हिरवळीचे खत
जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांची फार गरज आहे. परंतु त्याची उपलब्धता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रिय खतांची गरज भागविण्यासाठी हिरवळीची खते शेतीला व शेतकरयांना वरदान ठरू शकतात. हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती किंवा पानासह कोवळ्या फांद्या बाहेरून आणून जमिनीत गाडणे होय. हि पिके जमिनीत अन्न पुरवठ्याबरोबर जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत करतात.
हिरवळीचे खते दोन प्रकारचे आहेत-
१- हिरवळीच्या खताचे पिक शेतात वाढवून फुलोरयापूर्वी ते जमिनीत गाडणे.[उदा.बोरू , ढेंचा, चवळी इत्यादी.]
२-हिरवळीच्या खताचे पिक शेताबाहेर बांधावर किंवा पडीक जमिनीवर वाढवून त्याच्या कोवळ्या फांद्या व पाने शेतात आणून जमिनीत मिसळणे, गाडणे [उदा. गिरिपुष्प, सुबाभूळ, शेवरी इत्यादी.]
ढेंच्या लागवड अशी करा.
वखराच्या [कुळवाच्या ] आडव्या उभ्या पाळ्या देऊन शेत तयार करून घ्यावे. त्यानंतर दीड ते दोन फुट अंतरावर सऱ्या काढून सरीच्या दोन्ही बाजूस ढेंच्या बियाणे पेरावे. एकरी २० ते २५ किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे. १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ पाणी द्यावे. नांगर किंवा ट्रक्टरने नांगरून जमिनीत गाडावे. १०-१२ दिवसानंतर वखराच्या [कुळवाच्या] आडव्या उभ्या पाळ्या देऊन सर्व अवशेष जमिनीत मिसळून पुढील पिकासाठी शेत तयार करावे.
ढेंच्या हिरवळीच्या खताची वैशिष्ट्ये
-ढेंच्या हलक्या , मध्यम , भारी आणि क्षारयुक्त जमिनीतही भरपूर वाढतो.
-ढेन्च्याचे वाढीवर कमी ओल किंवा अधिक पाणी ह्याचा फारसा वाईट परिणाम होत नाही.
-ढेन्चाची वाढ झपाट्याने होत असल्याने केवळ ४५-५० दिवसांनतर जमिनीत गाडल्यामुळे पूर्णपणे कुजून त्याचे खत पुढील पिकास उपलब्ध होते.
-ढेन्चापासून प्रती एकर ८० क्विंटल हिरवळीचे खत मिळते जे एकरी २२४ क्विंटल शेणखताएवढा फायदा शेतकऱ्यास देते. [१ क्वि. हिरवळीचे खत = २.८ क्वि. शेणखताचे सत्त्व]
-ढेंचा कुजत असतांना सूक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीस चालना मिळून त्यापासून पोषक सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते, पर्यायाने जमिनीची प्रत सुधारते.
-ढेन्चामुळे भरपूर कॅल्शियम उपलब्ध होऊन जमीन चिबड करणारे पाण्यात न विरघळणारे सोडीयमचे क्षार द्राव्य अवस्थेत येऊन पावसाचे वा ओलिताचे पाण्याद्वारे त्यांचा निचरा होऊन अशा जमिनींची सुपीकता वाढते.
-ढेंचा द्विदलवर्गीय पिक असल्याने वातावरणातील नत्र जमिनीत साठवून ठेवण्यास मदत करते.
-ढेन्चामुळे पुढील पिकास प्रती एकर ३५ किलो नत्र , ७.३ किलो स्फुरद , १७.८ किलो पालाश , १.९ किलो गंधक , १.४ किलो कॅलशियम, १.६ किलो म्याग्नीशियम हि अन्नद्रव्ये आणि जस्त- २५ पी.पी.एम., लोह-१०५ पी.पी.एम.,तांबे - ७ पी.पी.एम. हि सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
शेतकरी मित्र
विजय भुतेकर सवणा
9689331988
Published on: 07 February 2022, 05:49 IST