भारतात वा महाराष्ट्रात हे पीक वर्षभर घेता येते व उत्तम प्रतीचे गड्डे मिळतात. पारंपरिक लागवड पद्धतीमध्येही उच्च तंत्रज्ञान वापरून कडक उन्हाळ्याचे दोन-तीन महिने सोडल्यास वर्षभर लागवड करता येते.
लेट्युस भाजी खाण्याची पद्धत :
जगभरात लेट्युसच्या निरनिराळ्या जातींच्या, प्रकारांच्या पानांचा उपयोग सॅलड म्हणून आहारात करतात. कच्च्या स्वरूपात पाने बारीक चिरून खाल्ली जातात. अथवा ॲस्परागस, झुकिनी या भाज्यांच्या तुकड्यांमध्ये मिसळूनही उपयोग केला जातो. भारतातही आहारात असाच उपयोग केला जातो.
लेट्युसमधील पोषक द्रव्यांचे प्रमाण :
लेट्युसमध्ये फॉस्फरस, सोडियम, गंधक, मॅग्नेशियम आदी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जीवनसत्त्वे अ, बी-६, क, इ आणि के, प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध तसेच तंतूमय पदार्थ पुरेशा प्रमाणात आढळतात.
लेट्युस भाजीच्या जाती वा प्रकार :
लेट्युसचे बरेच उपप्रकार असून ते असे आहेत.
क्रिस्पहेड किंवा आइसबर्ग
बटरहेड बिब टाइप किंवा ग्रीन्स
कॉस किंवा रोमेन
स्टेम लेट्युस किंवा सेलेट्युस
क्रिस्पहेड किंवा आइसबर्ग लेट्युस :
हा लेट्युस पूर्वीपासून परदेशात आणि भारतात सर्वांत जास्त प्रमाणात उत्पादनाखालील प्रकार आहे. क्रिस्पहेड किंवा लेट्युस आइसबर्ग म्हणजेच जास्त घट्ट न झालेला कोबीसारखा गड्डा. त्याच्या पानांच्या कडा कुरतडल्यासारख्या असतात.पाने अतिशय कुरकुरीत, चवीने गोडसर व रसाळ असतात. पाने अतिशय पातळ असतात.एकंदरीत लेट्युसचा कोणताही प्रकार असो, तो तोंडात टाकल्यावर त्याचा कुरकुरीतपणा अनुभवयाचा! पाने रसाळ असल्यामुळे ती खाताना तोंडातच विरघळतात.
भारतातील स्थानिक बाजारपेठेत आइसबर्ग प्रकारातील गड्ड्यांना मागणी जास्त आहे. भारतात जेथे जेथे परदेशी भाजीपाला लागवडीखाली क्षेत्र आहे तेथे आइसबर्ग लेट्युसची लागवड हमखास असतेच.
बटर हेड लेट्युस :
आइसबर्गच्या खालोखाल या लेट्युसची लागवड केली जाते. या प्रकारात गड्डा तयार होतो; परंतु या गड्ड्यातील पाने जाड, मऊ असून कडा एकसारख्या असतात. पाने कुरकुरीत असून चव गोडसर असली तरी तोंडात टाकल्यावर बटरसारखीच विरघळतात. म्हणूनच या प्रकारच्या लेट्युसला बटरहेड लेट्युस म्हणतात. या गड्ड्यातील पानांची रचना गुलाबाच्या पाकळ्यांच्या प्रकारची असते. या प्रकारात हिरवी लाल तांबूस रंगाची पाने असे दोन उपप्रकार आहेत.
बीब टाइप किंवा ग्रीन्स :
या प्रकारातील जाती आपल्याकडे फारशा लागवडीखाली नसून बाजारपेठेतील मागणीनुसार पिकाचे नियोजन करावे.
हा प्रकार म्हणजे बटरहेडसारख्या लेट्युसचा कोवळा गड्डा तयार होत असतानाच तो गड्डा काढला जातो. या गड्ड्यांनाच बिबटाइप लेट्युस म्हणतात.
कॉस किंवा रोमेन :
या प्रकारच्या लेट्युसमध्ये गड्डा तयार होत नाही. परंतू अन्य लेट्युसप्रमाणेच या प्रकारे सुरवातीची वाढ होते. सुरवातीस पाने गुलाबाच्या पाकळ्यांच्या आकारात वाढत असतात. ही पाने चायनीज कोबीप्रमाणे लांब, उभट, रुंद, जाड, कुरकरीत व रसाळ असतात.
स्टेम लेट्युस :
या प्रकारात जमिनीपासून उभट खोड वाढते व त्याला दाटीने पाने येतात. ग्राहकांकडून या प्रकारालाही मागणी असते.
Published on: 23 March 2022, 06:09 IST