पाण्यावाटे क्षारांचा निचरा
क्षारपड जमिनीच्या सुधारणांमध्ये पाण्यावाटे क्षारांचा निचरा चराद्वारे करणे अत्यंत प्रभावी उपाययोजना आहे. त्यामध्ये उघडे चर निचरा पद्धती आणि भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धती असे दोन प्रकार पडतात.
उघडे चर निचरा पद्धती
शेताच्या उंच भागाकडून सखल भागाकडे पाण्याचा प्रवाह वाहत जातो. त्या वेळी तीन ते चार फूट खोलीचे चर शेतजमिनीच्या उताराच्या आडव्या दिशेने घेऊन ते चर मुख्य चरात किंवा नाल्यास जोडून पाण्याचा निचरा करावा. अशा प्रकारे घेतलेल्या चरात जर लहान-मोठे दगडगोटे, मुरूम, विटांचा चुरा, वाळू भरून त्यावर माती टाकली तर चरांमुळे वाया जाणारी जमीन लागवडीखाली आणता येईल. शिवाय मशागतीस अडथळा येणार नाही आणि चरांची वारंवार दुरुस्ती करावी लागणार नाही.
भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धती
चोपणयुक्त जमिनीसाठी भूमिगत निचरा प्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे. काळ्या भारी जमिनीमध्ये चोपण जमिनीचे प्रमाण सतत वाढत आहे. अशा जमिनीतील क्षारांचा नियमित निचरा करण्यासाठी चर काढणे जरुरीचे आहे.
क्षारयुक्त व चोपण जमिनीत मुख्य चर दोन मीटर खोलपर्यंत काढावा आणि बाजूचे जर एक ते दीड मीटर खोलीपर्यंत काढावेत. बाजूच्या दोन चरांमधील अंतर भारी काळ्या जमिनीत 30 मीटर आणि मध्यम काळ्या जमिनीत 60 मीटर ठेवावे. मुख्य चरांमध्ये पीव्हीसी 30 सें.मी. व्यासाचा पाइप वापरावा. बाजूच्या चरामध्ये दगडगोट्यांचा थर द्यावा आणि त्यावर जाड वाळूचा आणि त्यानंतर बारीक वाळूचा थर देऊन माती टाकून जमीन सपाट करावी.
चोपणयुक्त जमिनीमध्ये निचरा प्रणालीबरोबर भूसुधारके वापरणे गरजेचे असते. म्हणून निचरा पद्धतीची आखणी ही तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित होणे गरजेचे असते.
ही आखणी करताना समस्यायुक्त क्षेत्राचे सर्वेक्षण, कंटूर नकाशा, निचऱ्याचे पाणी निर्गमित करण्याची व्यवस्था, मातीतील क्षारांशी संलग्न असणारे भौतिक व रासायनिक गुणधर्म, सच्छिद्रता, भूमिगत जलाची पातळी, पाण्याची क्षारता, जलीय संचालकता, पिकांना पाणी देण्याच्या पद्धती आणि पीक पद्धती आदी बाबींचा विचार करावा लागतो.
शिफारस
भारी काळ्या जमिनीची सुधारणा करण्यासाठी सच्छिद्र पाइप भूमिगत निचरा प्रणाली (1.25 मीटर खोली, दोन पाइपमधील अंतर 25 मीटर आणि जिप्सम आवश्यकतेच्या 50 टक्के व हिरवळीचे पीक धैंचा) यांचा एकात्मिक वापर करावा.
अशा पद्धतीने जमिनीचे माती परीक्षण करून, गुणधर्म अभ्यासून वर्गीकरणाप्रमाणे एकात्मिक पद्धतीने सुधारणा केल्यास क्षारपड जमिनींची सुधारणा करून जमिनीचे आरोग्य चांगले ठेवता येईल आणि विविध पिकांचे शाश्वत उत्पन्न घेता येईल.
कषार व चोपण जमिनीसाठी पिकांची सहनशीलता
पिकांचा प्रकार +क्षार संवेदनशील +मध्यम क्षार सहनशील +जास्त क्षार सहनशील
अन्नधान्य पिके +उडीद, तूर, हरभरा, मूग, वाटाणा, तीळ +गहू, बाजरी, मका, भात, मोहरी, करडई, सोयाबीन, एरंडी, सूर्यफूल, जवस +ऊस, कापूस
भाजीपाला पिके +चवळी, मुळा, श्रावण घेवडा +कांदा, बटाटा, कोबी, लसूण, टोमॅटो, गाजर, काकडी +पालक, शुगरबीट
फळबागा पिके +संत्रा, लिंबू, मोसंबी, पपई, सफरचंद, कॉफी, स्ट्रॉबेरी +चिकू, डाळिंब, अंजीर, पेरू, द्राक्षे, सीताफळ, आंबा +नारळ, बोर, खजूर, आवळा
वन पिके +साग, शिरस, चिंच +बाभूळ, कडुनिंब +विलायती भाभूळ, शिसम, निलगिरी
चारा पिके +ब्ल्यू पॅनिक, पांढरे व तांबडे क्लोव्हर +पॅरागवत, जायंट गवत, सुदान गवत, जयवंत गवत +बरसीम, लसूण घास, ऱ्होडस गवत, कर्नाल, बरमुडा गवत.
शेतकरी मित्र
विजय भुतेकर सवणा
9689331988
Published on: 13 March 2022, 06:29 IST