भाजीसाठी लागवड करण्यात येणाऱ्या वालाचेअनेक स्थानिक प्रकार आहेत. त्यांची लागवड स्थानिक बाजारासाठी किंवा परसबागेत केली जाते. वालाच्या वाणांचा विचार केला तर त्या त्या भागात ठराविक वान लोकप्रिय आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर गुजरातमध्ये सुरती पापडी, वालपापडी अशा स्थानिक जातींची लागवड केली जाते.
कृषी विद्यापीठाने वालाच्या काही सुधारित जाती विकसित केल्या आहेत. त्यामध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे वेली सारखे वाढणाऱ्या व दुसरा प्रकार म्हणजे झुडूप वजावाढणाऱ्या जाती ह्या होय. या लेखात आपण वालाच्या काहीसुधारित जातींची माहिती घेणार आहोत.
वालाच्या काही सुधारित जाती
- वेली सारख्या वाढणाऱ्या जाती:
- फुले गौरी-ताटीचा आधार दिल्यास झाडांची वाढ व उत्पादन चांगले मिळते. शेंगा चपट्या व पांढरट हिरव्या रंगाच्या असून, शेंगांची लांबी 7 ते 9 सेंटीमीटर असते. प्रति हेक्टरी सरासरी उत्पादन 220 ते 250 क्विंटल मिळते. याचा कालावधी 180 ते 200 दिवसांचा असतो.
- डी एल 453- दक्षिण भारतात ही जात सर्वत्र लोकप्रिय असून याची लागवड जवळजवळ वर्षभर करता येते. ही जात 85 ते 90 दिवसांत भरपूर उत्पादन देते.
- दसरा वाल-याच्या शेंगा मळकट हिरव्या रंगाच्या असून दोन्ही कडेला जांभळ्या रंगाची झाक असते. शेंगा सात ते आठ सेंटिमीटर लांब व दोन सेंटीमीटर रुंद असतात. या जातीपासून दोनशे ते दोनशे दहा दिवसात हेक्टरी 70 ते 80 क्विंटल उत्पादन मिळते.
- दिपाली वाल- शेंगा पांढऱ्या रंगाच्या असून बियांच्या ठेवनीजवळ फुगीर असतात. शेंगा 16 ते 18 सेंटिमीटर लांब असून या जातीपासून दोनशे ते दोनशे दहा दिवसात 60 ते 80 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.
झुडूप वजा वाढणाऱ्या जाती:
- कोकण भूषण- शेंगा हिरव्या रंगाच्या असून शेंगांचे काढणी पेरणीनंतर 55 ते 60 दिवसांनी करता येते. या जातीची झाडे 75 ते 80 सेंटिमीटर असून झुडूप वजा वाढतात. शेंगांची लांबी 15 ते 16 सेंटिमीटर असून कोवळ्या व शिरा विरहीत असल्याने सालीसह भाजीसाठी वापरता येतात.
- या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच हंगामात दोन बहर घेता येतात. प्रति हेक्टरी सरासरी उत्पादन 80 ते 100 क्विंटल मिळते.
- अर्का जय- ही झाडे झुडूप वजन असून 70 सेंटिमीटर पर्यंत वाढतात. शेंगा हिरव्या रंगाच्या असून शेंगांची लांबी दहा ते बारा सेंटीमीटर असते. प्रति हेक्टरी सरासरी उत्पादन 80 ते 90 क्विंटलपर्यंत मिळते.
- फुले सुरुची- ही झुडूप वजा वाढणारी वालाची जात आहे. शेंगा सरळ, किंचित वाळलेल्या व हिरव्या रंगाच्या तसेच त्याच्या दोन्ही टोकांवर जांभळ्या छटा असतात. खरीप व रब्बी हंगामासाठी चांगली जात आहे. त्याचा कालावधी 70 ते 120 दिवसांचा असतो.या जातीचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 88 क्विंटल मिळते.
Published on: 12 October 2021, 12:53 IST