हुमणी ही एक अतिशय नुकसानकारक बहुभक्षी कीड आहे. हुमणीची अळी जमिनीमध्ये राहून विविध पिकांच्या मुळा कुरतडते. त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होते. खरीप हंगामामध्ये मराठवाड्यामध्ये सोयाबीन, कापूस, ज्वारी, ऊस, बाजरी, मका, तुर, हळद, कांदा इत्यादी पिकावर हुमणीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव होऊन शेतक-याचे नुकसान होते. रबी हंगामामध्ये पेरणी झाल्यानंतर या पिकाच्या उगवणीनंतर हुमणीच्या अळया हरभरा, करडई, ज्वारी इत्यादी पिकाच्या मुळा खाण्याची शक्यता आहे. रोपवस्थेत मुळा कुरतडल्यामुळे संपूर्ण रोप वाळून जाते. तसेच सध्या खरिप हंगामातील तूर, कापूस इत्यादी या उभ्या पिकातदेखील हुमणीच्या प्रदुर्भावामुळे वाळत आहेत.
हुमणी अळीची अवस्था जुलै ते नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत असते व नंतर ही कोष्यावस्थेत जाते. म्हणून हुमणीच्या अळीपासून होणारे सध्यपरिस्थितीतील नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी सध्यस्थितीत रबी हंगामात देखील शेतक-यांनी खलीलप्रमाने हुमणीचे व्यवस्थापन करावे.
सध्यस्थितीत हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन:
- ज्या शेतक-यांना रबी हंगाम घ्यावयाचा नाही त्यांनी खरिपातील पीक काढनीनंतर शेतामध्ये खोल नांगरट करावी व पाळी मारावी. त्यामुळे जमिनीतील अळया पृष्टभागावर आल्यानंतर सूर्यप्रकाशामुळे किंवा पक्षी वेचून खाल्यामुळे त्याचे व्यवस्थापन होण्यास मदत होईल.
- पिकामध्ये शक्य असेल तर आंतरमश्यागत करावी व उघडया पडलेल्या अळया हाताने वेचून रॉकेलमिश्रीत पाण्यात बुडवून मारून टाकावे.
- पूर्ण कुजलेल्या शेनखताचा वापर करावा.
- रबी पिकांची पेरणी करतेवेळी फोरेट १० टक्के दानेदार २५ किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात जमीनीत मिसळावे व जमिनीमध्ये ओल असने आवशक आवश्यक आहे.
- हुमणीच्या व्यवस्थापनासाठी मेटारायझियम ॲनिसोप्ली या उपयुक्त बुरशीचा १० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. ही बुरशी हुमणीच्या अळयाना रोगग्रस्त करते, त्यामुळे अळयाचा बंदोबस्त होतो.
- हुमणीच्या अळीला रोगग्रस्त करणा-या सुत्रकृमीचा वापर करावा.
- फिप्रोनील ४० टक्के + इमिडाक्लोप्रीड ४० टक्के हे मिश्र कीटकनाशक ४ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून ऊस या पिकाच्या झाडा भोवती आळवणी करावी.
वरील उपाययोजना ही केवळ सध्यपरिस्थितीतील पिकांच्या हुमणीच्या अळयापासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी आहेत. हुमणीच्या संपूर्णपने व्यवस्थापन करण्यासाठी शेतक-यांना सामुदायिकरित्या २ ते ३ वर्ष प्रौढ व अळया यांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. विशेषता: खरिप हंगामात मृगाचा पाऊस झाल्यानंतर हुमणीचे भुंगे कडूनिंब, बाभुळ, बोर इत्यादी झाडाच्या पांनावर रात्रीच्या वेळी भुंगे खात असल्यामुळे सर्व शेतक-यांनी मिळुन सामुहीकरित्या बंदोबस्त करावा. त्यासाठी प्रकाश सापळयाचा वापर करावा.
लेखक:
डॉ. राजरतन खंदारे (संशोधन सहयोगी)
8275603009
कृषि कीटकशास्त्र विभाग,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
एस. एच. टिमके (पीएच.डी. विद्यार्थी)
8459950081
कृषि कीटकशास्त्र विभाग,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
एन. व्ही. लांडे (पीएच.डी. विद्यार्थी)
8802360388
राष्ट्रीय पादप जीनोम अनुसंधान संस्थान, नवी दिल्ली
डॉ. धीरजकुमार कदम (सहयोगी प्राध्यापक)
9421621910
कृषि कीटकशास्त्र विभाग,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
Published on: 04 December 2020, 01:32 IST