चिखली : पक्षाने संधी दिल्यास आगामी पंचायत समिती निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सदस्य तथा कृषी विषयात शिक्षण घेतलेला विद्यार्थी ऋषिकेश म्हस्के पाटील यांनी व्यक्त केला. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात त्यांनी प्रसार माध्यमांकडे आपली भूमिका व्यक्त केली.
मूळचे चिखली तालुक्यातील गांगलगाव येथील ऋषिकेश म्हस्के गेल्या आठ वर्षांपासून शेतकरी, विध्यार्थी, सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत.
गेल्याच वर्षी त्यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. ऋषिकेश म्हस्के यांचे Bsc (Agri), बायोटेक्नॉलॉजीपर्यंत शिक्षण झालेले आहे. उच्चशिक्षित असल्याने कृषी क्षेत्रातील कुठल्याही मोठ्या कंपनीत त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती. मात्र नोकरीच्या मागे न लागता त्यांनी स्वतःला शेतकरी चळवळीत झोकून दिले. शेतकरी कर्जमाफी, पीककर्ज, नुकसान भरपाई यासह इतर मुद्द्यांवर त्यांनी विविध आंदोलने केली आहेत. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे.
रास्ता रोको, निदर्शने, धरणे, उपोषण यामाध्यमातून त्यांनी वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधले आहे. विद्यार्थी शिष्यवृत्ती, फी माफी, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खरी जाण असून तेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतात. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य न्याय देता येईल यासाठी ऋषिकेश म्हस्के यांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे.
जनतेची सेवा करण्यासाठी आगामी पंचायत समिती निवडणूक लढण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. लोकांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. गोरगरीब घटकातील नागरिकांना वेळोवेळी मदत करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. तरुण कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या कार्याची दखल घेऊन संधी देईल, असा त्यांना विश्वास आहे.
Published on: 01 February 2022, 05:18 IST