Agripedia

वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी अळीच्या प्रादुर्भावामुळे सर्वसाधारपणे ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. वेळीच उपाययोजना न केल्यास हे नुकसान ८० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. या किडीच्या नियंत्रणासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात.

Updated on 17 October, 2021 7:16 PM IST

वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणारी अळी ही कीड अंडी, अळी, कोष व प्रौढ अशा चार अवस्थांमधून आपले जीवन पूर्ण करते. त्यापैकी अळी अवस्था आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक असते. या किडीची अळी छोटी व फिक्कट गुलाबी रंगाची असते. पतंग मध्यम आकाराचा असून पुढील पंख पांढरट व त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात. 

जीवनक्रम :- 

या किडीची मादी एकानंतर एक अशी २५० अंडी झाडाच्या पानावर, शेंड्यावर, फुलकळ्यावर आणि कोवळ्या फळांवर घालते. अंडी गोलाकार व सफेद पिवळसर रंगाची असतात. ही अंडी ३-५ दिवसांनी उबतात व त्यातून सफेद अळी बाहेर पडते. ही अळी पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत शेंडा व फळधारणेवेळी फळांमध्ये नुकसान करते. ही अळी १५-२० दिवसांनी प्रौढ बनून गुलाबी रंगाची दिसते, नंतर ती शेंडा अथवा फळांमधून निघून जमिनीत अथवा पालापाचोळ्यात किंवा मुळाजवळ कोषावस्थेत जाते. आठवडाभराच्या कालावधीनंतर कोषामधून प्रौढ (पतंग) बाहेर येतो. प्रौढांचे आयुष्य ६-१० दिवसांचे असते. 

नुकसानीचा प्रकार :- 

या किडीचा प्रादुर्भाव रोप लावल्यानंतर काही आठवड्यानंतर दिसून येतो. अळी प्रथम पानांच्या देठात, कोवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. या किडीचे प्रमुख लक्षण म्हणजे प्रादुर्भावग्रस्त शेंडे वाळतात. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी कळी पोखरून आत शिरते, प्रादुर्भावग्रस्त फुले फळ न धरता वळून, सुकून जमिनीवर गळून पडतात. फळे आल्यानंतर ही अळी सुरवातीला छिद्र करून फळांत प्रवेश करून विष्ठेद्वारे प्रवेशद्वार बंद करते. त्यामुळे बाहेरून फळ किडल्याचे लवकर लक्षात येत नाही. आतील गर खाऊन विष्ठा आतच सोडत असल्यामुळे कीडग्रस्त फळे खाण्यास अयोग्य ठरतात. 

एकात्मिक कीड व्यवस्थापन :- 

किडीच्या नियंत्रणासाठी केवळ रासायनिक कीटकनाशकांचा वापर करण्याऐवजी मशागत, लागवडीपासूनच एकात्मिक व्यवस्थापनाच्या पद्धतींचा अवलंब करावा. 

१. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी, त्यामुळे किडींच्या विविध अवस्था नष्ट होतात. 

२. एकाच शेतामध्ये वर्षानुवर्षे वांग्याचे पीक घेऊ नये. जास्त प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये पुढच्या वर्षी वांग्याचे पीक घेणे टाळावे. पिकांची योग्य प्रकारे फेरपालट करावी 

३. मागील पिकांचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत. 

४. लागवडीसाठी वांग्याच्या सुधारित व शिफारशीत वाणांचा वापर करावा. या पिकाला गरजेनुसार खतमात्रा द्यावी. आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. 

५. प्रादुर्भावग्रस्त झाडाचे शेंडे व फळे तोडून अळ्यांसहीत त्यांचा नायनाट करावा. 

६. वाणांच्या शिफारशीनुसार दोन झाडांमधील व दोन ओळींतील अंतर ठेवावे. 

७. प्रकाश सापळ्यांचा उपयोग करून पतंग नष्ट करावेत. 

८. वांगी पिकामध्ये सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावावेत. शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळ्यांच्या तीव्रतेची कल्पना येईल. 

९. पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा (अँझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम ) २.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी. 

१०. जैविक कीड नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा व ब्रेकाँन या परोपजीवी कीटकांच्या अंड्याचे प्रसारण करावे. 

११. वरील उपाययोजना केल्यावरही शेंडा व फळे पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळीपेक्षा अधिक आढळल्यास, रासायनिक नियंत्रणाचा विचार करावा. 

आर्थिक नुकसान पातळी : ५ टक्के शेंड्यांचे किंवा फळांचे नुकसान. 

रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी) 

क्लोरपायरीफॉस (२० ई.सी.) १.५ मि.ली. 

ईमामेक्टीन बेन्झोएट (५ एस.जी.) ०.४ ग्रँम 

क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ एस.सी.) ०.३ मि.ली. 

पायरीप्रोक्झीफेन (५ ई.सी.) अधिक फेनप्रोपॅथ्रीन (१५ ई.सी.) (संयुक्त किटकनाशक) १ मि.ली. 

विनोद धोंगडे मो.नं.9923132233 

मु. नैनपुर ता.सिंदेवाहि जि. चंद्रपुर(म.रा.)

English Summary: Integrated management of eggplant tops and fruit larvae
Published on: 17 October 2021, 07:16 IST