Agripedia

पावसाला उशिरा सुरवात झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत शेतीची कामे, पिकांचे नियोजन आणि पेरणीच्या अनुषंगाने बदल करणे आवश्‍यक आहे.

Updated on 06 February, 2022 11:44 AM IST

पावसाला उशिरा सुरवात झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत शेतीची कामे, पिकांचे नियोजन आणि पेरणीच्या अनुषंगाने बदल करणे आवश्‍यक आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाऊस लांबल्यास खरीप ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, कापूस, सूर्यफूल पिके घ्यावीत. अशा परिस्थितीत मूग, उडीद यांसारखी पिके योग्य ठरत नाहीत.

कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचे नऊ उपविभाग असून, चार 4 कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत. या कृषी विद्यापीठांमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी पीक नियोजन शिफारशी दिल्या आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्र व खानदेश विभाग

पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर तर खानदेशातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश होतो.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पाऊस लांबल्यास पावसाच्या अपेक्षित कालावधीनुसार करावयाच्या पिकांच्या नियोजनाच्या दिलेल्या शिफारशी पुढीलप्रमाणे आहेत.

जुलै दुसरा पंधरवडा - सूर्यफूल, राळ, भुईमूग, एरंडी, तूर, हुलगा, आंतरपीक - बाजरी, सूर्यफूल + तूर (2.1) एरंडी + गवार (1.2).

जुलैचा दुसरा पंधरवडा - सूर्यफूल, तूर, हुलगा, राळा, एरंडी आंतरपीक सूर्यफूल + तूर (2.1) तूर + गवार (2.1)

ऑगस्टचा पहिला पंधरवडा - सूर्यफूल, तूर, एरंडी, हुलगा. आंतरपीक सूर्यफूल + तूर (2.1) एरंडा + दोडका मिश्र पीक

ऑगस्टचा दुसरा पंधरवडा - सूर्यफूल, तूर, एरंडी. आंतरपीक सूर्यफूल + तूर (2.1)सप्टेंबर पहिला पंधरवडा - रब्बी ज्वारी.

मराठवाडा विभाग)

मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली व उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश होतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पावसाच्या अपेक्षित आगमन कालावधीनुसार आपत्कालीन परिस्थितीसाठी दिलेले पीक नियोजन.

जुलै दुसरा पंधरवडा - सं. बाजरी, सूर्यफूल, तूर, सोयाबीन, बाजरी + तूर, एरंडी + धने, एरंडी आणि तीळ. कापूस सं.ज्वारी भुईमूग.

ऑगस्टचा दुसरा पंधरवडा - सं. बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी + धने. कापूस सं.ज्वारी, भुईमूग आणि रागी.

सप्टेंबर दुसरा पंधरवडा - रब्बी ज्वारी, करडई आणि सूर्यफूल, हरभरा, जवस आणि गहू.

ऑक्‍टोबर पहिला पंधरवडा - रब्बी ज्वारी, करडई आणि जवस गहू, रब्बी गहू.

ऑक्‍टोबर दुसरा पंधरवडा ते नोव्हेंबर पहिला पंधरवडा - हरभरा, करडई, जवस आणि गहू, रब्बी ज्वारी आणि सूर्यफूल.

(विदर्भ विभाग)

अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना दिल्या आहेत. कृषी हवामानशास्त्राच्या दृष्टिकोनातून विदर्भ हमखास पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश व जास्त पावसाचा प्रदेश अशा तीन उपविभागांमध्ये विभागला जातो. या तिन्ही उपविभागांत ढोबळ मानाने एकाच वेळी पाऊस पडतो. या विभागांसाठी अभ्यासाअंती काही ठळक शिफारशी विद्यापीठाने दिल्या आहेत.

1) नियमित पावसाळा चार आठवड्यांपेक्षा जास्त उशिराने सुरू झाल्यास (16 ते 22 जुलै) पिकांचे खालील प्रकारे नियोजन करावे.

साधारणत: 20 ते 25 टक्के अधिक बियाण्यांचा वापर करावा. रासायनिक खतांच्या वापरात किमान 25 टक्के कपात करावी.

संकरित वाणाखालील क्षेत्र कमी करून सरळ सुधारित वाणांचा अधिक प्रमाणात वापर करावा.

ज्वारीवर खोडमाशी/खोड पोखरणारी अळी यांचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता वेळेवर प्रतिबंधात्मक; तसेच प्रादुर्भाव दिसून येताच त्वरित उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

मूग, उडीद पिकांची पेरणी शक्‍यतो कमी म्हणजे केवळ नापेर क्षेत्रावर करावी आणि या पिकाखालील क्षेत्र कमी करावे.

2) पावसाळा पाच आठवड्यांपेक्षा जास्त उशिराने सुरू झाल्यास (23 ते 29 जुलै) -

कपाशीची पेरणी शक्‍यतो करू नये. मात्र, काही क्षेत्रावर पेरणी करावयाची असल्यास केवळ देशी कपाशीचे सरळ सुधारित वाण वापरावेत. बियाणे 25 ते 30 टक्के अधिक वापरून पेरणी करावी. कपाशीच्या ओळींची संख्या नेहमीपेक्षा कमी करून 1 किंवा 2 ओळी तुरीच्या घ्याव्यात.

ज्वारीची पेरणी करू नये. काही क्षेत्रावर ज्वारी घ्यावयाची असल्यास बियाण्यांचा दर 30 टक्‍क्‍यांनी वाढवावा. ज्वारीमध्ये खोड माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता गृहीत धरून नियंत्रणासाठी उपाययोजना तयार ठेवावी. ज्वारीमध्ये तीन किंवा सहा ओळीनंतर तुरीचे पीक घेतल्यास हंगामाची जोखीम कमी होते.

सोयाबीन पिकाची पेरणी 25 जुलैपर्यंतच करावी. पेरणीसाठी स्वत:जवळचे बियाणे वापरावे. सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घ्यावे. या वेळी सोयाबीनच्या ओळींची संख्या कमी करावी.

मूग व उडीद पिकांची पेरणी अजिबात करू नये.

कोकण विभाग - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या कार्यक्षेत्रात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. या विभागात भात हे प्रमुख पीक आहे. भात लागवडीसाठी रोपांचे वय 28 ते 30 दिवसांचे असावे लागते. जून महिन्यात अपुरा पाऊस झाला आणि जुलै महिन्यात पाऊस लांबला तर दोन टप्प्यांत रोपवाटिका तयार करावी. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील रोपवाटिकेतील रोपे लागवडीसाठी उपयुक्त होतील.

याव्यतिरिक्त दापोग पद्धतीने रोपे तयार करणे. तसेच ज्या ठिकाणी रोपे उपलब्ध नसतील अशा ठिकाणी रोहू पद्धतीने बियाणास मोड आणून चिखलात बियाणे ओळीत किंवा फोकून पेरणी करावी. विद्यापीठाने पावसाच्या आगमन कालावधीनुरूप आपत्कालीन परिस्थितीत पीक नियोजनांच्या पुढीलप्रमाणे शिफारशी केलेल्या आहेत.

जुलैचा पहिला पंधरवडा - भाताचे लवकर पक्व होणारे व मध्यम कालावधीचे वाण (उदा. कर्जत - 5, कर्जत - 6, पालघर - 2, पनवेल - 1, पनवेल - 3) हुलगा, चवळी, कारळे.

 

३ ) त्यापेक्षा विलंबाने सुरू होणाऱ्या पर्जन्य परिस्थितीसाठी...

पीक उत्पादनातील (जोखीम) कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

राज्य शासन राबवित असलेल्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत 2014 - 15 मध्ये 95000 हेक्‍टर क्षेत्रावर उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यात येणार आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

मजूर कमतरता लक्षात घेता मूलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करावा. त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमांतर्गत अनुदानावर यंत्राची उपलब्धता केली जात आहे.

पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पाणीपुरवठा करण्यासाठी शेततळे निर्मिती करण्याकडे लक्ष द्यावे. पिकास पाणी द्यावे.

आपापल्या विभागात प्रत्यक्षात पावसास होणारी सुरवात विचारात घेऊन कृषी विद्यापीठांनी दिलेल्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांनी पीक नियोजन करावे.

 

लेखक:

डॉ. सुदामराव अडसूळ, 94220848333

(लेखक कृषी आयुक्तालय, पुणे येथे कृषी संचालक- विस्तार व प्रशिक्षण आहेत.)

English Summary: In emergency condition do crop management
Published on: 06 February 2022, 11:44 IST