कपाशी पिकाची सध्याची अवस्था पाहिली तर ती प्रामुख्याने पाते आणि फुल मोठ्या प्रमाणावर लागण्याची अवस्था आहे. पाते आणि फुल लागण्याच्या प्रमाणावर कपाशीचे पुढील काळातील उत्पादन अवलंबून असते. परंतु सध्याची स्थिती जर पाहिली तर बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे किंवा कपाशीवर या कालावधीतच विविध पिकांच्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तसेच हवामानातील अचानक होणारी बदल देखील कपाशी पिकातील पाते, फुले आणि बोंडे यांची गळ होण्याला कारणीभूत ठरतात.
जर वेळत उपाययोजना केल्या नाहीत तर कपाशी पिकातील पाते व फुलगळ मोठ्या प्रमाणावर झाल्याने उत्पादनाला फटका बसू शकतो. महत्वाचे म्हणजे याच्या पुढील कालावधीमध्ये कपाशी पिकाची पाने लाल होण्याची जी काही विकृती आहे म्हणजेच आपण त्याला लाल्या रोग असे देखील म्हणतो तो देखील येण्याची शक्यता असते. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर फुलगळ आणि पातेगळ होते. याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये कपाशी पिकाची पाते आणि फुलगळ होऊ नये म्हणून कुठल्या उपाययोजना कराव्यात? याबद्दल माहिती घेणार आहोत.
नैसर्गिक कारणामुळे होणारी पाते व फुलगळ
बऱ्याचदा हवामानातील बदल किंवा इतर कारणांमुळे कपाशी पिकावरील पाते व फुले गळून पडतात. त्यामुळे अशा नैसर्गिक कारणांमुळे जी काही फुल व पातेगळ होते ती कमी करण्याकरिता नपथ्यालिक ऍसिटिक ऍसिड अर्थात एन ए ए किंवा प्लानोफिक्स या संजीवकाची फवारणी करणे गरजेचे असते. एका हेक्टरसाठी शंभर मिली पाचशे लिटर पाण्यातून म्हणजे साधारणपणे (15 लिटरच्या पंपाला तीन मिली या प्रमाणात) पाते लागल्यानंतर फवारणी करणे गरजेचे आहे. जर ही फवारणी घेतली तर कपाशीच्या पाते व फुलगळ कमी होते.
2- कपाशी पिकासाठी अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन- बऱ्याचदा खते पुरेशा प्रमाणात आणि योग्य रीतीने दिले गेले नसल्यामुळे किंवा जमिनीमध्ये ओल कमी असल्यामुळे देखील अन्नद्रव्यांची कमतरता पिकांना निर्माण होते. जर अन्नद्रव्यांची कमतरता असली तर त्यामुळे पानांवर काही लक्षणे दिसून येतात. लक्षणे ओळखून कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे त्या अन्नद्रव्याची फवारणी करणे गरजेचे असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर पिकामध्ये जर नत्राची कमतरता राहिली तर पिकाच्या खालच्या बाजूची जी काही पाने असतात ती पिवळी होतात.
याची मूळ व झाड यांची वाढ थांबते तसेच येणारी फुट, फळे व फुले कमी प्रमाणात लागतात. म्हणून हा प्रकार टाळण्याकरिता युरिया खताची एक टक्के म्हणजेच दहा लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम युरिया घेऊन फवारणी करावी. तसेच स्फुरद या अन्नद्रव्याची कमतरता असेल तर कपाशी पिकाची पाने हिरवट लांबट होतात व त्यांची वाढीवर विपरीत परिणाम होतो. पानांची मागची बाजू जांभळट रंगाची होते. हा प्रकार टाण्याकरता डीएपी खताची एक ते दोन टक्के म्हणजेच दहा लिटर पाण्यामध्ये 100 ते 200 ग्रॅम फवारणी करणे गरजेचे आहे. तसेच इतर महत्त्वाच्या अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणे ओळखून फवारणीची नियोजन करणे आवश्यक आहे.
3- कपाशीचे पाने लाल होणे- हा एक नुकसानदायक प्रकार असून नेमके जेव्हा कपाशीला बोंडे लागण्याचा कालावधी असतो तेव्हाच कपाशीचे पाने लाल होण्याची परिस्थिती दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने तुडतुड्यांसारख्या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढणे किंवा जमिनीमध्ये जास्त प्रमाणात ओल किंवा अति प्रमाणात ओलीचा अभाव इत्यादी कारणांमुळे ही स्थिती दिसून येते.
या प्रकारामध्ये देखील फुलगळ व बोंडगळ मोठ्या प्रमाणे होत असते. त्यामुळे कपाशीचे पाने लाल होऊ नये म्हणून रासायनिक खतांची शिफारशीत मात्रा योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळेत देणे गरजेचे आहे.
याकरिता असे करावे खत व्यवस्थापन
कपाशीची पाने लाल होणे हे विकृती टाळण्याकरिता 20 टक्के नत्र लागवडीच्या वेळी व 40% नत्र लागवडीनंतर 30 दिवसांनी व 40 टक्के नत्राची मात्रा ही लागवडीनंतर 60 दिवसांनी द्यावी. तसेच मॅग्नेशियम सल्फेट हेक्टरी 20 ते 30 किलो जमिनीमध्ये द्यावे. समजा जर पाणी लाल व्हायला सुरुवात झाली असेल तर दोन टक्के डीएपी म्हणजेच दहा लिटर पाण्यामध्ये दोनशे ग्रॅम घेऊन पंधरा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
फवारण्या करताना तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
Published on: 24 August 2023, 09:14 IST