Agripedia

सततच्या बदलत्या हवामानामुळे, उन्हाळ्यात पडणारा अवकाळी पाऊस यामुळे हुमणी या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी प्रामुख्याने पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आढळून येते. हुमणी ही अतिशय नुकसानकारक बहुभक्षी कीड असून उन्नी, उकरी, गांढर,खतातील अळी,मे-जून भुंगेरे, कॉकचाफर्स व मुळे खाणारी अळी या नावाने सुद्धा ओळखले जाते.

Updated on 27 August, 2020 3:48 PM IST


सततच्या बदलत्या हवामानामुळे, उन्हाळ्यात पडणारा अवकाळी पाऊस यामुळे हुमणी या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी प्रामुख्याने पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आढळून येते. हुमणी ही अतिशय नुकसानकारक बहुभक्षी कीड असून उन्नी, उकरी, गांढर,खतातील अळी,मे-जून भुंगेरे, कॉकचाफर्स व मुळे खाणारी अळी या नावाने सुद्धा ओळखले जाते. ही कीड  पिकांच्या मुळांवर उपजीविका करते. महाराष्ट्रात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, ऊस, अद्रक व हळद या पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीमुळे पिकाचे सरासरी 30 % ते 80 % आर्थिक नुकसान होते तर काही भागात 100 % पीक उध्वस्त होते.

ओळख :

हुमणी ही एक भुंगेवर्गीय कीड असून होलोट्रीकिया सेरेटा होलोट्रीकिया फिसा ह्या प्रजाती मराठवाड्यात मुख्यतः आढळतात. हुमणीच्या प्रौढ, अंडी, अळी व कोष या चार अवस्था असतात.

प्रौढ : हुमणीचा प्रौढ भुंगेरा लालसर किंवा गडद विटकरी रंगाचे असून समोरील पंख टणक व मागील पंखांची जोडी पातळ पारदर्शक असते. ते निशाचर असून उडतांना घुं घुं घुं असा आवाज करतात. मादी ही नारपेक्षा थोडी मोठी असते. एक मादी सरासरी ६0 अंडी घालते. अंडी घालण्याचा कालावधी पावसाळा सुरू होताच सुरू होतो.

अंडी : अंडी पिवळसर पांढरी व आकाराने अंडाकृती असतात.

अळी: अळीचे शरीर मऊ, पांढरे असून तिचे डोके मजबूत, पिवळसर लाल किंवा तपकिरी असते. पूर्ण वाढलेली अळी ३-५ से॰मी. असते. अळी जेव्हा विश्रांति करते तेव्हा ती इंग्रजी C अक्षरासारखी दिसते. अळीच्या मागील टोकाकडील शरीरातील माती दिसते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी ही अळी तीन वेळेस कात टाकते.

कोष : कोषाची लांबी ३ से॰मी. व रुंदी १.२ से॰मी. , रंग तपकिरी असतो.

जीवनक्रम :

अंडी घालण्याचे ठिकाण- जमिनीमध्ये

अंडी अवस्थेचा कालावधी- ९ ते २४ दिवस

अळी अवस्थेचा कालावधी- ५ ते ९ महिने

कोष अवस्थेचा कालावधी- १४ ते २९ दिवस

कोष अवस्थेचे ठिकाण- जमिनीमध्ये

 


अंडी, अळी, कोष व भुंगेरे या चार अवस्थातून या कीडीचा जीवनक्रम पूर्ण होतो. मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर सुतावस्थेतिल भुंगेरे कडुनिंबाच्या झाडावर गोळा होतात. भुंगेरे २.५ किमी अंतरापर्यंत खाद्य शोधण्यास टप्प्याटप्प्याने जातात. जमिनीतून आधी मादी भुंगेरे येतात नंतर नर भुंगेरे येतात. झाडावर ५-१० मिनिटात मिलन होते व वेगवेगळे होऊन झाडाची पाने खाण्यास सुरवात करतात. सूर्योदयापूर्वी मादी जमिनीमध्ये ७ ते १0 सेंमी. खोलीवर अंडी घालते. एक मादी ५0 ते ७0 अंडी घालते. अंडी ९ ते २४ दिवसांमध्ये उबतात. त्यातून अळी बाहेर पडते. दोनदा कात टाकून ५ ते ९ महिन्यांमध्ये पूर्ण वाढते. जमिनीत कोशावस्थेमध्ये जाते. १४ ते २९ दिवसांनी प्रौढ मुंगे बाहेर पडतात. प्रामुख्याने नोव्हेंबरडिसेंबरमध्ये प्रौढ निघतात. हे प्रौढ जमिनीमध्ये सुतावस्थेत राहून मेजूनमधील पावसानंतर बाहेर निघतात.

प्रौढ ४७ ते ९७ दिवसांपर्यंत या किडीचा अधिक प्रादुर्भाव होतो.

मे, जून, जुलै : प्रौढ सुतावस्थेतून निघतात व मादी अंडी घालते.

ऑगस्ट ते नोव्हेंबर : अळी पिकांची मुळे कुरतडून उपजीविका करते.

नोव्हेंबर : जमिनीत कोशावस्था. नोव्हेबर ते डिसेंबर: कोषातून प्रौढ भुगे निघतात.

जानेवारी ते मे : प्रौढ भुगे जमिनीमध्ये सुसावस्थेत राहतात.

खाद्य वनस्पती :

अळी- अळी विविध पिकांच्या मुळा कुरतडून त्यावर उपजीविका करते जसे सोयाबीन,तूर, ज्वारी, बाजरी, गहू, मका, उस, भुईमूग, सूर्यफूल, मूग, मिरची, बटाटा, चवळी, टोमॅटो, कांदा, हळद, अद्रक, भाजीपाला पिके इत्यादी.

प्रौढ भुंगेरे – बाभूळ व कडूलिंब 

प्रसार :

हलकी जमीन, कमी पाण्याच्या ठिकाणी ही कोड जास्त प्रमाणात आढळते. शेणखताच्या माध्यमातून या किडीचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये होतो तसेच ही कोड जवळ-जवळ सर्व पिकांवर तसेच भाजीपाला पिकामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत असल्यामुळे या किडीचा प्रसार जास्त प्रमाणात दिसून येतो.

नुकसानीचा प्रकार :

प्रथम अवस्थेतील हुमणीच्या अळ्या अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रीय पदार्थावर उपजीविका करतात. दुस-या व तिस-या अवस्थेतील अळ्या ऊस, सोयाबीन, कापूस, अद्रक व हळद या पिकांची मुळे खातात. त्यामुळे पिकांची पाने पिवळी पडून सुकतात आणि नंतर वळून जातात. प्रादुर्भाव ग्रस्त झाडे सहज उपटली जातात.तसेच जोराचे वादळ आल्यास हि झाडे कोलमडून पडतात. या आळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने एका रेषेत दिसून येतो. एक आळी तीन महिन्यात तर  दोन किंवा जास्त अळ्या एका महिन्यात संपूर्ण मुळया कुरतडून उसाचे बेट कोरडे करतात. उपद्रवीत झाड वाळल्याने शेतात खास प्रकारचे ठिपके आढळून येतात.प्रादुर्भाव जास्त झाल्यास संपूर्ण शेतात वेगवेगळ्या जागी मोठ्या प्रमाणात झाडे वाळून जातात. विशेषता ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ह्या किडीमुळे होणारे नुकसान जास्त आढळून येते. अळ्या जमिनीत ९0 ते १२0 सेंमी खोलवर कोष अवस्थेत जातात. कोषातून मुंगेरे निघून जमिनीतच राहतात आणि मे किंवा जूनच्या पहिल्या पावसात ते जमिनीतून बाहेर पडतात. सरासरी या किडीमेळे ५० टक्यापेक्षा ही जास्त नुकसान आढळून येते.

 


नियंत्रण :

एक अळी प्रती चौरस मीटर किंवा झाडांवर सरासरी २o अगर त्यापेक्षा जास्त मुंगेरे आढळल्यास, पावसाळ्यात कडुनिंब अथवा बाभळीची पाने अर्धचंद्राकृती खालेली आढळल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.

एकात्मिक व्यवस्थापन :

मशागतीय पद्धत

उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी.

मे-जून महिन्यांत पहिला पाऊस पडताच मुंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुनिंब इ. झाडांवर पाने खाण्यासाठी व मीलनासाठी जमा होतात. झाडावरील मुंगेरे रात्री ८ ते ९ वाजता बांबूच्या काठीने झाडाच्या फांद्या हलवून खाली पाडावेत. ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. या प्रक्रिया प्रादुर्भाव प्रक्षेत्रातील शेतक-यांनी सामुदायिकपणे केल्यास अधिक फायदा होतो.

जोपर्यंत जमिनीतून मुंगेरे निघत आहेत, तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवावा.

यांत्रिक पद्धत

भुगे गोळा करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. सापळ्यातील भुगे गोळा करून मारावेत. एक प्रकाश सापळा एक हेक्टर क्षेत्रास पुरेसा होतो. या उपायामुळे अंडी घालण्यापूर्वी मुंगेरेचा नाश होतो.

निंदणी आणि कोळपणीच्या वेळी शेतातील अळ्या वेचून नष्ट कराव्यात. शेतामध्ये वाहते पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीतील अळ्या मरतील.

जैविक पद्धती

जैविक नियंत्रणामध्ये परोपजीवी मित्रबुरशी मेटारायझीम अॅनीसोप्ली व सूत्रकृमी हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचा वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते. 

रसायनिक पद्धती  

जमिनीतून फोरेट (१0 टक्के दाणेदार) किंवा फिप्रोनिल (0.३ टका दाणेदार) २५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे.  क्लोरपायरिफॉस (२0 टक्के प्रवाही) २५ ते ३0 मि.लि. प्रति १0 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

झाडांवर सरासरी २० अगर त्यापेक्षा जास्त मुंगेरे आढळल्यास किंवा झाडाची पाने खालेली आढळल्यास मे-जूनमध्ये क्लोरप्पायरिफॉस (२० टक्के प्रवाही) २५ ते ३० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी. फवारणीनंतर १० दिवस जनावरांना या झाडाची पाने खाऊ घालू नये.

शेणखतामार्फत हुमनीच्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात त्यासाठी एक गाडी खतात १ किलो ४ टक्के मॅलॅथीऑन भुकटी टाकावी.

लेखक - 

                      अरविंद तोत्रे*, अमृता जंगले, प्रवीण राठोड, वैशाली घुमरे

पी.एच.डी.विद्यार्थी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी. जि.अहमदनगर

English Summary: Integrated management of Humani
Published on: 27 August 2020, 03:48 IST