Agripedia

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रामार्फत कोएम 0265 (फुले 265) हा ऊसाचा वाण महाराष्ट्रात सन 2007 मध्ये आडसाली, पूर्वहंगाम, सुरू या तिनही हंगामात लागवडीसाठी शिफारस करण्यात आला

Updated on 14 September, 2021 7:00 PM IST

त्यानंतर सन 2009 मध्ये हा वाण गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू या राज्यात अखिल भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ यांनी शिफारशीत केला. हा वाण को 87044 या वाणापासून निवड पध्दतीने तयार करण्यात आला. सुरुवातीला फुले 265 या वाणाला बर्याच साखर कारखान्यांनी गाळपासाठी नकार दिला होता त्यावेळी कारखान्यांचे म्हणणे असे होते की या फुले 265 वाणाचा साखर उतारा फार कमी आहे परंतु, महात्मा फुले कृषि विद्यापीठाने संशोधनांती दाखवून दिले की फुले 265 या वाणाचा तीनही हंगामात सरासरी साखर उतारा 14.40 टक्के, तर तुल्य वाण को 86032 मध्ये साखरेचे प्रमाण 14.47 मिळाले. फुले 265 हा वाण मध्यम ते उशिरा पक्व होणारा असून थंडीचा कालावधी मिळाल्यावर डिसेंबर/जानेवारीनंतर हा वाण तोडणीस योग्य असतो. सुरु ऊस 12 महिन्यांनी पूर्व हंगामी ऊस 14 महिन्यांनी आणि आडसाली ऊस 16 महिन्यांनी तोडणी केल्यास फुले 265 या वाणापासून साखर उतारा चांगला मिळतो. साखर कारखान्यांनी ऊस तोडणीचे नियोजन करतांना लवकर पक्व होणारे वाणांची तोडणी डिसेंबरपर्यंत करावी फुले 265 या वाणाची तोडणी जानेवारीनंतर केल्यास साखर उतारा चांगला मिळेल हा वाण शेतकर्यांच्या पसंतीस पडला आहे. या वाणाचे खोडव्याची फुट व वाढ चांगली असल्याने एकंदर उत्पन्नही चांगले मिळते.

जवळपास 13 खोडवे शेतकर्यांनी घेतल्याचे उदाहरणे आहेत. चाबूककाणी, मर लालकुज या रोगांना प्रतिकारक आहे. खोडकिड, कांडीकिड, शेंडेकिड, लोकरीमावा या किडींचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव होतो. महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्तालयाने सर्व सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांना नुकतेच पत्राद्वारे सुचीत केले आहे की फुले 265 या ऊस वाणाच्या लागवडीस शासनाची परवानगी असून या वाणाचा ऊस लागवडीस, गाळपास योग्य असल्याचे प्रमाणित झाले आहे. म्हणून ऊस उत्पादक शेतकर्यांच्या फुले 265 या ऊस वाणाची नोंद कारखान्यांनी घेण्यात यावी. पुढे त्यांनी म्हटले आहे की जी साखर कारखाने फुले 265 वाणाच्या ऊस लागवडीची नोंद घेणार नाहित त्या कारखान्यांचा गाळप परवाना नाकारण्यात येईल आणि शेतकर्यांच्या अशा तक्रारी पुन्हा प्राप्त होणार नाही याची दक्षता घेण्याचे त्यांना सुचीत केले आहे.

ऊस उत्पादनातील ही किमया फुले 265 मुळेच शक्य झाली महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कृषि अर्थशास्त्र विभागाने या वाणाच्या प्रभावाचा अभ्यास केला त्यामध्ये असे आढळून आले की, सन 2009-10 ते 2016-17 या 9 वर्षात शेतकरी आणि साखर कारखानदार यांना रू.31681/- कोटी इतका आर्थिक फायदा झालेला आहे.

कुलगुरु डॉ.पी.जी. पाटील

फुले 265 वाणाचा साखर उतारा तीनही हंगामात चांगला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये फुले 265 वाणाखाली सातत्याने क्षेत्र वाढत असून 32 टक्के क्षेत्रावर याची लागवड केली जात आहे फुले 265 या वाणाने शेतकर्यांमध्ये सुबकता आणली आहे या वाणाची महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीने शिफारस केली आहे.

संचालक संशोधन डॉ.शरद गडाख

फुले 265 वाण हा क्षारपड जमिनीसाठी उपयुक्त आहे. महाराष्ट्रात ऊस लागवड क्षेत्रापैकी 1.50 लाख हेक्टर क्षेत्र हे क्षारपड असून त्या ठिकाणी आडसाली लागवडीसाठी फुले 265 ला पर्याय नाही.

ऊस विशेषज्ञ डॉ.भरत रासकर

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.शिरोळ या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सन 2020-21 मध्ये फुले 265 या वाणाखाली 40 टक्के क्षेत्र होते त्यापासून सरासरी साखर उतारा 12.54 टक्के मिळाला आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि.पुणे या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सन 2008-2009 पासून फुले 265 वाणाची लागवड केली जाते. या वाणाची लागवड आणि साखरेच्या उतार्याचे सन 2017-18 ते 2021-22 या अलीकडच्या 5 वर्षाचे अवलोकन केले असता या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात फुले 265 या वाणाखाली 70 टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्र असतानाही साखर उतारा 12 टक्क्यापेक्षा अधिक मिळाला आहे. चालू वर्षी राज्याची सरासरी ऊस उत्पादन हेक्टरी 96 टन मिळाल्याचे साखर आयुक्तांकडील उपलब्ध आकडेवारी वरून दिसून येते.

या वाणाने नैराशाने ग्रासलेल्या शेतकर्यांच्या जीवनात क्रांती केली आणि खर्या अर्थाने शेतकरी सधन आणि संपन्न झाला, कर्जबाजारीतून मुक्त झाला काही शेतकर्यांनी फुले 265 ची किमया अशी नावे आपल्या ट्रक्टरला, जीपला, घराला दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात उसाच्या फुले 265 विक्रमी उत्पादनातून अनेक शेतकर्यांनी महेंद्र कंपनीच्या बोलेरो गाड्या खरेदी केल्या आहेत. यावरुन राज्याच्या विकासात विशेषतः ऊस पिकामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे योगदान दिसून येते.

लेखक - प्रवीण सरवदे, कराड

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

English Summary: in a sugar business dought of fule 265 variety
Published on: 14 September 2021, 07:00 IST