Agripedia

पावसाचा दीर्घकालीन खंड अथवा अधिकच्या पावसामुळे साचून राहणारे पाणी, यामुळे पिकांची वाढ व उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते. अशावेळी पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, उत्पादन वाढीसाठी तसेच सुधारित रुंद वरंबा सरी लागवड पद्धत फायदेशीर ठरते.

Updated on 28 March, 2021 6:52 PM IST

पावसाचा दीर्घकालीन खंड अथवा अधिकच्या पावसामुळे साचून राहणारे पाणी, यामुळे पिकांची वाढ व उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते. अशावेळी पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, उत्पादन वाढीसाठी तसेच सुधारित रुंद वरंबा सरी लागवड पद्धत फायदेशीर ठरते.

या पद्धतीत सोयाबीनच्या ३ अथवा ४ ओळी आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूंना सरी यामुळे कमी पावसाच्या काळात, मूलस्थानी जलसंवर्धन आणि अधिक पावसाच्या काळात अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. ओलावा जास्त काळ टिकून राहतो, उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

सोयाबीन लागवडीसाठीबीबीएफ यंत्र त्याची वैशिष्ट्ये :-

सोयाबीनची ‘बीबीएफ’ पद्धतीने लागवड करण्यासाठी केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था (क्रीडा), हैदराबाद व सोयाबीन संशोधन संचालनालय, इंदोर यांनी ‘बीबीएफ’  यंत्र विकसित केले असून त्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

  1. पेरणीची खोली आवश्यकतेनुसार कमी-जास्त करण्याची व्यवस्था या यंत्राला उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  2. यंत्राला पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर कमी जास्त करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  3. विकसित यंत्र बहुपयोगी असून ते खरीप व रबी हंगामातील पिकांची आवश्यकतेनुसार सर्या पाडून पेरणी करण्यासाठी सहजासहजी वापरता येते.

  4. गाळाच्या किंवा चोपण जमिनीमध्ये पाण्याचा पाट पाडण्यासाठी ३० ते ३५ एच.पी.च्या ट्रॅक्टरद्वारे योग्य रित्या वापर करता येतो.

  5. यंत्राद्वारे पाडलेल्या सर्यांमधून पिकाला आवश्यक तेव्हा पाणी देता येते.

  6. आवश्यकते नुसार फणांची संख्या वाढविता येते अथवा कमी करता येते.

  7. यंत्राद्वारे पेरलेले बियाणे लगेच मातीमध्ये झाकले जाईल अशी त्याची रचना करण्यात आली आहे. सदरचे ‘बीबीएफ’ यंत्र ‘सोयाबीन’ संशोधन संचालनालय, खांडवा रोड, इंदोर (म.प्र.) व केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था (क्रीडा), हैदराबाद यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच कृषी विभाग ‘बीबीएफ’ यंत्र सवलतीमध्ये शेतकर्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

रुंद वरंबा सरी पद्धतीचे फायदे :

  1. पावसाचे अतिरिक्त पाणी सऱ्यांमध्ये मुरते.

  2. मूलस्थानी जलसंवर्धन होऊन पिकास, तसेच पुढील हंगामातील पिकास लाभ होतो.

  3. पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात फायदा होतो. त्याची तीव्रता कमी होते.

  4. अधिक पाऊस झाल्यास किंवा अधिकचे पाणी योग्य पद्धतीने निचरा होण्यास बीबीएफ पद्धतीमधील रुंद वरंब्यासोबतच्या दोन्ही बाजूंकडील सऱ्यांमुळे मदत होते.

  5. जमिनीची चांगली मशागत होऊन पेरण्यांसाठी चांगले वरंबे तयार होतात.

  6. गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. त्यामुळे बियाण्याची चांगली उगवण होते. पिकाची पुढील वाढ जोमदारपणे होते.

  7. बीबीएफ यंत्राच्या साह्याने आवश्यक रुंदींचे वरंबे दोन्ही बाजूंनी सऱ्यांसह तयार करणे, पेरणी आणि खते देणे अशी विविध कामे एकाच वेळी होतात.

  8. मजुरांची तसेच ऊर्जेची बचत होते.

  9. बीबीएफ यंत्राने पेरणी करण्याची क्षमता परिस्थितीनुसार सरासरी ५ ते ७ हेक्टर क्षेत्र प्रतिदिन अशी आहे.

  10. बीबीएफ पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीच्या (सपाट वाफे पद्धत) तुलनेत सरासरी २० ते २५ टक्क्यांपर्यंत अधिक जलसंधारण होते.

  11. या सुधारित पद्धतीने लागवड केल्यास २० ते २५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात वाढ मिळू शकते.

  12. अंतरमशागत करणे शक्य होते तसेच उगवणीपूर्व तणनाशकांचा वापर केल्यास प्रभावी तणनियंत्रण होते.

 

रुंद वरंबा सरी यंत्र म्हणजेच बीबीएफ द्वारे आंतरमशागतीचे नियोजन :-

  • रुंद वरंबा सरी पद्धत ही पद्धत अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या तसेच जलसंधारनाच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

  • रुंद वरंबा सरी पद्धत ही विशेषतः भारी तसेच मध्यम ते भारी जमिनीमध्ये अतिशय उपयुक्त आहे. या पद्धतीमध्ये जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळी वरंब्यावर येतील यानुसार नियोजन करून वरंब्याच्या दोन्ही बाजूंना सऱ्या काढण्यात येतात. यासाठी रुंद वरंबा सरी यंत्र म्हणजेच बीबीएफ उपयुक्त आहे.

  • यंत्राच्या मदतीने एकाच वेळी रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे केली जातात.

  • यामध्ये पेरणीचे फण आणि दोन फाळ यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते त्याच बरोबर सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते.

  • 'बीबीएफ, ही पद्धत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते. तसेच अधिक व सततच्या पावसामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने हीपद्धत उपयोगी ठरते. या पद्धतीमुळे २५ टक्के उत्पादनात वाढ दिसून येते तसेच सर्वसाधारणपणे २० ते २७ टक्क्यांपर्यंत जलसंधारण होते.

  • तण नियंत्रणाच्या व आंतरमशागतीच्या दृष्टीने ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्राचा वापर करता येतो. यामध्ये पेरणीचे फण काढून तेथे आंतरमशागत आणि तण नियंत्रणासाठी ‘व्ही` आकाराची पास बसविता येते. हे पास पिकाच्या दोन ओळीमध्ये बसवावे लागतात. तसेच सरीमध्ये वरंबा ठेवून आंतरमशागत होते, याशिवाय स्वतंत्र आंतरमशागत यंत्र वापरता येते. तसेच ट्रॅक्टरचलित आंतरमशागत यंत्राचा वापर आंतरमशागत आणि तण नियंत्रणाच्या दृष्टीने बीबीएफ पद्धतीमध्ये करता येतो, फक्त यासाठी इंग्रजी ‘व्ही` आकाराच्या पास वापराव्यात.

 

  • रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये पिकाच्या ओळीनुसार ‘व्ही` पासची संख्या ठेवता येते. बाजारात सर्वसाधारणपणे तीन ओळींसाठी तीन पास उपलब्ध असलेले अवजार उपलब्ध आहे. पण आपण आपल्या गरजेनुसार पासाची संख्या वाढवू शकतो.

  • ‘व्ही’ आकाराच्या पासमुळे त्या स्वयंचलितपणे स्वच्छ होतात तसेच त्यामध्ये गवत अडकत नाही. कसळ पास वापरल्या तर त्यात गवत अडकते कारण त्या आडव्या असतात आणि यामध्ये गवत अवजारामध्ये थांबवून पास स्वच्छ कराव्या लागतात, परंतू तसे ‘व्ही` आकाराच्या पासमध्ये होत नाही.

  • या अवजारामध्ये सऱ्यांमध्ये फाळ ठेवून आंतरमशागत होते, तसेच सऱ्यामध्ये तणही प्रभावीपणे काढता येते. यामध्ये रुंद वरंब्यावर पिकाच्या किती ओळी आहेत, त्याप्रमाणे व्ही पात्यांची संख्या ठेवता येते. गरजेनुसार असे अवजार बनविता येते.

 

लेखक :

वैष्णवी वि. बहाळे.

शेतीशाळा प्रशिक्षक, (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई )

उपविभाग : अमरावती

ता. भातकुली जि. अमरावती.

 

English Summary: Improved wide sari Varamba method soybean crop cultivation technology
Published on: 28 March 2021, 06:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)