मका हे सर्व तृणधान्यामध्ये अधिक उत्पादन क्षमता असणारे, विविध हवामान आणि भौगोलिक क्षेत्रात येऊ शकणारे पिक आहे. मका मानवी आहारात अन्नधान्य, जनावरांसाठी हिरवा चारा व पशुखाद्यामध्ये खुराक तसेच औद्योगिक क्षेत्रात मक्याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. मक्याच्या विविध उपयोगांमुळे त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने बाजारात भाव चांगला मिळत आहे.
मका पिकाखालील क्षेत्रात आणि उत्पादनात भरीव वाढ झालेली असून देशामध्ये या पिकाच्या लागवडीखाली 9.47 लाख हे.क्षेत्र असून उत्पादन 31.24 लाख टन आहे. मका या पिकाच्या योग्य वाढ आणि विकासासाठी 25 ते 30 अंश से. तापमान चांगले असते परंतु 35 अंश से. पेक्षा जास्त तापमान गेल्यास उत्पादनात घट येते. मका पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची अधिक सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन चांगली असते. चोपण, क्षारयुक्त जमिनीमध्ये या पिकाची लागवड घेणे टाळावे.
पेरणीचा कालावधी
मक्याची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात करता येते. खरीप हंगामात मान्सूनच्या संभाव्य आगमनानुसार मक्याची पेरणी करावी. पाण्याची उपलब्धता असल्यास पेरणी मान्सूनपुर्वी 10-15 दिवस आधी केल्यास अधिक उत्पन्न मिळते. खरीप हंगामात उपपर्वतीय विभागातील जमिनीमध्ये अधिक उत्पादनासाठी जिरायतीखाली मक्याची पेरणी जून ते जुलै महिन्याचा दुसरा आठवड्यापर्यंत करावी. खरीपातील पेरणीस उशीर झाल्यास खोड किडींचा प्रार्दुभाव होतो. त्यामुळे रोपांची संख्या योग्य न राहिल्याने उत्पन्न घटते.
दरम्यान यंदा राज्यातील सर्वच मका उत्पादक जिल्ह्यांमध्ये अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना फवारण्या करव्या लागत आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेळगाव, निमगाव, वळकुटे, अंथुर्णे , वालचंदनगर, कळस, भिगवण, बावडा, भातनिमगाव, लाखेवाडी, डहाळज, रुई, न्हावी, परिसरात, एक ते दीड हजार हेक्टरवर लष्करी अळीचा ४० ते ५० टक्के प्रादुर्भाव झाला आहे. दौड, बारामती, जुन्नर, खेड, शिरुर, आंबेगाव तालुक्यांमध्येही प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, माळशिरस, अक्कलकोटच्या काही भागांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत आहेत. पांढरे ठिपके असल्याचे, पाने कुरतडली गेले आहेत. यासह कोंबात अळीची अंडी उबल्याचेही दिसत आहे. नगर जिल्ह्यात सहा ते सात हजार हेक्टर क्षेत्रावर अळीने आक्रमण केले असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.
Published on: 17 July 2020, 05:14 IST