Agripedia

जून महिन्यात कोरडवाहू खरीप पिकांची पेरणी करण्यासाठी पिकांचे सुधारित बियाणे जिवाणूसंवर्धने

Updated on 02 April, 2022 10:23 AM IST

जून महिन्यात कोरडवाहू खरीप पिकांची पेरणी करण्यासाठी पिकांचे सुधारित बियाणे जिवाणूसंवर्धने व इतर निविष्ठांची जुळवाजुळव करतानाच कमी खर्चाची शाश्वत शेतीकरिता शेतकरी बंधूनी खालील बाबींचा अवलंब करणे निश्चित हितावह ठरेल.

१) शेतात शेततळे खोदले नसल्यास, पाऊस सुरू होण्यापूर्वी १ टक्क्यापेक्षा जास्त उताराचे २ हेक्टर शेतासाठी उताराचे शेवटी २० मीटर लांब, २० मीटर रुंद व ३ मीटर खोलीचे शेततळे जरूर खोदावे. यात साठवलेल्या पाण्याचा उपयोग अवर्षण काळात संरक्षित ओलीत देण्यासाठी करता येईल.

२) पावसाचे पाणी जागेवरच मुरण्याकरिता शेताची पेरणीपूर्व मशागत समतल (कंटूर) रेपेला समांतर किंवा मुख्य उताराला आडवी करावी. ही बाब यावर्षीपासून अत्यावश्यक समजून त्याचा अवलंब करावा.

३) शेवटच्या वखरणीपूर्वी शेतात हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत/कंपोस्ट/गांडूळ खत टाकावे. अर्धवट कुजलेले शेणखत शेतात टाकू नये.

४) खरीप पिकांच्या सुधारित (सरळ) जातीचे बियाणे मिळवावे. संकरित वाणांच्या तुलनेत सरळ वाणांच्या लागवडीचा खर्च कमी व निव्वळ नफा जास्त येतो. 

पुढील वर्षापासून या वाणांचे ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त जवळचे बियाणे पेरण्याकरिता या वर्षीच्या उत्पादनातून राखून ठेवण्याकरिता नियोजन करावे. कपाशी – एकेए-७, एकेए-८, पौकेव्ही रजत, एकेएच ०८१, ज्वारी एस.पी. व्ही. ६६९, सी एस व्ही १५, पी. व्ही. के. ४००, ८०१.

५) पेरणीपूर्वी सर्व बियाण्यांची (विशेषतः सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. ती आवश्यकतेपेक्षा कमी असल्यास त्या प्रमाणात पेरणासाठी जास्त बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते.

६) माती परीक्षण अहवालाचे शिफारशीनुसार रासायनिक खतांच्या मात्रा पेरणीचे वेळीच द्याव्यात. उशिरा दिल्यास पिकांचे उत्पादनात घट येते.

(७) मध्यम खोल व उथळ जमिनीत कपाशीची धूळ पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी..

(८) पिकलेल्या व जमिनीवर पडलेल्या निंबोळ्या गोळा करून, चांगल्या वाळवून, कोरड्या जागेत साठव व्यात. प्रत्येक शेतकऱ्याने यावर्षी कमीतकमी १०० किलो निंबोळ्या गोळा कराव्यात. यांचा ५ टक्के निंबोळी अर्काांची २ हेक्टर कपाशी/ तूर / हरभरा पिकांवर दोन फवारणी केल्यास रासायनिक किटकनाशकांचे खर्चात ५० ते ७५ टक्के बचत होईल.

९) जमिनीचे मगदुरानूसार पिकांची व वाणांची निवड करावी. उदा. हलक्या उथळ जमिनीत देशी कपाशीपेक्षा एकेएच ०८२ ही १५० दिवसात येणारी अमेरिकन जात पेरावी. १०) शिफारस केलेल्या वाणांचे प्रमाणित किंवा सत्यस्थिती दर्शक बियाणे पेरावे.

११) कोरडवाहूत सलग पिकाऐवजी खालील आंतर पिके घ्यावीत. कपाशी + ज्वारी तूर ज्वारी (६ १:२१ ओळी) सोयाबीन ज्वारी तूर ज्वारी (६:१:११ ओळी) सोयाबीन तूर (२:१ किंवा ४:२ ओळी)

कपाशी मूग किंवा उडीद (१:१ ओळी) १२) पेरणीपूर्वी बियाण्यास अनुक्रमे ट्रायकोडर्मा (४ ग्रॅम / किलो बियाणे) पीएसबी व जिवाणू संवर्धन (प्रत्येकी २० ग्रॅम / किलो बियाणे) लावावे.

१३) ३ टक्केपेक्षा जास्त उताराच्या जमिनीत वरच्या ७० टक्के क्षेत्रात कपाशी व खालच्या ३० टक्के क्षेत्रात खरीपात सोयाबीन व रबीत हरभरा पीक घ्यावे.

१४) मान्सूनपूर्व कपाशी पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीने ओलीत करावे.

१५) संत्रा मोसंबीचे झाडांना मृग बहाराकरिता दिलेला ताण, पाऊस न आल्यास हलके ओलीत देऊन तोडावा शिफारशीनुसार व मातीपरीक्षण अहवालानुसार सेंद्रिय व रासायनिकखते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत.

१६) आंबिया बहाराची फळे असलेल्या संत्रा झाडांना नियमित ओलीत करावे.

१७) फळझाडाचे खोडास १ मीटर उंची पर्यंत बोडोपेस्ट लावावी. (१ किलो मोरचूद १ किलो कळीचा चूना पाणी) १० लिटर

१८) मिरची, वांगी, टोमॅटो, फुलकोबी या पिकांची ४ ते ६ आठवडे वा वांग्याचे रोपाची शेतात लागवड करावी.

१९) भेंडी, वाल, चवळी, कारली, ढेमसे, भोपळा, कोहळे, दोडके, हळद व अद्रक यांची लागवड करावी.

२०) गॅलाडीया, झेंडू, मोगरा, शेवंती या फुलझाडाची लागवड करावी.

२१) जनावरांना पशुवैद्यकांचे सल्ल्यानुसार लसीकरण करावे.

English Summary: It will be very beneficial to adopt these practices for sustainable agriculture at low cost
Published on: 02 April 2022, 10:19 IST