Agripedia

अखिल भारतीय समन्वयीत जवस संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय नागपूर तर्फे आयोजित जवस प्रशिक्षण व शेतीदिन कार्यक्रम आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी

Updated on 01 March, 2022 2:09 PM IST

अखिल भारतीय समन्वयीत जवस संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय नागपूर तर्फे आयोजित जवस प्रशिक्षण व शेतीदिन कार्यक्रम आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील श्री संजय भुस्कडे यांच्या शेतात घेण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

 जवस पिकाचे औद्योगिक महत्त्व बघता महिलांनी यामध्ये एक उद्योजक म्हणून उतरावे, आजच्या आधुनिक युगात महिलांनी सुद्धा शेती पूरक व्यवसाय अंगीकारून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उद्योजक बनणे आवश्यक आहे. जवसा पासून जे 40 प्रकारचे पदार्थ बनविले जातात त्या पदार्थांकडे सुद्धा शेतकरी महिलांनी व महिला बचत गटांनी लक्ष देणे आवश्यक आहे. जवस पिकाची श्री संजय भुस्कडे यांच्या शेतातील प्रात्यक्षिक बघता हे पीक या भागात खूप चांगल्या प्रकारे येईल असे सिद्ध होते असे ते बोलले. कृषी विद्यापीठाची कृषी दैनंदिनी जवस पिका सोबतच इतर पिकांचीही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवते, 

तर या कृषी संवादिनी ला शेतकऱ्यांनी भगवतगिता समजून, गिता वाचन सारखे कृषी संवादिनी चे सुद्धा गावस्तरावर वाचन करावे ज्यामुळे नवीन तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचेल.

 सुहास भुस्कडे सारखे कृषि पदवीधर युवा शेतकरी बनुन आधुनिक शेती करत आहेत त्याबद्दल आम्हास अभिमान आहे व जवस सारखे पिक हाताशी धरून या पिकाच्या धागा निर्मिती व विवीध पदार्थांच्या निर्मिती मध्ये रस दाखविल्याबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जे मा. कुलगुरू डॉ. विलास भाले साहेबांच्या नेतृत्वात सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे व समूह पद्धतीने शेती करण्यास शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे, असे प्रतिपादन मा. डॉ. राजेंद्र गाडे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात केले.

 डॉ. वर्षा टापरे, प्रमुख, प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती यांनी याप्रसंगी बोलताना जवस पिकाचे हरभरा पिकामध्ये आंतरपीक घेण्यावर भर दिला. रब्बी हंगामातील हरभर्‍याचे क्षेत्र आपण पूर्णपणे कमी करू शकत नाही परंतु त्यामध्ये जर वीस टक्क्यापर्यंत आपण जवस पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव केला तर आपल्याला हरभरा पिकावर येणारी घाटेअळीवर सुद्धा नियंत्रण ठेवता येईल. 

फार्मर्स प्रोड्युसर कंपनी च्या माध्यमातून जवस पिकाचे बिजोत्पादन घेतल्यास जवसाचे बियाणे हे इतर शेतकऱ्यांना सुद्धा उपलब्ध होईल आणि कंपनीला विद्यापीठाच्या दराप्रमाणे म्हणजेच दहा हजार रुपये प्रति क्‍विंटल याप्रमाणे या जवस बियाण्याला दर मिळेल त्यामुळे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चा सुद्धा फायदा होईल.

 अमरावती जिल्ह्यात जवस हे पीक चांगल्या प्रकारे येत असल्याचे दिसून येत आहे आत्मा अंतर्गत आम्ही जवसाचे प्रात्यक्षिक वाढवण्याचा पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करू असे आश्वासन अमरावती प्रकल्प संचालक आत्मा कु. अर्चना निस्ताने यांनी दिले.

 अमरावती जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यात येणारे जवस हे पीक जुने आहे, आरोग्या साठी हे पीक अतिशय उत्तम असून आधुनिक पद्धतीने याची किमान एका एकर वर तरी शेतकरी बांधवांनी लागवड करावी व अधिक आर्थिक नफा मिळवावा. असे मनोगत मंडळ कृषी अधिकारी कु. निता कवाने यांनी व्यक्त केले.

 जवस पैदासकार डॉ. बिना नायर यांनी जवस पिकाचे महत्त्व व जवसाचे मानवी जीवनात आरोग्यदायी महत्त्व हे उपस्थित शेतकरी बांधवांना समजून सांगितले. 

आपल्या दररोजच्या आहारात 4 ते 6 ग्राम जवस आपण सेवन केले पाहिजे हे सांगितले. जवस पिका पासून धागा तयार करण्यावर संशोधन सुरू असून या संशोधनाचा शेतकरी बांधवांना पुढे नक्कीच फायदा होईल असे मत व्यक्त केले. महिला बचत गटांनी जवसा पासून तयार होणारे पदार्थ तयार करून त्यांची विक्री केल्यास त्यांना त्याचा भरपूर असा फायदा होईल असे सुद्धा समजाविले.

 जवस कृषी विद्यावेत्ता डॉ. जीवन कतोरे यांनी जवस पिकाची लागवड आधुनिक पद्धतीने कशी करावी, याबद्दल जमीन तयार करण्यापासून तर जवसाची काढणी करून, त्याची विक्री व्यवस्थे पर्यंतचे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. इतर रब्बी पिकांपेक्षा जवस हे पीक शेतकऱ्यांना कसे फायदेशीर आहे हे डॉ. कतोरे यांनी शेतकऱ्यांना जवस पिकाचा आर्थिक ताळेबंद त्यांच्या समोर ठेवून समजावून सांगितले.

 नांदगाव पेठ ता. जि. अमरावती येथील प्रगतीशील शेतकरी श्री संजय भुस्कडे यांचा यावेळी जवस पिकाचे परिसरात पुनर्जीवन करत असल्यामुळे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सुहास भुस्कडे सारखे कृषि पदवीधर युवा शेतकरी बनुन आधुनिक शेती करत आहेत त्याबद्दल त्यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

जवस पिकाच्या या प्रशिक्षण व शेती दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिल्पा रणनवरे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. स्वप्निल ठाकरे यांनी केले.

English Summary: It is necessary to cultivate linseed in group system- Dr. Rajendra Gade
Published on: 01 March 2022, 02:09 IST