पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले असतात. पूर्ण विकसित घाटे अळी पोपटी रंगाची (यात विविध रंगछटा सुध्दा आढळतात) व शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात.लहान अळया सुरूवातीस पानावरील आवरण खरडून खातात.पूर्ण वाढ झालेली अळी तोंडाकडील भाग घाट्यात घालून आतील दाणे फस्त करते. एक अळी साधारणत: 30-40 घाट्यांचे नुकसान करते. विशेषत: पिक कळी फुलोरा अवस्थेतf आल्यापासून अळीचा जास्त प्रादुर्भाव दिसून आपल्या दिसून येतो.
एकात्मिक व्यवस्थापन :
सुरूवातीच्या काळात निंबोळी अर्क 5 टक्के द्रावणाची एक फवारणी घ्यावी. त्यामुळे अळीची भूक मंदावते आणि त्या मरतात. या किडीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगले होते. त्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी 200 ग्रॅम ज्वारी किंवा सरीवर मका टोपावी. या पिकांच्या मित्र किडीच्या आकर्षणासाठी उपयोग होतो त्यामुळे घाटे अळीचे नियंत्रण कराला सोपे जाते. पक्षांना बसायला जागोजागी पक्षीथांबे लावावेत. त्यावर कोळसा, चिमण्या, सांळुक्या असे पक्षी येतात आणि अळ्या वेचतात तसेच हेक्टरी ५ फेरोमेनचे सापळे लावावेत.
जैविक नियंत्रण:
हरभहरभऱ्यातील घाटेअळीच्या प्रभावी नियंत्रणाकरीता प्रति हेक्टर एचएएनपीव्ही 250 रोगग्रस्त अळयांचा अर्क (2:10:9 तीव्रता) किंवा 500 रोगग्रस्त अळयांचा अर्क (1:10:9 तीव्रता) फवारावा. विषाणूच्या फवाऱ्याची कार्यक्षमता अति-निलकिरणात टिकवण्यासाठी अर्धा लिटर पाण्यात 50 ग्रॅम राणीपॉल टाकून हे द्रावण 1 मि.ली. प्रति लिटर याप्रमाणे अर्कात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी शेतात प्रथम व व्दितीय अवस्थेतील अळया असताना केल्यास अतिशय प्रभावी ठरते. जास्त प्रादुर्भावाच्या काळात जर घाटे अळीने नुकसानीची पातळी (1-2 अळया प्रती मिटर ओळ किंवा 5 टक्के किडग्रस्त घाटे) पार केल्यास खालील नियंत्रण करावे.
रासायनिक किटकनाशक
हरभऱ्यावरील घाटेअळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील प्रभावी व्यवस्थापनासाठी रेनाक्झीपायर 20 एससी 2.5 मि.ली. किंवा फ्लुबेंडामाईड 20 डब्ल्युडीजी 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अळयांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर पोहोचल्यास क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 15 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या केल्यास अळीचे व्यवस्थापन आपल्या करता येईल.पहिली फवारणी 40 ते 50 टक्के फुले धरल्यावर तर दुसरी फवारणी 15 दिवसाने करावी.हरभऱ्यावरील घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी व आर्थिक मिळकतीसाठी पीक 50 टक्के फुलोऱ्यावर असताना डेल्टामेथ्रीन 1 टक्का प्रवाही-ट्रायझोफॉस 35 टक्के प्रवाही या मिश्र किटकनाशकाची 25 मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी.
त्यानंतर 15 दिवसांनी इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दुसरी फवारणी करावी.
लेखक : शक्ती आनंदराव तायडे
(आचार्य पदवी धारक , महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी.)
Published on: 12 December 2021, 08:31 IST