Agripedia

फणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये नैसर्गिकरीत्या दोन प्रकार आढळतात एक म्हणजे कापा,

Updated on 08 March, 2022 7:53 PM IST

फणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये नैसर्गिकरीत्या दोन प्रकार आढळतात एक म्हणजे कापा, तर दुसरा बरका. गरे म्हणून कापा फणसाला प्राधान्य दिले जाते. फणसामध्ये नर व संयुक्त (मादी फुले) वेगवेगळी येतात पण ती एकाच झाडावर असतात. नर फुले ही गोलसर असतात आणि हाताने स्पर्श केल्यानंतर गुळगुळीतपणा जाणवतो, तर मादी फुले लांबट असून काटेरी दिसतात. फणसाच्या फांद्यांवर फुले लागतात पण बहुतेकवेळा मुख्य खोडावर म्हणजेच मधल्या जाड्या खोडावर किंवा मुख्य खोडालगतच्या आलेल्या मोठ्या फांद्यांवर जी मादी फुले असतात, त्यांचेच रूपांतर फळांमध्ये होते.

फांद्या जेवढ्या जाड असतील, तेवढी सशक्त, जोमदार फुले लागतील, त्यामुळे उत्पादनातदेखील वाढ मिळेल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कापा आणि बरका ही दोन्ही प्रकारची झाडे महत्त्वाची आहेत.

फणसाच्या फांद्या जाड करण्यासाठी संतुलित अन्नपुरवठा हा सगळ्यात चांगला उपाय आहे. एका पूर्ण वाढलेल्या फणसाच्या झाडाला सुमारे २० ते ३० किलो शेणखत किंवा कंपोस्ट द्यावे.५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद २५० ग्रॅम पालाश प्रति झाडाला द्यावे.

फणसाच्या झाडाला खोडावर फुले व फळे लागतात म्हणजेच झाडाच्या स्वतःच्या सावलीत लागतात. बऱ्याचदा असे आढळून येते, की फुले आल्यानंतर नर फुले काळी पडून गळून पडतात. 

नर फुलांच्या लगत असलेली किंवा नर फुलाला चिकटून असलेली मादी फुलेदेखील काळी पडतात. जर फणसाच्या खोडावर सावलीचे प्रमाण जास्त असेल, तर अशा ठिकाणी फळे काळी पडण्याचे प्रमाण वाढते म्हणूनच फणसाच्या मधल्या खोडावर पडणाऱ्या सावलीचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

झाडाची सरसकट छाटणी न करता तुरळक प्रमाणात फांद्यांची विरळणी केली तर झाडाच्या आत पडणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण वाढेल ही विरळणी करताना कमकुवत फांद्यांची करावी. 

साधारण नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांत फुले लागतात. फलधारणेनंतर फळ तयार होण्यासाठी सुमारे १३० ते १४० दिवसांचा कालावधी लागतो. नवीन लागवड करताना सुधारित जातींची निवड करावी. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने फणसाची "कोकण प्रॉलिफिक' ही जात विकसित केली आहे. या जातीची फणसाची फळे मध्यम आकाराची असून, पावसाळ्यातही गर चांगला राहतो.

फांद्या जेवढ्या जाड असतील, तेवढी सशक्त, जोमदार फुले लागतील, त्यामुळे उत्पादनातदेखील वाढ मिळेल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कापा आणि बरका ही दोन्ही प्रकारची झाडे महत्त्वाची आहेत.

संकलन - प्रवीण सरवदे, कराड

English Summary: Jackfruit plant do also management
Published on: 08 March 2022, 07:53 IST