Agripedia

मित्रकीटक नुकसानकारक किडींपेक्षा आकाराने लहान व चपळ असतात. किडीच्या अंगावर किंवा शरीरामध्ये राहून त्यांना ते हळूहळू खातात व मारतात. यातील काही कीटक असे.

Updated on 13 February, 2022 1:47 PM IST

मित्रकीटक नुकसानकारक किडींपेक्षा आकाराने लहान व चपळ असतात. किडीच्या अंगावर किंवा शरीरामध्ये राहून त्यांना ते हळूहळू खातात व मारतात. यातील काही कीटक असे.

जैविक नियंत्रणातील महत्त्वाचे मित्रकीटक–

1)ट्रायकोग्रामा

या परोपजीवी कीटकाच्या अनेक प्रजाती नुकसानकारक किडींचे जैविक नियंत्रण करताना आढळतात. त्यापैकी ट्रायकोग्रामा चिलोनीस ही प्रजाती जैविक नियंत्रणातील एक मुख्य उदाहरण आहे. या परोपजीवी कीटकांचा उपयोग ऊस, भात, मका व ज्वारीवरील खोडकिडी, कांडी कीड, कपाशीवरील बोंड अळी, भाजीपाला पिकांवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, घाटे अळी, डाळिंबावरील सुरसा, कोबीवरील चौकोनी ठिपक्याचा पतंग आदी किडींच्या नियंत्रणासाठी होतो.प्रसारण मात्रा - एका ट्रायकोकार्डवर सुमारे 20 हजार परोपजीवीयुक्त अंडी असतात. अशा ट्रायकोकार्डसचे पाच ते 10 प्रति हेक्टर या प्रमाणात तर प्रौढांचे 50 हजार प्रौढ प्रति हेक्टर याप्रमाणे प्रसारण करावे. किडीच्या प्रादुर्भावानुसार आठवड्याच्या अंतराने चार ते पाच प्रसारणे करावीत.

2) एनकार्शिया

हे कीटक भाजीपाला, फळपिके, फुलपिके व पॉलिहाऊसमधील पिकांवरील रस शोषक किडी (उदा. पांढरी माशी, मावा, उसावरील लोकरी मावा) आदींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत.प्रसारण - नुकसानकारक किडींचा प्रादुर्भाव दिसू लागताच त्यांचे प्रसारण करावे.

3) एपिरिकॅनिया

हे मित्रकीटक उसावरील नुकसानकारक पायरिला या किडीच्या पिल्ले व प्रौढ अवस्थांवर परजीवीकरण करतात. या मित्रकीटकांमुळे पायरिलाचे अत्यंत प्रभावी नियंत्रण होते.प्रसारण – 50 हजार अंडी किंवा 5000 कोष प्रति हेक्टर. गरजेनुसार पुढील प्रसारणे करावीत.

4)ब्रेकॉन 

कापसावरील बोंड अळी, बटाट्यावरील पाकोळी, भेंडीवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, भात, मका व उसावरील खोड किडा, नारळावरील काळ्या डोक्याची अळी व अन्य पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी यांचा उपयोग होतो.प्रसारण – 50 हजार प्रौढ प्रति हेक्टर

 

ब) परभक्षी कीटक हे कीटक नुकसानकारक किडीपेक्षा आकाराने मोठे व सशक्त असतात. एक परभक्षी कीटक त्याच्या जीवनात अनेक किडींचा नायनाट करतो.

1) लेडी बर्ड बीटल

(ढाल किडे) हे परभक्षी कीटक बहुतांश पिकांवरील रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे व पिठ्या ढेकूण आदी किडींवर उपजीविका करतात. मका, ज्वारी, कापूस, ऊस, कडधान्ये, 

भाजीपाला इत्यादी पिकांवर हे मित्रकीटक मोठ्या प्रमाणावर आढळतात. यांच्या अनेक प्रजाती आढळून येतात.प्रसारण - 2500 प्रति हेक्टर

 

2)प्रार्थना कीटक

हे मित्र कीटक निसर्गतः आढळून येतात. हे कीटक पतंगवर्गीय किडींच्या अळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतात.

 

3) सिरफीड माशी

या परभक्षी कीटकांची अळी मुख्यतः मावा या रसशोषक किडीला फस्त करतात. या कीटकांचा उपयोग ऊस, ज्वारी, मका, भाजीपाला पिकांमध्ये होतो. हे कीटक निसर्गतः मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.

English Summary: Informing beneficial insects and disease does decrease control
Published on: 13 February 2022, 01:47 IST