Agripedia

प्रगत देशांत द्रवरूप खत देण्याच्या पद्धतीला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या पद्धतीचे चार प्रकार आहेत.

Updated on 08 January, 2022 1:33 PM IST

प्रगत देशांत द्रवरूप खत देण्याच्या पद्धतीला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या पद्धतीचे चार प्रकार आहेत. (१) प्रारंभक विद्राव : सामान्यत: N—P2O5 — K2O यांच्या १ : २ : १ आणि १ : १ : २ प्रमाणातील विद्रावात भाजीपाल्याची रोपे बुडवून लावतात. त्यामुळे खताची अल्प मात्रा दिली जाते. तसेच पोषक द्रव्ये मुळांना लगेच मिळतात आणि त्यांचे प्रमाण अल्प असल्यामुळे रोपांना इजा होत नाही. या पद्धतीत मजुरी वाढते व फॉस्फरसाचे स्थिरीकरण जास्त होते. (२) खताचा फवारा : या पद्धतीत खताचा फवारा पानांवर देतात. यामध्ये कोणत्याही एक किंवा अधिक पोषक द्रव्यांचा अल्प प्रमाणातील फवारा देतात. त्यामुळे ती पिकाला लवकर उपलब्ध होतात. मात्र खताचे प्रमाण जास्त झाल्यास पानांचे करचळण होण्याची भीती असते. गहू, ऊस यांसारख्या पिकांवर यूरियाचा फवारा देणे भारतात प्रचलित झाले आहे. (३) जमिनीत द्रवरूप खत देणे : खास अवजारांच्या साहाय्याने निर्जल अमोनिया आणि द्रवरूप नायट्रोजन जमिनीत घालतात. 

खत बियांच्या खाली सु. १० सेंमी. दिले, तर पिकाला इजा होत नाही व अमोनियाही वाया जात नाही. या पद्धतीने स्वस्त नायट्रोजनाचा वापर करण्यात येतो. अमेरिकेत ही पद्धती फार लोकप्रिय आहे. क्वीन्सलँड (ऑस्ट्रेलिया) येथे उसाला या पद्धतीने खत देतात. (४) सिंचाई – पाण्यातून खत देणे : यामध्ये पाण्यात विद्राव्य सरळ किंवा मिश्रखते पाटाच्या पाण्यात टाकतात. त्यामुळे जमिनीला खताचा विद्राव मिळतो. यासाठी जादा मजुरी लागत नाही. सामान्यत: नायट्रोजनयुक्त खते या पद्धतीने देतात.

खतांचे प्रकार : खते दोन प्रकारांची आहेत. (१) नैसर्गिक आणि (२) कृत्रिम रीत्या बनविलेली व रासायनिक. पहिल्या प्रकारात शेणखत, राख, सोनखत, कंपोस्ट, ग्वानो, वाहितमल (सांडपाणी), हिरवे खत, पेंड, रक्त, हाडे, मासे इ. खतांचा समावेश होतो. ही खते घन स्वरूपात वापरतात. दुसऱ्या प्रकारात नायट्रोजनयुक्त, फॉस्फरसयुक्त व पोटॅशियमयुक्त आणि इतर पोषक द्रव्यांनी युक्त खतांचा समावेश होतो. ही खते घन, द्रव व वायू स्वरूपांत वापरतात. शिवाय ही खते, पहिल्या प्रकारच्या खतांशी विशिष्ट प्रमाणात मिसळून मिश्रखते तयार करण्यात येतात. अशी खते दाणेदार स्वरूपातही तयार करतात.

नैसर्गिक खते : वनस्पतिजन्य पदार्थ, प्राण्यांचे मलमूत्र व शेतातील टाकाऊ पदार्थ यांच्या अपघटनाने (मूळ रेणूचे लहान तुकडे झाल्याने) तयार होणाऱ्या पदार्थांस नैसर्गिक खते किंवा भरखते असे म्हणतात. ही खते जमिनीची उत्पादकता वाढवितात. जमिनीत त्यांचे पुढे अपघटन होते व त्यामुळे सुपीकतेत वाढ व मृदेच्या संरचनेत फरक होतो. तसेच मशागतीस फायदा होतो. भरखतामुळे मृदेची जलशोषकता वाढते, तसेच मृदेची धूप होण्यास, ती उष्णतेमुळे कडक होण्यास वा तिचे पोपडे होण्यास रोध होतो. मृदेच्या पृष्ठभागावर भरखत फवारल्यास बाष्पीभवनाने होणारा आर्द्रतेचा ऱ्हास कमी होतो.

वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषांपासून मिळणाऱ्या व विविध संघटन असलेल्या काळसर व सापेक्षत: स्थिर असलेल्या पदार्थास ह्यूमस म्हणतात. भरखते भरपूर प्रमाणात वापरल्यास मृदेतील ह्यूमसाची पातळी कायम राखण्यास मदत होते. ह्यूमसाचे सूक्ष्मजैविक व रासायनिक विक्रियांमुळे अपघटन होऊन त्यांपासून वनस्पतींना आवश्यक अशी पोषक द्रव्ये आवश्यक त्या प्रकारात तयार होतात. मृदेतील सेंद्रीय पदार्थांमुळे सूक्ष्मजंतूंना आवश्यक असे अन्न पुरविले जाते व त्यामुळे तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तसेच त्यामुळे पोषक द्रव्ये मृदेत राखण्यास व ती पावसामुळे मुरण्यास मदत होते. भरखतांमुळे मृदेतील उष्णतेचे नियंत्रण होण्यास, वनस्पतींना अपायकारक असलेल्या पदार्थांचा विषारीपणा नष्ट करण्यास, पोषक द्रव्यांच्या स्थिरीकरणास विलंब होण्यास इ. प्रकारे मदत होते.

वनस्पतींना लागणाऱ्या एकूण नायट्रोजनापैकी आणि फॉस्फरसापैकी ९०% नायट्रोजन व ५०%फॉस्फरस त्या भरखतांतून घेतात, असे आढळून आले आहे. तसेच इतर काही पोषक द्रव्येही त्यातून मिळतात. रासायनिक खतांशी तुलना करता भरखतांतून पोषक द्रव्ये कमी प्रमाणात तसेच मृदेत त्यांचे अपघटन सुरू झाल्यावरच मिळतात.

भरखतांचे त्यांच्या वापरानुसार दोन गट पडतात. (१) मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणारी. उदा., शेणखत, कंपोस्ट, सांडपाणी, हिरवे (हिरवळीचे) खत इ. ह्यांपासून पोषक द्रव्ये सापेक्षत: कमी प्रमाणात मिळतात, पण त्यांच्यामुळे ह्यूमसाचे प्रमाण वाढते. (२) संहत (आवश्यक घटकांचे प्रमाण जास्त असणाऱ्या) स्वरूपाची भरखते. उदा., पेंड, रक्त, हाडे, मासे, ग्वानो इ. भरखतांमध्ये मिळणाऱ्या पोषक द्रव्यांचे प्रमाण आहे.

 

शेतकरी मित्र

English Summary: Know about give liquids fertilizer
Published on: 08 January 2022, 01:33 IST