Agripedia

मृद-जल व्यवस्थापनाच्या बरोबरीने जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्ब, आर्द्रता, जमिनीची सच्छिद्रता याकडे लक्ष द्यावे. येत्या हंगामाचा विचार करता एकात्मिक शेती पद्धतीने नियोजन करून जमिनीची सुपीकता वाढविणे आवश्यक .

Updated on 18 December, 2021 9:33 PM IST

जिरायती शेतीशी निगडित असणारा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे तापमान. जिरायती पट्ट्यात हंगामानुसार तापमानामध्ये प्रचंड तफावत असते. ही तफावत जमिनीतील सेंद्रिय कर्ब, आर्द्रता, सूक्ष्म जिवांच्या प्रक्रियेवर परिणाम करते. तापमानामध्ये असणारी तफावत ही जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या उत्सर्जनासाठी कारणीभूत ठरते, त्यामुळे सेंद्रिय कर्बाची वाढ कमी होते. त्याचा परिणाम जमिनीच्या जडणघडणीवर होतो.

आर्द्रता

पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी लागणारी आर्द्रता कमी वेळ राहत असल्याने रासायनिक किंवा सेंद्रिय खतांची अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याची कार्यक्षमता वेगाने कमी होते. याचा परिणाम म्हणजे सगळ्या निविष्ठा वेळेवर व संतुलित देऊनही पीक उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन येत्या काळात पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचे नियोजन करावे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन झाल्यास तापमानवाढ, खंडित पाऊसमान याचा फारसा परिणाम पीक वाढीवर होत नाही.

संवर्धित शेती सहसा काळ्या जमिनीमध्ये हा प्रयोग तेवढा यशस्वी नाही; पण शून्य मशागतीऐवजी कमी मशागत हा पर्याय योग्य ठरतो. वखरणी, दोन कोळपणी आणि दोन निंदणी यांचा एकत्रित उपयोग जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यास उपयुक्त आहे. या शेती पद्धतीद्वारे पडणारा पाऊस जागच्या जागी मुरवला जाऊन धूप कमी होते. अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे जमिनीचे तापमान संतुलित राहून अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते.

 पिकांच्या अवशेषांचा वापर

सेंद्रिय खतांचा कमतरतेच्या काळात पीक अवशेषाद्वारे २५ ते ३० टक्के अन्नद्रव्यांची गरज पूर्ण केली जाऊ शकते पिकांचे अवशेष जमिनीतून होणारे बाष्पीभवन थांबवते. यामुळे जमिनीची जलधारण क्षमता वाढल्याने खंडित पाऊसमान अथवा तापमानवाढ झाल्यास पीक संरक्षण शक्य होते.

आच्छादन

जमिनीमधून होणारे कर्ब उत्सर्जन थांबवून जमिनीतील पाण्याचे संवर्धन करण्याची हे तंत्र उपयोगी आहे. आच्छादनासाठी पिकांचे अवशेष, हिरवळीचे खत, इत्यादींचा वापर करावा. आच्छादन हे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यास उपयुक्त ठरते जमिनीतील ओलावा टिकून राहतो.

हिरवळीची खते

सेंद्रिय खते किंवा पिकांचे अवशेष यांची उपलब्धता कमी असल्याने हिरवळीचे खत हे भूसुधारक, सेंद्रिय घटक वाढविणारा महत्त्वाचा स्रोत आहे.

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी येत्या हंगामात धैंचा, बोरू, ताग, मूग यासारख्या हिरवळीच्या पिकांची लागवड करावी. हिरवळीच्या खतांमुळे अन्नद्रव्ये कार्यक्षमतेने उपलब्ध होतात. जमिनीच्या तापमानाचे व्यवस्थापन शक्य होते. हिरवळीची खते शेतातच उपलब्ध होत असल्याने जास्तीचा खर्च होत नाही.

आंतरपीक पद्धती

आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.आंतरपीक पद्धतीमध्ये नत्र स्थिर करणाऱ्या पिकांची लागवड केल्यास त्यांचे सेंद्रियकरण लवकर होते. कुजण्याची प्रक्रिया लवकर होते. या वर्गातील पिकांपासून अधिकाधिक अवशेषमिळतात.आंतरपीक पद्धतीचा मृदसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून फायदा होतो. येत्या हंगामात आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

रुंद सरी वरंबा पद्धत

रुंद सरी वरंबा पद्धत जिरायती शेतीसाठी फायदेशीर आहे. रुंद सरी वरंब्यावर कापूस, सोयाबीन, मूग, उडीद यांसारखी पिके घेता येतात. 

या पद्धतीत पडणाऱ्या पावसाचे जागच्या जागी संवर्धन होते. वाहून जाणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळता येतो. जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त वेळ टिकून राहत असल्याने तसेच जमिनीचे तापमान व आर्द्रताही टिकून रहाते.

 

milindgode111@gmail.com

मिलींद गोदे

English Summary: Integrated management increase the soil fertility trying
Published on: 18 December 2021, 09:33 IST