कलिंगड या पिकाचे उत्पादन व दर्जा वाढविण्याकडे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. उत्पादन व प्रत सुधारण्यासाठी पुढील लागवडी संबंधीच्या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.
हवामान व पेरणीची वेळ
कलिंगडाच्या पिकास उष्ण व कोरडे हवामान तसेच भरपूर सूर्यप्रकाश पोषक असतो. कमी तापमानाचा पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. तसेच अति दमट हवेमध्ये पानावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. तथापि कोकणातील हवामानात योग्यवेळी पेरणी केल्यास हे पीक चांगले येते. या पिकाला लागणा-या हवामानाचा विचार केला असता, कोकणात या पिकाची पेरणी १५ ऑक्टोबर ते १ डिसेंबरच्या दरम्यान करावी. यानंतर केलेल्या पेरणीमुळे फळमाशींचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच फळे तडकण्याचे
प्रमाण सुध्दा वाढते असे आढळून आले आहे. महाराष्ट्रातील इतर भागात कलिंगडाची पेरणी जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान करावी.
जमीन आणि पूर्वमशागत
या पिकाच्या लागवडीसाठी वाळूमय, मध्यम काळी पोयट्याची निचरा न होणा-या जमिनीत या पिकाची वाढ योग्य प्रकारे होत नाही. जमिनीचा आम्लता निर्देशांक सर्वसाधारण ५.५ ते ७ च्या दरम्यान असावा. कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभ्या दगडाच्या जमिनीत तसेच महाराष्ट्रातील इतर भागात मध्यम प्रतिच्या चांगल्या निच-याच्या जमिनीत हे पीक उत्तम प्रकारे येते. कलिंगडासाठी जमीन तयार करण्यासाठी खरिपातील पिकांच्या काढणीनंतर योग्य ओलावा असताना जमीन उभी-आडवी नांगरावी व ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. शेतातील धसकटे व काडीकचरा वेचून नष्ट करावा. लागवडीसाठी ४ मीटर अंतरावर रुंद स-या काढाव्यात. सरीवर दोन्ही बाजूस १ मीटर अंतरावर ३0 सें.मी. लांब ३0 सें.मी. रुद व ३0 से.मी. खोल आकाराचे खड़े करून त्यात एक घमेली (सुमारे ४ किलो) चांगले कुजलेले शेणखत व १० टक्के मिथील पॅरॅथिऑन पावडर मिसळून खड्रा भरून घ्यावा.
जातीची निवड
योग्य जातीचे शुद्ध बियाणे निवडणे ही अधिक पिकोत्पादनाची गुरुकिल्ली आहे .कलिंगडच्या अनेक जातींपैकी शुगरबेबी , असाही यामोटो .अर्का माणिक, दुर्गापूर मीठ, मधू, मिलन, अर्का ज्योती इत्यादी जातींची लागवड किफायतशीर ठरते.
काही जातींची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत
शुगर बेबी
या जातीचे फळ मध्यम आकाराचे असून त्याचे वजन ३ ते ५ किलोपर्यंत भरते .बाहेरून फळ गडद हिरव्या रंगाचे दिसते .गर गर्द लाल रंगाचा असून गोड व खुसखुशीत असतो. फळाच्या उत्कृष्ट चवीमुळे व मध्यम आकारामुळे या जातीच्या फळास बाजारात अधिक मागणी असते. या जातीचे प्रती हक्टर सरासरी २५ ते ३0 टन उत्पादन मिळते. ही जात महाराष्ट्रात फारच लोकप्रिय झाली आहे.
असाही यामाटो - या जातीच्या फळाचे वजन ६ ते ८ किलो असते. फळे आकाराने मोठी असतात. फळाच्या सालीचा रंग फिकट हिरवा असतो व गर गुलाबी रंगाचा चवीला गोड असतो. या जातीपासून प्रती हेक्टरी २५ ते ३० टन उत्पादन मिळते.
अर्का माणिक
या जातीची फळे आकाराने गोल असतात, फळांचा रंग फिकट हिरवा असून त्यावर गर्द हिरव्या रंगाचे पट्टे असतात. फळातील गराचा रंग गर्द गुलाबी रंगाचा असून रवेदार आणि गोड असतो. केवडा व भुरी रोगास ही जात प्रतिकारक आहे. या जातीपासून प्रती हेक्टरी २0 ते २५ टन उत्पादन मिळते.
लागवड
वरीलप्रमाणे जमिनीची मशागत केल्यानंतर कलिंगडाची पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रती किलोस ३ ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. प्रत्येक भरलेल्या खड्ड्यात ४ ते ५ बिया एकमेकांपासून सर्वसाधारणपणे ४ ते ५ सें.मी. अंतरावर २ ते २.५ सें.मी. खोलीवर लावाव्यात. एक हेक्टर कलिंगडाच्या लागवडीसाठी साधारणत: २.५ किलो बियाणे पुरेसे होते. कलिंगडाच्या बिया साधारणतः ५ ते ६ दिवसात उगवतात. बियांचा रुजवा झाल्यानंतर दहा दिवसांनी रोपांची विरळणी करून प्रत्येक ठिकाणी दोन चांगली व जोमदार रोपे ठेवावीत. कलिंगडाच्या दोन ओळीतील जागा साधारणत: एक महिन्यापर्यंत इत्यादी अल्पावधीत येणारी पिके घेऊन उपलब्ध जागेत अधिक उत्पन्न मिळवता येते.
खत व्यवस्थापन
कलिंगडाचे पिक सेंद्रिय तसेच रासायनिक खाताना चांगला प्रतिसाद देते. या पिकाच्या जोमदार वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर करणे आवश्यक आहे. यासाठी योग्य वेळी व योग्य प्रमाणात खतांच्या मात्रा द्याव्यात.
शेणखत किंवा कंपोष्टखत २0 टन (80 बैलगाड़या)
स्फुरद ५० किलो, ३१२ किलो सुपर फॉस्फेटच्या स्वरूपात.
पालाश ५० किलो, ८३ किलो म्युरेट ऑफ पोटॅशच्या स्वरूपात
स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा व नत्राची १/३ मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी. उरलेल्या नत्राची मात्रा दोन समान हप्त्यात लागवडीनंतर अनुक्रमे एक महिन्यांनी (साधारणत: वेल टाकते वेळी) आणि दोन महिन्यांनी (फळ धारणेच्यावेळी) द्यावी.
आंतरमशागत
बुंध्याशी व वाफ्यावर असलेले तण दोन ते तीन वेळ काढावे. वेलांच्या बुंध्याजवळील माती खुरपून भुसभुशीत करावी व वेलास मातीची भर द्यावी. फाळांचे वाळवी व ओलाव्यापासून संरक्षण करण्यासाठी फळांच्या खाली भाताचा पेंढा किंवा सुके गवत पसरावे. तसेच प्रखर सूर्यप्रकाशापासून फळांचे संरक्षण करण्यासाठी फळे गवताने किंवा भाताचे पेंढ्याने झाकून घ्यावीत. वेली पाण्याच्या पाटापासून वाफ्यावर वाढतील याची काळजी घ्यावी.
पाणी व्यवस्थापन
या पिकास नियमित भरपूर पाण्याचा पुरवठा करणे अत्यंत आवश्यक असते. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे फळे तडकतात व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. कोकणातील जांभ्या दगडाच्या जमिनीत सर्वसाधारणपणे २ ते ५ दिवसांनी व मध्यम प्रकाराच्या जमिनीत ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. फळे कुजू नयेत म्हणून पाणी देताना फळाशी पाण्याचा संबंध येणार नाही याची दक्षता घ्यावी. फळांच्या वाढीच्या काळात वेलांना पाण्याचा ताण बसणार नाही, याची काळजी घ्यावी.
रोग आणि किडनियंत्रण
कलिंगडावर मर, भुरी, केवडा आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. भुरी रोग झालेली पाने दोन्ही बाजूने पांढरी भुकटी टाकल्यासारखी दिसतात तर केवडा रोगाच्या उपद्रवामुळे पानांवर पिवळसर तपकिरी रंगाचे ठिपके आढळतात. करपा रोगामुळे पानावर काळसर ठिपके येतात आणि पाने करपल्यासारखी दिसतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी काबॅन्डॅझिम १ ग्रॅम १ लिटर पाण्यात किंवा डायथेन एम-४५ हे २ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारावे. मर रोगापासून संरक्षणासाठी बियाणास थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची १ किलो बियाणास ३ ग्रॅम प्रमाणे प्रक्रिया करावी.
फळाची काढणी
अपरिपक्व किंवा अतिपक्व फळे काढल्यास प्रतिवर व परिणामी बाजारभावावर परिणाम होतो. फळे सर्वसाधारणपणे जातिपरत्वे पेरणीपासून ९० ते १00 दिवसांनी काढणीस तयार होतात. फळांची काढणी सकाळी करावी. त्यामुळे त्यांचा ताजेपणा व आकर्षकपणा टिकून राहतो व ती चवीला चांगली लागतात. फळ काढणीला तयार झाले किंवा नाही हे ओळखण्यासाठी खालील आडाखे ध्यानात घेणे आवश्यक आहे
फळावर बोटाने टिचकी मारल्यास बद्रद असा आवाज येतो तर अपक्र फळाचा टणटण असा आवाज होतो.
तयार फळांचा जमिनीलगतचा रंग किंचित पिवळसर होतो.
तयार फळांच्या देठाजवळील लतातंतूसुकलेली असते
उत्पादन वरीलप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतींचा व सुधारित जातींचा अवलंब केल्यास जातीनुसार या पिकाचे उत्पादन सरासरी २५ ते ३५ टन प्रती हेक्टरी मिळते.
विनोद धोंगडे नैनपुर
ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर
Published on: 13 January 2022, 03:02 IST