कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये हुमणी प्रादुर्भाव सगळीकडे झालेला आहे. हुमणी काही ठिकाणी प्रथमच पण काही ठिकाणी दरवर्षी आढळून येते. आपल्या भागात दोन प्रकारच्या हुमणी आढळतात. त्यात नदीकाठावर (लिकोफोलिस) आणि माळावर (होलोट्राकिया) असे संबोधले जाते. आता जी हुमणी आढळते ती माळरानाची हुमणी (होलाट्राकीया) असे नामकरण आम्ही केले आहे. तसेच नवीन हुमणीची जात शोधून काढली आहे. त्यामध्ये भुंगे होलोट्राकिया पेक्षा लहान आहेत आणि नर भुंग्याला गेंड्यासारखे शिंग आहे. सर्वेक्षणामध्ये होलोट्राकीया 70 टक्के आणि नवीन हुमणी (फायलोग्यथस डायोनासिस) 30 टक्के असे हुमणीचे प्रमाण वारणा कारखान्याच्या परिसरात आढळून आले आहे. या हूमणीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भात, भुईमूग आणि उभा ऊस आणि खोडवा ढबू मिरची इ. पिकामध्ये अतोनात नुकसान झाले आहे. सांगली भागात वारणा कारखाना परिसरात यलूर, कोरेगाव, तांदुळवाडी तसेच कागल, गडहिंग्लज, हातकलंगले, शिरोळ, कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आतोनात नुकसान झाले आहे. अशा शेतकरी आणि कृषी अधिकारी यांच्या तक्रारी आल्या आहेत. या हुमणीच्या नियंत्रणासाठी तिचा जीवनक्रम, नुकसान स्वरूप आणि नियंत्रणाचे उपाय माहिती असल्याशिवाय या हुमणीचा बंदोबस्त करणे शक्य नाही.
जीवनक्रम:
ही हुमणी वळवाचा किंवा मान्सून पूर्व पाऊस साधारणतः 60 ते 70 मी.मी पडला की हुमणीचे भुंगे जमिनीतून तीन्हीसांजेस साधारण 6.45 ते 8.15 यावेळी बाहेर पडतात आणि नजिकच्या कडूनिंब, बाभळ बोर इ. झाडावर जातात. नर आणि मादीचे तिथेच मिलन होते. मिलनानंतर नर लगेच मरतो आणि मादी जमिनीत अंडी घालते. एक मादी साधारणपणे 50 ते 60 अंडी घालते त्यावेळी जमिनीत पिके नसतात. पण सेंद्रीय खत टाकलेले असते. अंडी साधारणतः 15 ते 18 दिवसांनी उबतात. ही हुमणीची अळी प्रथम सेंद्रीय पदार्थ खाते नंतर ती पिकाच्या मूळाकडे वळते. अळीच्या तीन अवस्था आहेत. पहिली अवस्था 60 ते 90 दिवस दुसरी अवस्था 55 ते 110 दिवस तिसरी अवस्था 4 ते 5 महिने असते. पूर्ण वाढ झालेली हुमणी अळी जमिनीत 70 सें.मी खोल, कोशावस्थेमध्ये जाते. 20 ते 22 दिवस ही कोशावस्था असते. त्यानंतर भुंगा बाहेर पडतो. पाऊस पडल्यानंतर हे भुंगे पुन्हा बाहेर पडतात. साधारणपणे एक पिढी पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागतो.
नुकसानीचे स्वरूप:
हुमणीची अळी प्रथम सेंद्रीय पदार्थ आणि त्यानंतर पिकाची मुळे खाते आणि पिके वाळतात. ही हुमणी भात, भुईमूग, सोयाबीन आणि उभा ऊस अशा सर्व पिकांचे नुकसान करते. मूळे नष्ट झाल्यामूळे रोप किंवा ऊस वाळतो. भात, भुईमूग आणि सोयाबीन वाळते आणि आतोनात नुकसान होते. तसेच ही हुमणी आता केलेल्या आणि करणार्या आडसाली ऊसाला सुध्दा लागण्याची दाट शक्यता आहे.
नियंत्रणासाठी उपाययोजना:
नुकसानीचे स्वरूप लक्षात घेता, ऊभा ऊस किंवा खोडव्याच्यामध्ये पहारीने ऊसाच्या बुंध्यालगत खड्डा काढून त्यात हुमणीचा प्रादुर्भाव दिसू लागताच. फ्ल्युबेंडाअमाएउ 200 मिली., क्लोमायोनिडीन 250 ग्रॅम, रेनाक्झीपायर 200 मिली. लॅसेंटा 250 ग्रॅम किंवा क्लोरोपायरीफॉस 1 लि. हेक्टरी 500 लि. पाण्यात मिसळून पंपाचे नोझल काढून कच्च्या घातीवर पहारीने नाळे मारून आळवणी करावी. वरील सर्व उपाय सामुदायिकरित्या करणे गरजेचे आहे. किंवा फोरेट, 10 जी किंवा फीप्रोनिल दाणेदार 10 किलो समप्रमाणात मातीत मिसळून कच्या घातीवर टाकावे. नुसते सरीतून औषध टाकून हुमणीचा बंदोबस्त होणार नाही. कारण हुमणी बोधात आहे.
किटक शास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे हुमणीच्या जैविक नियंत्रणाविषयी प्रयोग झालेले आहेत. त्यामध्ये असे निष्कर्ष आहेत की मेटारायझम ऑनिसोफिली किंवा बिव्हेरिया बुरशी 50 ग्रॅम 10 लि. पाण्यात मिसळून त्यात थोडे अर्धा कप दूध टाकून पहारीने केलेल्या खड्ड्यात आळवणी करावी. तसेच नुकसान ग्रस्त भागात नागंरट करून अळ्या वेचून त्याचा नाश करावा. हा प्रार्दूभाव पाऊस लांबल्यामूळे जास्त दिसून येत आहे. जर जोराचा पाऊस पडला तर प्रार्दूभाव कमी होतो कारण ही अळी पाण्यात टिकत नाही.
एकात्मिक नियंत्रण:
- वळवाचा पाऊस पडल्यानंतर (मार्च पासून मे पर्यंत) हुमणीचे भुंगे एकाचवेळी बाहेर पडतात आणि बाभूळ, कडूनिंब झाडावर जमा होतात. ते काठीच्या सहाय्याने फांद्या हलवून गोळा भुंगे करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत.
- अळी सुरूवातीला सेंद्रीय पदार्थावर जगते तेव्हा खरीप हंगामात जमिनीत शेणखत टाकताना खताबरोबर हेक्टरी 25 किलो मेटारायझम किंवा बिव्हेरिया बुरशी मिसळून टाकावी.
- पावसामूळे बर्याच भागात ऊसाची आडसाली लावण झालेली नाही. त्यावेळी शेणकाल्यातून मेटारायझम बुरशी टाकूण लगेच लावण करावी.
डॉ. पांडूरंग बा. मोहिते
प्राध्यापक, कृषी किटकशास्त्र विभाग
कृषी महाविद्यालय, कोल्हापूर
Published on: 15 September 2018, 01:34 IST