देशातील शेतकरी बांधव आता मागणीप्रमाणे वेगवेगळ्या पिकांची लागवड करीत आहेत. पारंपरिक पीकपद्धतीत उत्पादन खर्च काढणे देखील दिवसेंदिवस कठीण बनत असल्याने शेतकरी बांधवानी आता आधुनिकतेची कास धरीत मागणीमध्ये असलेल्याच पिकांची लागवड सुरु केली आहे. आज आपण अशाच मागणी मध्ये असलेल्या निलगिरी झाडाची लागवड करून कसा नफा प्राप्त केला जाऊ शकतो याविषयी सविस्तर जाणुन घेणार आहोत.
आपण आपल्या शाळेत, रस्त्याच्या कडेला, नदीकिनारी, जंगलात निलगिरीचे झाड अवश्य बघितलं असणार. या झाडाला इंग्लिशमध्ये यूकलिप्टस (Eucalyptus) म्हणुन संबोधित केले जाते. निलगिरी हे मुख्यता ऑस्ट्रेलियामध्ये उत्पादित केले जाते. निलगिरी चा उगम ऑस्ट्रेलिया खंडात झाले असल्याचे सांगितले जाते, परंतु आपल्या भारतातही निलगिरी साठी पोषक वातावरण आहे आणि मोठ्या प्रमाणात निलगिरीची झाडे आपल्याला रस्त्याच्या कडेला बघायला मिळतात. असे असले तरी भारतात अद्यापही निलगिरीची व्यावसायिक शेती केली जात नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, जर आपणास लाखो रुपयांचा नफा हवा असेल तर आपण निलगिरीच्या झाडाची शेती करून पाच वर्षात 60 लाखांची कमाई करू शकता. निलगिरीचे झाडाचे लाकूड खूपच उपयोगाचे असल्याचे सांगितले जाते. निलगिरीचे लाकूड बॉक्स, इंधन म्हणजे जाळण्यासाठी, हार्ड बोर्ड, फर्निचर आणि पार्टिकल बोर्ड बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात असते, त्यामुळे निलगिरीच्या लाकडांना बाजारात मोठी मागणी असते.
शेतकरी मित्रांनो, निलगिरीच्या शेतीतील सर्वात फायदेशीर आणि महत्वाची बाब म्हणजे याच्या लागवडीसाठी खर्च खूपच कमी आहे. या पिकासाठी उत्पादन खर्च कमी आहे आणि उत्पन्न खूप जास्त आहे. तज्ञांच्या मते, एक हेक्टर क्षेत्रात निलगिरीची 3000 हजार रोपे लावता येतात. आपल्याला ही रोपे नर्सरीतून 7 ते 8 रुपय प्रति नग या दरम्यान सहज उपलब्ध होतील. म्हणून निलगिरीच्या लागवडीसाठी 21 हजार रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. यामध्ये निलगिरी शेतीसाठी आवश्यक इतर खर्चाचा समावेश केला तर तो 25 हजारांपर्यंत पोहोचू शकतो. एकंदरीत निलगिरीसाठी 25 हजार रुपये उत्पादन खर्च अपेक्षित आहे. निलगिरीच्या लागवड केल्यानंतर 5 वर्षांत प्रत्येक नीलगिरीच्या झाडापासून जवळपास 400 किलो लाकूड प्राप्त केले जाऊ शकते.
जर आपण 3,000 झाडांच्या उत्पादनाचा अर्थात लाकडाचा विचार केला तर 5 वर्षानंतर या शेतीतून 12 लाख किलो किलो लाकूड मिळेल. बाजारात निलगिरीचे लाकूड सहा रुपये किलो दराने विकले जाते. त्यामुळे मिळालेल्या सर्व लाकडाचे 72 लाख रुपये सहज मिळू शकतात. यातून होणारा खर्च काढून टाकल्यास निलगिरीच्या लागवडीतून 5 वर्षांच्या कालावधीत 60 लाख रुपयांचा नफा मिळू शकतो.
निलगिरीचे झाड कुठल्याही हवामानात वाढण्यास सक्षम असते, तसेच या झाडाची लागवड कुठल्याही जमिनीत करता येणे शक्य आहे. जर आपणास याची लागवड करायची असेल तर शेत जमिनीची व्यवस्थित नांगरणी करून त्यानंतर जमिनीवर फळी मारणे अपेक्षित आहे. फळी मारून जमीन समतल केल्यानंतर पाच फूट अंतरावर निलगिरी लागवडीसाठी खड्डे तयार करणे आवश्यक आहे. खड्डे तयार केल्यानंतर या खड्ड्यात शेणखत शेणखत टाकण्याचा सल्ला दिला जातो. ही सर्व प्रक्रिया निलगिरीच्या झाडाच्या लागवडीपूर्वी वीस दिवस अगोदर करण्याचा सल्ला दिला जातो.
निलगिरीची लागवड कोणत्याही हंगामात करता येणे शक्य आहे मात्र असे असले तरी, आपण जर याची लागवड पावसाळ्यात केली तर आपणास लागवड केल्यानंतर लगेचच या झाडांना पाणी देण्याची आवश्यकता भासणार नाही. परंतु जर आपण पावसाळा व्यतिरिक्त दुसऱ्या ऋतूत त्याची लागवड केली तर लागवड केल्यानंतर लगेच झाडांना पाणी द्यावे लागणार आहे. पावसाळ्यात निलगिरीच्या झाडांमध्ये खूप तण वाढत असते, त्यामुळे याची निंदणी खुरपणी करणे अनिवार्य आहे. निलगिरीच्या झाडांना चाळीस ते पन्नास दिवसांच्या अंतराने पाणी भरण्याचा सल्ला दिला जातो.
Published on: 24 February 2022, 10:56 IST