सेंद्रिय कर्ब हे मातीतील असंख्य सूक्ष्मजीवांचे अन्न आहे. सूक्ष्मजीव जमिनीतील खतांमधील अन्नद्रव्ये वनस्पतींना उपलब्ध करून देतात. हे लक्षात घेऊन जमिनीची सुपीकता वाढवण्याकडे लक्ष द्यावे.
आपल्या जमिनीचा सामू दिवसेंदिवस वाढत म्हणजे विम्लयुक्त होत चालला आहे.सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.०१ ते ५ टक्के असावे. परंतु, आपल्याकडील भौगोलीक परिस्थिती व वातावरण यामुळे ही मात्रा अत्यंत कमी म्हणजे ०.०२ पासून ते कमाल ०.०६ पर्यंत आहे. आपल्याकडे असलेल्या जास्त तापमानामुळे सेंद्रिय कर्बाचे ‘ऑक्सिडेशन’ होते. उसाचे पाचट, कडबा, भाताचे तुस जाळणे, रासायनिक खतांचा अमर्याद वापर आदी कारणांमुळे हा कर्ब कमी होत चालला आहे.
सेंद्रिय कर्बामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा होऊन जमिनीचे आरोग्य चांगले राहते. वनस्पती स्वतःला लागणारे अन्नद्रव्य सेंद्रिय स्वरुपात घेत नाहीत. ज्या वेळी सूक्ष्मजीवांकडून सेंद्रिय घटकांचे विघटन होते त्यानंतरच असेंद्रिय (रासायनिक) स्वरुपात सर्व अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. आपल्याला पिढ्यानपिढ्या जमिनीच्या माध्यमातून अधिकाधिक पीक उत्पादन घ्यावे लागते. म्हणूनच जमिनीची चिरस्थायी उत्पादकता नियंत्रित ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्बाच्या योग्य व्यवस्थापनास महत्त्व आहे. राज्यातील माती परीक्षण अहवालाचा तुलनात्मदृष्ट्या अभ्यासावरून असे आढळले की सेंद्रिय कर्ब, एकूण नत्र, उपलब्ध स्फुरद आणि उपलब्ध पालाशचे जमिनीतील प्रमाण कमी झाले आहे. याचाच अर्थ असा की सेंद्रिय कर्बाचा प्रत्यक्ष परिणाम उपलब्ध नत्र आणि उपलब्ध स्फुरदाच्या साठ्यावर आणि अप्रत्यक्षरीत्या उपलब्ध पालाशच्या प्रमाणावर झाला आहे.
सेंद्रिय कर्बाचे अनुकूल परिणाम
१. भौतिक
सेंद्रिय कर्ब अतिसूक्ष्म चिकण मातीची संयोग पावून चिकणमाती ह्युमस संयुक्त पदार्थ तयार होतो. ह्युमसची सेंद्रिय कर्बाच्या अवस्थेतील उपलब्धता भौतिक अनुकूल प्रभाव पाडते.
जमिनीची घनता कमी करून मातीच्या कणाकणातील पोकळी वाढवून हवा खेळती ठेवते. त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता तसेच पाणी मुरण्याची अवस्था आणि निचऱ्याची क्षमता वाढते. जमिनीची धूप थांबते. तिची जलवाहक शक्ती वाढते. जमिनीची जडणघडण रचना अनुकूल होते.
२. रासायनिक
विविध पिकांच्या अवशेषातील कर्ब-नत्र गुणेत्तोर प्रमाण ४०.१ ते ९०.१ पर्यंत असते. ह्युमस किंवा जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमध्ये एकूण नत्राचे प्रमाण ५.० ते ५.५ टक्के आणि कर्बाचे प्रमाण ५० ते ५८ टक्के असते. सुपीक जमिनीतील ह्युमसचा कर्ब नत्र ९ः१ ते १२ः१ च्या दरम्यान असतो. गुणोत्तराचे प्रमाण जेवढे जास्त तेवढा सेंद्रिय खत कुजण्यास वेळ जास्त लागतो. साधारणतः १३ः१ ते १६ः१ कर्ब-नत्र गुणोत्तर हे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरले आहे. त्याचा परिणाम खालील बाबींवर होतो.
रासायनिक द्रव्यांची उपलब्धता वाढते.
नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो.
रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो.
स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढते.
सेंद्रिय कर्बातील फल्विक आम्ल आणि अन्य ह्युमिक पदार्थांमुळे रासायनिक सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त पदार्थांचा ऱ्हास अथवा स्थिरीकरण न होता विद्राव्य स्वरुपात ते पिकांना उपलब्ध होते.
जमिनाचा सामू उदासीन (६.० ते ७.०) ठेवण्यास मदत होते.
आयन विनिमय क्षमता वाढते.
चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांची स्थिरता कमी होते.
३. जैविक
सेंद्रिय कर्बाच्या जमिनीतील अस्तित्वामुळे सूक्ष्मजीवांच्या उत्पादन क्रियेस गती प्राप्त होऊन त्यांच्या संख्येत वाढ होते. सेंद्रिय कर्बामुळे विकरांचे प्रमाण वाढून अन्नद्रव्यांच्या उपलब्धेवर चांगला परिणाम होतो. सेंद्रिय निविष्ठांचा वापर करताना आपल्याकडे असलेले शेणखत चांगल्या प्रतिचे कसे राहील याकडे लक्ष द्यावे. ज्या प्रदेशात पाऊस पडतो तेथे ढीग पद्धतीने खत तयार करावे. याउलट कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खड्डा पद्धतीने शेणखत किंवा कंपोस्ट खत तयार करावे. सेंद्रिय खत चांगले कुजवावे. अन्यथा शेणखतातील तणांचा प्रादुर्भाव वाढेल. सेंद्रिय कर्बासाठी जैविक खते
शेणखत, कंपोस्ट खत, कोंबडी खत, शेळ्या-मेंढ्यांच्या लेंडीचे खत, पिकांपासून मिळणारा भुसा, पीक अवशेष, काडीकचरा, हिरवळीची खते आदी
हिरव्या सेंद्रिय द्रव्यांमध्ये कर्बोदके आणि प्रथिने यांचे प्रमाण १२ ते १५ टक्क्यापर्यंत
साधारणतः जमिनीत सेंद्रिय अवस्थेत नत्र ९३ ते ९७ टक्के तर स्फुरद २० ते २८ टक्के असतो.
गंधकही ९० ते ९७ टक्के सेंद्रिय अवस्थेत असतो.
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण उष्ण आणि वाळवंटी प्रदेश यावर अवलंबून असते.
जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे संवर्धन
पीक फेरपालटीत कडधान्य पिकांची लागवड करावी.
पिकांना शिफारशीप्रमाणे दरवर्षी सेंद्रिय खत शेवटच्या कुळवाच्या पाळी अाधी जमिनीत मिसळावे.
क्षारपड जमिनीत धैंचा किंवा ताग पेरुन दीड महिन्यानंतर गाडावा. किंवा उसात आंतरपीक म्हणून घेऊन नंतर गाडावा.
उभ्या पिकात निंबोळी पेंडीचा वापर करावा.
पीक अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर करावा.
उदा. खोडवा उसात पाचट
चोपण जमिनीत सेंद्रिय व रासायनिक भूसुधारकांचा
(उदा. प्रेसमड, जिप्सम) वापर करावा. आम्ल जमिनीत लाईमचा वापर करावा.
कमीत कमी नांगरट करावी. बांधबंदिस्ती करून
जमिनीची धूप कमी करावी.
जैविक खतांचा बीजप्रक्रियेद्वारे तसेच शेणखतात
मिसळून जास्त वापर करावा.
सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी व खतांचे नियोजन करावे.
मशागत
नांगरणी ही बैलचलीत वा ट्रॅक्टरचलीत उपकरणांच्या साह्याने करण्यात येणारी क्रिया आहे. या क्रियेने माती उकरली जाते व खालची माती वरती येते. जमीन पोकळ होते. त्याद्वारे पिकांच्या मुळांना फैलण्यास वाव मिळतो. पीक जोमाने वाढते. नांगरणीला शेतीचा कणाच म्हटले तर वावगे ठरणार नाही.शक्यतो नांगरणी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात करावी. जेणे करून नांगरणी झालेला मातीचा थर सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे निर्जंतूक होतो. तसेच वरचा सुपीक थर खाली गेल्याने मातीतील सेंद्रिय कर्बाचे ज्वलनही कमी होते.
: प्रशांत नाईकवाडी,
(लेखक सेंद्रीय शेतीच्या प्रमाणीकरणातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आहेत.)
Published on: 11 December 2021, 08:58 IST