खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले असले तरी वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. गेल्या चार दिवसांपासून मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात तर वाढ होतच आहे पण बाजारपेठेत नव्याने दाखल होत असलेल्या तुरीच्याही दरात वाढ होतbअसल्याचे पाहवयास मिळत आहे.
सोयाबीन आणि तुरीसाठी लातूर बाजारपेठ ही महत्वाची आहे. कारण याच परिसरात तेल प्रक्रिया उद्योग आणि दाळ मिलची संख्याही अधिक आहे. त्यामुळे लातूरच्या मार्केटवरच इतर बाजार समित्यांमधील दर ठरतात.
गेल्या चार दिवसांपासून सोयाबीनच्या दरात
250 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनचे दर हे स्थिरावलेले होते. आता कुठे त्यामध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे तुरीच्या दरातही वाढ होत आहे.
नव्याने दाखल होत असलेल्या तुरीला 6 हजार 100 रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली तरी आता वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा आहे.
म्हणून खुल्या बाजारपेठेलाच पसंती
नाफेडच्यावतीने तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. 1 जानेवारीपासून राज्यात 186 केंद्र सुरु करण्यात आली असून केंद्र सुरु झाल्यापासून खुल्या बाजारात तुरीचे दर 400 रुपयांनी वाढलेले आहेत.
खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 तर खुल्या बाजारपेठेत 6 हजार 100 रुपये दर मिळत आहे. मात्र, खरेदी केंद्रावरील नियम-अटी यामुळे शेतकरी थेट खुल्या बाजारातच विक्री करीत आहे. शिवाय आर्द्रतेच्या नावाखाली तुरीची खरेदी केली जात नाही.
शिवाय खरेदी झाली तरी वेळेत पैसे मिळत नाहीत. सुविधांपेक्षा अडचणी अधिक असल्यामुळे शेतकरी खरेदी केंद्राकडे पाठव फिरवत आहे.
सोयाबीनचे दर वाढले की आवकवर परिणाम
गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीनचे दर हे 6 हजारावरच स्थिरावले होते. मात्र, गेल्या चार दिवसांमध्ये 6 हजार 350 पर्यंत दर गेले आहेत. त्यामुळे आता साठवणूकीतील सोयाबीन हे बाजारात येत आहे.
त्यामुळेच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी सोयाबीनची आवक 22 हजार पोते एवढी झाली होती तर 6 हजार 350 रुपये दर मिळाला होता. हंगामाची सुरवात निच्चांकी दराने झाली असली तरी दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?
खरिपातील सोयाबीन आणि तुरीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता साठवणूकीतल्या सोयाबीनची विक्री करणे गरजेचे आहे. भविष्यात उन्हाळी सोयाबीनची आवक सुरु झाली तर याचा दरावर परिणाम होऊ शकतो.
शिवाय नव्याने बाजारात दाखल होत असलेल्या तुरीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण 10 पर्यंत कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.
𝐄-शेतकरी अपडेट्स
Published on: 12 February 2022, 10:13 IST