरॉन : वनस्पतीत प्रथिने तयार होण्यासाठी याचा उपयोग होतो. याच्या अभावी टोकाच्या कळ्या मरतात. मुळे, गाजरे यांसारख्या पिकांचे तंतू तुटतात. हे टाकणखाराच्या (बोरॅक्स वा सोडियम बोरेट याच्या) मार्फत फवारून देतात. हे जलविद्राव्य असून त्यापासून १०·६% बोरॉन मिळते.
मॉलिब्डेनम : याच्या अभावी टोमॅटोची झाडे टिकत नाहीत. हे सुपरफॉस्फेट वा सोडियम मॉलिब्डेट व अमोनियम मॉलिब्डेट यांच्याद्वारे देतात. ही दोन्ही संयुगे जलविद्राव्य असून फवारून देतात. यातून ३७–३९% मॉलिब्डेनम मिळते.
इतर सूक्ष्म मूलद्रव्ये : वर उल्लेख केलेल्या मूलद्रव्यांशिवाय सोडियम, सिलिकॉन, क्लोरीन, ॲल्युमिनियम व कोबाल्ट ही मूलद्रव्ये वनस्पतीत आढळतात. पण त्यांची उपयुक्तता अद्यापि निश्चितपणे सिद्ध झालेली नाही. पोटॅशियम उपलब्ध नसला तर सोडियम वनस्पतींच्या वाढीस मदत करतो. पण पोटॅशियम मिळाल्यावर सोडियमाची उपयुक्तता कमी झाल्याचे आढळले. सिलिकॉनाच्या अभावी गवतांना बुरशीसारखे रोग होतात. वनस्पतीतील अँथोसायनोजेन रंगद्रव्याचा क्लोरीन एक घटक आहे. काही वनस्पतींत ॲल्युमिनियम आढळते, पण त्याचा निश्चित परिणाम माहीत नाही. कुरणातील जमिनीत कोबाल्ट अगदीच उपलब्ध नसेल, तर त्यामधील गवतावर जनावरे नीट पोसली जात नाहीत, असे दिसून आले आहे.
शेतकरी मित्र
विजय भुतेकर सवणा
9689331988
Published on: 11 January 2022, 02:43 IST