मधुमका मक्याचा एक प्रकार असून याची कणसे अधिक गोड आणि स्वादिष्ट असतात. या प्रकारच्या मक्याच्या दाण्या मध्ये साखरेचे प्रमाण 13 ते 15 टक्के असते. याचा वापर जास्त करून दुधाळ अवस्थेत असताना भाजून किंवा उकडून खाण्यासाठी करतात.
तसेच या पासून कॉर्न सूप, कटलेट, वडा, उपमा, भजी, दाण्यांची उसळ, स्वीट कॉर्न हलवा इत्यादी अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. हा मका 85 ते 100 दिवसांत काढणीस तयार होतो. त्यामुळे जनावरांना हिरवा चारा देखील उपलब्ध होतो. तसेच भुईमूग सारख्या पिकांमध्ये लागवड केली तर खूपचजास्त फायदा होतो.
मधुमक्याची लागवड पद्धत
1- हवामान- या मक्याला उष्ण हवामान चांगले मानवते. मधुमक्याच्या उत्तम वाढीसाठी 20 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. रात्रीचे तापमान जास्त काळ 15 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास मक्याच्या वाढीवर परिणाम होतो आणि दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास मका बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर देखील विपरीत परिणाम होतो.
2- लागणारी जमीन- या मक्याच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी मध्यम काळी किंवा जांभ्या दगडापासून तयार झालेली सुपीक जमीन योग्य आहे. जमिनीचा सामू सहा ते साडेसात पर्यंत असावा. चोपण किंवा जास्त दलदलीच्या जमिनीत या मक्याचे पीक घेऊ नये.
3- पूर्वमशागत-जमिनीची नांगरट करून कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. कुळवाच्या शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी 10 ते 12 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
4- पेरणी- रब्बी हंगामामध्ये नोव्हेंबर मध्ये पेरणी पूर्ण करावी व पेरणी करताना टोकण पद्धतीने जमिनीच्या मगदुरानुसार साठ बाय वीस सेंटीमीटर अंतरावर करावी. एका ठिकाणी दोन दाणे सुमारे चार ते पाच सेंटीमीटर खोलीवर करावी. मका उगवल्यानंतर दहा-बारा दिवसात विरळणी करून प्रत्येक ठिकाणी जोमदार आणि निरोगी एक रोप ठेवावे. पेरणीसाठी हेक्टरी 15 ते 20 किलो बियाणे वापरावे. तसेच बियाण्यास पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची प्रक्रिया तीन ग्रॅम कॅप्टन प्रति किलो बियाणे याप्रमाणे करावी.
5- खत व्यवस्थापन- मका पिकास हेक्टरी दहा टन शेणखत पेरणीच्या वेळी जमिनीत मिसळून द्यावे. याशिवाय प्रति हेक्टरी 200 किलो नत्र, 60 किलो स्फूरद आणि 60 किलो पालाश या खतांची मात्रा द्यावी. यापैकी प्रति हेक्टर 100 किलो नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी ओळी मध्ये सात ते आठ सेंटीमीटर खोली वर द्यावे. उरलेली नत्राची मात्रा पेरणीनंतर 30 आणि 60 दिवसांनी विभागून द्यावी.
6- आंतरमशागत - मकाचे पिक उगवल्यानंतर दहा बारा दिवसांनी विरळणी करून प्रत्येक ठिकाणी जोमदार असे एकच रोप ठेवावे. पेरणीनंतर 20 आणि 40 दिवसांनी निदणी करून पीक तणमुक्त ठेवावे.
7- पाणी व्यवस्थापन- या पिकास 10 ते 12 दिवसांच्या अंतराने सुमारे सहा ते आठ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात व पिकांमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
8- मधुमक्याची काढणी- कणसे दुधाळ अवस्थेत असताना कणसांची काढणी करावी. फक्त तयार कणसे काढून घ्यावेत.
अशाप्रकारे दोन ते तीन वेळा काढणी करावी नंतर उरलेले मक्याचे पीक जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून वापरावे. यापासून एकरी 150 ते 160 क्विंटल कणसांचे उत्पादन मिळते.
नक्की वाचा:Small Business Idea 2022 : 50 हजारात सुरु करा 'हा' व्यवसाय ; होणार अल्प कालावधीत श्रीमंत
Published on: 26 April 2022, 04:24 IST