अवर्षण परिस्थिती, पाण्याचा ताण आणि हवामानातील बदल या प्रमुख कारणांमुळे महाराष्ट्रामध्ये मागील 10-12 वर्षात ऊस पिकामध्ये हुमणी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. भारतात हुमणीच्या साधारणपणे 300 प्रजातींची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात प्रमुख दोन प्रकारच्या हुमणी आढळतात. त्यास नदीकाठावरील (लिकोफोलीस) आणि माळावरील (होलोट्रॅकिया) असे संबोधले जाते. तसेच मागील 3-4 वर्षात नवीन दोन प्रकारच्या हुमणी प्रजाती (फायलोग्यथस आणि अॅडोरेटस) आढळल्या आहेत. होलोट्रॅकिया सेरेटा या हुमणीच्या प्रजातीपासून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या जातीचे वैशिष्ट्य असे आहे की, ही जात हलक्या जमिनीत व कमी पाण्याच्या प्रदेशात जास्त आढळते. होलोट्रॅकियाच्या प्रादुर्भावामुळे ऊसाच्या उगवणीत 40% पर्यंत नुकसान होते. तसेच ऊस उत्पादनात 15 ते 20 टनांपर्यंत नुकसान होते. यामुळे हुमणी कीडीचा बंदोबस्त योग्य वेळी (मे-ऑगस्ट) करणे अत्यंत महत्वाचे आहे.
नुकसानीचा प्रकार:
प्रथम अवस्थेतील हुमणीच्या अळ्या अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर किंवा जिवंत मुळे मिळाल्यास ती मुळ्यांवरच उपजिविका करतात. त्यानंतर दुसर्या व तिसर्या अवस्थेतील अळ्या ऊस व इतर पिकांची मुळे जून-ऑक्टोबर महिन्यात खातात. मुळे खाल्यामुळे पिकाचे अन्न व पाणी घेण्याचे कार्यच बंद पडते. प्रादुर्भावग्रस्त ऊस निस्तेज दिसतो व पाने मरगळतात. पाने हळूहळू पिवळी पडण्यास सुरूवात होते व वीस दिवसात पूर्णपणे वाळतात. ऊसाची मुळे कुरतडल्यामुळे संपूर्ण ऊस वाळतो आणि वाळक्या काठीसारखा दिसतो. एका उसाच्या बेटाखाली जास्तीत जास्त 20 पर्यंत अळ्या आढळतात. एक उसाच्या बेटाखाली जास्तीत जास्त 20 पर्यंत अळ्या आढळतात. एक उसाचे बेट एक अळी तीन महिन्यात तर दोन किंवा जास्त अळ्या एका महिन्यात मुळ्या कुरतडून कोरडे करतात. जमिनी खालील ऊसाच्या कांड्यानाही अळी उपद्रव करते. प्रादुर्भावग्रस्त ऊसाला हलकासा झटका दिल्यास ऊस सहजासहजी उपटून येतो. अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास 100% पर्यंत नुकसान होते. हेक्टरी 25,000 ते 50,000 अळ्या आढळल्यास साधारणपणे 15 ते 20 टनापर्यंत नुकसान होते.
हुमणीची 12 महिन्यात एकच पिढी तयार होत असली तरी अळीचा जास्त दिवसांचा कालावधी आणि पिकाच्या मुळांवर उपजिविका करण्याची क्षमता यामुळे पिकाचे जास्त प्रमाणात नुकसान होते.
आर्थिक नुकसानीची संकेत पातळी:
एक हुमणीची अळी प्रति एक घनमीटर अंतरात आढळून आल्यास कीड नियंत्रण सुरू करावे. हुमणीग्रस्त शेतात पावसाळ्यात कडूनिंब अथवा बाभळीची पाने अर्धचंद्राकृती खाल्लेली आढळल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.
हुमणीचा जीवनक्रम (होलोट्रॅकिया): हुमणी किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व भुंगेरे या चार अवस्थेत पूर्ण होतो. अशाप्रकारे एका वर्षात या किडीचा एक जीवनक्रम पूर्ण होतो.
- अंडी:
एक मादी जमिनीत 10 सें.मी. खोलीवर सरासरी 60 अंडी घालते. अंड्यातून 10 ते 15 दिवसात अळी बाहेर येते. अंडी घालण्याचा कालावधी पावसाळा सुरू होताच म्हणजे जूनच्या मध्यास असतो. प्रथम अंडे मटकीच्या किंवा ज्वारीच्या आकाराचे, लांबट गोल आकाराचे, लांबट गोल आकाराचे, दुधी पांढरे असते. त्यानंतर ते तांबूस व गोलाकार होते. - अळी:
नुकतीच अंड्यातून बाहेर आलेली अळी दह्यासारख्या पांढरट रंगाची असते. ही अळी तीन रुपांतर अवस्थांतून जाते. अळीची प्रथमावस्था 25 ते 30 दिवस, द्वितीयावस्था 30 ते 45 दिवस व तृतीयावस्था 140 ते 145 दिवस असते. मुळावर पुर्ण वाढ झालेली अळी पांढरट पिवळी, इंग्रजी सी आकाराची असते. अळी अवस्था 150 ते 210 दिवसांची असते. जमिनीत अळी नेहमी साधारणपणे अर्धगोलाकारात पडून राहते. पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी मातीच्या घरात कोषावस्थेत जाते. साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारी या थंडीच्या महिन्यात त्या जमिनीत 98 ते 120 सें.मी पर्यंत जाते. - कोष:
अळीपासून झालेला कोष पांढरट रंगाचा असतो व तो नंतर लालसर होत जातो. कोषावस्था 20 ते 40 दिवसांची असते. शेतात कोषावस्था प्रामुख्याने ऑगस्ट ते मार्च पर्यंत आढळते. स्वरक्षणासाठी ही किड मातीमध्ये कोषाभोवती मातीचे टणक आवरण तयार करते. - भुंगेरा:
कोषावस्थेतून बाहेर आलेला भुंगेरा पुरेसा पाऊस पडेपर्यंत (4 ते 5 महिने) जमिनीत मातीच्या घरातच काही न खाता पडून राहतो. यालाच भुंग्याची सुप्तावस्था (क्वीझंट स्टेज) असे म्हणतात. भुंगेरे वीटकरी किंवा काळपट रंगाचे असतात. नोव्हेंबर महिन्यापासून भुंगेरे जमिनीत तयार होतात. भुंगेरे पहिला पाऊस पडल्यानंतर (मे-जून) जमिनीतून बाहेर पडतात किंवा हवामान ढगाळ असल्यास संध्याकाळी 7.20 ते 7.50 च्या दरम्यान जमिनीतून बाहेर पडतात. बाहेर पडण्याची क्रिया 9.00 वाजेपर्यंतची आढळते. सर्व भुंगेरे 10 ते 15 मिनिटांत बाहेर पडतात. भुंगेरे बाहेर पडल्यानंतर उडताना घुंग घुंग आवाज करतात. जमिनीतून बाहेर आल्यानंतर नर व मादी भुंगेरे यांचे मिलन होते. नर व मादीचे मिलन साधारणपणे 4 ते 15 मिनिटांपर्यत चालते. नंतर ते कडूनिंब, बोर, बाभूळ इ. पाने खात असतात. पाने खाल्ल्यामूळे उरलेला पानाचा भाग चंद्राकृती दिसतो. भुंगेरे सुर्योदयापूर्वी म्हणजे 5.40 ते 6.00 वाजेपर्यंत जमिनीत जातात. भुंगेरे निशाचर असतात. मादी भुंगेरे साधारणपणे 93 ते 109 दिवस जगतात व मिलनानंतर नर लगेच मरतो.
यजमान वनस्पती:
हुमणी ही बहुभक्षीय कीड आहे. हुमणीचे भुंगेरे प्रामुख्याने कडूनिंब, बाभुळीची पाने खाऊन जगतात. त्या व्यतिरिक्त ते बोर, पिंपळ, गुलमोहोर, शेवगा, पळस, चिंच अशा निरनिराळ्या 56 वनस्पतींवर उपजिविका करतात.
हुमणीची अळी साधारणपणे ऊस, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, ज्वारी, आले, तृणधान्ये, कडधान्ये, भाजीपाला, तेलबिया व फळवर्गीय अशा सर्वच पिकांंच्या मुळावर उपजिविका करते.
एकात्मिक नियंत्रण:
हुमणीच्या नियंत्रणासाठी कोणताही एक उपाय योजून किंवा फक्त कीटकनाशकांचा वापर करून फायदा होत नाही. त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन आवश्यक आहे. हुमणी कीडीच्या जीवनक्रमाच्या सर्व अवस्था जमिनीत आढळतात. त्याला एकच अपवाद म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला सुर्यास्तानंतर मिलनासाठी व खाण्यासाठी बाभळीच्या किंवा कडूनिंबाच्या झाडावर जमा होणारे भुंगेरे हे होत. म्हणून प्रथम भुंगेरे व नंतर अळी हेच लक्ष्य बनवून जर एकात्मिक कीड व्यवस्थापन तत्त्वाचा अवलंब सामुदायिक मोहिम राबवून केला तर हुमणी आटोक्यात येते. हुमणी नियंत्रणाचे उपाय योग्य वेळीच योजणे अत्यंत महत्वाचे आहे. ही वेळ टळल्यास नियंत्रण उपायाचा हवा तसा परिणाम होत नाही.
1. मशागत:
- नांगरणी: ऊस लागवडी अगोदर एप्रिल-मे किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात शेत 2 ते 3 वेळा उभे आडवे खोलवर नांगरावे. त्यावेळी पक्षी व प्राणी मातीच्या वर आलेल्या अळ्या व अंडी खातात.
- ढेकळे फोडणे: शेतातील ढेकळे फोडावीत. मातीचे ढेकूळ मोठे राहिल्यास त्यात हुमणीच्या निरनिराळ्या अवस्था (अंडी, अळी, कोष) राहण्याची शक्यता असते. त्यासाठी तव्याचा कुळव (Disc Harrow) किंवा रोटाव्हेटर वापरून ढेकळे फोडावीत.
- पीक फेरपालट: ऊसाच्या तोडणीनंतर अती प्रादुर्भावग्रस्त शेतात ऊसाचा खोडवा न घेता सूर्यफुलाचे पीक घ्यावे व सूर्यफूल काढणीनंतर शेताची 3-4 वेळा नांगरट करावी.
- सापळा पीक: भुईमूग अथवा ताग पिकाचा हुमणीग्रस्त शेतात सापळा पीक म्हणून वापर करावा. ऊसाची उगवण झाल्यानंतर सर्यांमध्ये ठिकठिकाणी भुईमूग अथवा ताग लावावा. कोमेजलेल्या भुईमूग अथवा तागाखालील अळ्या माराव्यात.
- अळ्या मारणे: शेतात कोणतेही मशागतीचे काम (उभ्या ऊसात खुरपणी, तगरणी अथवा बांधणी) करताना जमिनीतून बाहेर पडणार्या अळ्या गोळा करून माराव्यात.
- प्रौढ भुंगेरे गोळा करून मारणे: वळवाचा (पहिला) पाऊस पडल्यानंतर हुमणीची भुंगेरे जमिनीतून एकाच वेळी बाहेर पडतात आणि बाभूळ व कडूनिंबाच्या झाडावर जमा होतात. फांद्या हलवून जमिनीवर पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत. प्रकाश सापळ्यांचा वापर करून भुंगेरे गोळा करून मारावेत. भुंगेरे गोळा करून नष्ट करणे हे नियंत्रण उपायांमध्ये सर्वात प्रभावी व कमी खर्चाचे आहे. सतत 3-4 वर्षे भुंगेरे गोळा करून मारावेत. सामुदायिकरित्या भुंगेरे गोळा केल्यात हुमणी कीडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास चांगली मदत होते.
- अती प्रादुर्भावग्रस्त शेतात ऊसाचा खोडवा घेऊ नये.
- पीक निघाल्यानंतर हुमणीग्रस्त शेताची मशागत रोटाव्हेटरने करावी.
2. जैविक नियंत्रण:
- जैविक कीड नियंत्रक ज्यामध्ये बिव्हेरिया बॅसियना, मॅटेरायझियम अॅनीसोपली, व्हर्टीसिलीयम लेकॅनी याचा समावेश आहे. त्याचा कंपोस्ट खतात मिसळुन, ड्रिपद्वारे अथवा ड्रेचिंगद्वारे (पिकाच्या मुळाशी आळवणी करून) एकरी दोन लिटर/दोन किलो या प्रमाणात वापर करावा.
- जीवाणू (बॅसिलस पॅपीली) व सूत्रकृमी (हेटरोरॅबडेटीस) हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्याचाही वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.
3. रासायनिक नियंत्रण:
- कडूनिंब अथवा बाभळीच्या झाडावर इमिडॉक्लोप्रिड (17.8% एस.एल.) 0.3 मिली प्रती लिटर पाण्यातून फवारावे. किटकनाशके फवारलेली पाने खाल्ल्याने भुंगेर्याचा बंदोबस्त होण्यास मदत होते.
- शेणखत, कंपोस्ट, इ. मार्फत हुमणीच्या लहान व अळ्या व अंडी शेतात जातात. त्यासाठी एक गाडी खतात एक किलो 3 जी कार्बोफ्युरॉन दाणेदार मिसळावे व नंतर खत शेतात टाकावे. उन्हाळ्यात शेण खताचे लहान ढीग करावेत.
- मोठ्या ऊसात (जून-ऑगस्ट) क्लोरपायरीफॉस 20% प्रवाही 5 लि./प्रति हेक्टरी 1000 लिटर पाण्यात मिसळून जमिनीत द्यावे.
- ऊस लागवडीच्या वेळी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात 3% दाणेदार फिप्रोनिल अथवा 10% दाणेदार फोरेट हे किटकनाशक 25 कि./हे. मातीत मिसळावे किंवा क्लोथिओनिडीन 50% पाण्यात मिसळणारी भुकटी 250 ग्रॅम वाळूमध्ये मिसळून मातीत मुळांच्या जवळ टाकावे व नंतर हलके पाणी द्यावे.
दिवसेंदिवस ऊस व इतर पिकात वाढत असलेला होलोट्रॅकिया हुमणीचा उपद्रव व करावी लागणारी उपाय योजना विचारात घेतली असता हुमणीग्रस्त गावातील सर्व शेतकर्यांनी हुमणी नियंत्रणासाठी सामुदायिक मोहिम हाती घेणे आवश्यक व गरजेचे आहे. त्यामुळे 4-5 वर्षात हुमणीचे नियंत्रण करता येणे शक्य होईल.
जैविक कीड नियंत्रक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे रू. 210/- प्रती लिटर या दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे.
आर. जी. यादव, डॉ. टी. डी. शितोळे, एस.डी.घोडके आणि डी. एस.जाधव
(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे)
Published on: 24 September 2018, 03:35 IST