भेंडी पिकावर या किडीची अळी सुरुवातीला झाडाची कोवळी शेंडे पोखरते त्यामुळे असा शेंडा मलूल होऊन खालच्या दिशेने लोंबतो, झुकतो व नंतर वाळतो. एकदा भेंडीच्या झाडाला कळ्या फुले व फळे येण्यास सुरुवात झाल्यावर या किडीची अळी नंतर कळ्या फुले व फळे पोखरते व आत राहून त्यातील पेशी खाते. या किडीची अळी एका कळीवरून दुसऱ्या कळीवर जाऊन नुकसान करू शकते त्यामुळे एक अळी अनेक कळ्या फुले व फळाचे नुकसान करू प्रादुर्भावग्रस्त कळ्या फुले व फळे गळून पडतात. प्रादुर्भावग्रस्त फळे विकृत आकाराची होतात व अशी फळे विकल्या जात नाहीत. साधारणता या किडीच्या अळी अवस्थेची दोन ते तीन आठवड्यात पूर्ण वाढ होऊन नंतर या किडीची अळी जमिनीच्या भेगांमध्ये कोषावस्थेत जाते. या किडीच्या एका वर्षात आठ ते बारा पिढ्या पूर्ण होतात.
(2) भेंडी पिकावरील मावा : भेंडी पिकावरील मावा आकाराने लहान असून रंगाने पिवळसर हिरवा असतो. भेंडी पिकावरील मावा पाने व कोवळ्या भागातून रस शोषण करतो. रस शोषना व्यतिरिक्त भेंडी वरील मावा कीड तिच्या पाठीवर असलेल्या दोन शिंगा द्वारे मधासारखा गोड व चिकट पदार्थ पानावर सोडत असल्यामुळे त्यावर काळा बुरशीची वाढ होते त्यामुळे भेंडी पिकात प्रकाश संश्लेषण क्रिया बाधित होऊन झाडाची वाढ खुंटते व परिणामी उत्पादनात घट येऊ शकते. भेंडी पिकावरील मावा ही कीड विषाणूजन्य रोगाच्या प्रसारास कारणीभूत ठरते.
(3) तुडतुडे : भेंडी पिकावरील तुडतुडे फिक्कट हिरव्या रंगाचे असून या किडीची अंडी निमुळत्या आकाराची लांबट आणि फिक्कट पिवळसर रंगाची असतात. अंडी अवस्था साधारणत चार ते दहा दिवसांची असते.या किडीची पिल्ले अवस्था पांढुरके फिक्कट हिरवट असून ही पिल्ले तिरपी चालतात.पूर्ण वाढ झालेले तुडतुडे पाचरीच्या आकाराचे व साधारण दोन मी. मी.लांब असतात. उडत उडत उद्याचा रंग फिक्कट हिरवा असून समोरच्या पंखावरील वरच्या भागात एक एक काळा ठिपका असतो. तुडतुडेयाची पिल्ले साधारणता 7 ते 21 दिवसात प्रौढावस्थेत जातात. प्रौढ तुडतुडे साधारणतः पाच ते आठ आठवडे जगतात. तुडतुड्याचीची पिल्ले व प्रौढ अवस्था सहसा पानाच्या खालच्या पृष्ठभागावर राहून पानाच्या पेशीमधील रस शोषण करते त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त पाने पिवळसर आणि चुरडलेल्या सारखी वाटतात. तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास पाने विटकरी लाल रंगाची कडक आणि चुरडलेल्या सारखी दिसतात. ढगाळ वातावरणामध्ये या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो.
(4) पांढरी माशी : भेंडी पिकावरील पांढऱ्या माशीचे प्रौढ व पिल्ले पानातील रस शोषण करतात त्यामुळे पाने पिवळी पडतात.पांढऱ्या माशीचा तीव्र प्रादुर्भाव झाल्यास भेंडी पिकात 80 ते 90 टक्के नुकसानाची सुद्धा नोंद झालेली आहे. किडीची अंडी नारिंगी रंगाची असून या अंड्यातून तीन ते पाच दिवसात पिल्ले बाहेर पडतात. या पिल्लाची साधारणता 9 ते 14 दिवसांत पूर्ण वाढ होते.नंतर ही पिल्ले कोषावस्थेत जातात व साधारणत दोन ते आठ दिवसाची कोषावस्था असते.पांढऱ्या माशीचे प्रौढ अवस्था साधारणता दोन ते पाच दिवस असते. एका वर्षात पांढऱ्या माशीच्या बारा पिढ्या पूर्ण होऊ शकतात.
(5) भेंडी पिकावरील कोळी : भेंडी पिकावरील कोळी हे अष्टपाद सूक्ष्म प्राणी असून या किडीची पिल्ले व प्रौढ कोळी पानाच्या मागील भागावर जाळे करून पानातील रस शोषण करतात त्यामुळे पानावर असंख्य पिवळे ठिपके पडतात. नंतर अशी प्रादुर्भावग्रस्त पाने हळू हळू वाळतात, आकसतात व चुरगाळलेली होतात. प्रौढ कोळी लालसर तपकिरी रंगाचे असून आठ पायाची असतात. या किडीच्या अंडी अवस्थेचा कालावधी साधारणतः चार ते सात दिवसांचा असून. अंडी उगवल्यानंतर फिकट रंगाची अळी बाहेर पडते. ही अळी तीन ते पाच दिवसात पिल्लू अवस्थेत जाते. पिल्लाची अवस्था सहा ते आठ दिवसांची असते. मादी कोळी उन्हाळ्यात सुप्तावस्थेत जातात.
भेंडी पिकावरील महत्त्वाच्या किडी करिता एकात्मिक व्यवस्थापन उपाययोजना
(1) भेंडीवरील विविध किडीच्या सुप्तावस्थेत नाश करण्याकरिता उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी करावी.
(2) भेंडीचे पीक एकसारखे न घेता पिकांची फेरपालट करावी.
(3) भेंडी वरील शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीच्या सनियंत्रणाकरिता एकरी दोन ते तीन कामगंध सापळे भेंडी पिकात लावावे.
(4) भेंडी पिकावरील पांढरी माशीच्या व्यवस्थापनाकरिता प्रति एकरी आठ ते दहा पिवळे चिकट सापळे भेंडी पिकात लावावे.
(5) भेंडी पिकात प्रती एकर पाच ते सहा पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षी थांबे लावावेत
(6) भेंडी पिकात अनावश्यक रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेकी वापर टाळावा तसेच भेंडी पिकातील विविध परभक्षी व परोपजीवीमित्र कीटक उदाहरणार्थ क्रायसोपा, ढाल किडा सिरफीड माशी, ट्रायकोग्रामा गांधील माशी यांचे संवर्धन होऊन हे मित्रकीटक शत्रु किडीच्या व्यवस्थापनासाठी कार्य करू शकतील या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी व उपलब्ध असल्यास भेंडी पिकावरील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळी करिता तसेच घाटे अळी करिता प्रति एकर 20000 ट्रायकोग्रामा चीलोनिस या मित्रकीटकांची अंडी ट्रायकोकार्ड च्या रूपात आणून पानाच्या मागच्या बाजूने कापून स्टेपल करावी म्हणजे अंड्यातून बाहेर पडणारी ट्रायकोग्रामा नावाची मित्र गांधील माशी पतंग वर्गीय कीडीचे अंडी अवस्थेत व्यवस्थापन करण्यासाठी मदत होईल.
(7) शेंडा व फळ पोखरणाऱ्या किडीच्या व इतर किडीच्या प्रतिबंध व व्यवस्थापनाकरिता सुरुवातीच्या अवस्थेत वेळोवेळी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
(8) वर निर्देशित उपाय योजने बरोबर गरजेनुसार शेंडा व फळ पोखरणाऱ्या कीडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर योग्य निदान करून प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन खालील पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची निर्देशीत प्रमाणात गरजेनुसार फवारणी करावी.
Chlorantranilliprole 18.5.SC 2.5 मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Emamectin Benzoate 5 % SG 3 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Lambda cylohathrine 5% EC 5 ते 6 मिली अधिक दहा लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
(9) शेतकरी बंधूंनो भेंडी पिकात मावा, तुडतुडे, फुलकिडे या किडीचा मिश्र प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या बाहेर आढळून आल्यास योग्य निदान करून प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार खालील पैकी कोणत्या एका किटकनाशकाचे निर्देशीत प्रमाणात फवारणी करावी.
Imidachlopride 17.8 % SL 2 मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Thiamethoxam 25 % WG 1 ते 2 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी करावी.
(10) शेतकरी बंधूंनो भेंडी पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या बाहेर आढळून आल्यास वर निर्देशित एकात्मिक व्यवस्थापन योजने बरोबर गरजेनुसार योग्य निदान करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खालील पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची निर्देशीत प्रमाणात फवारणी करावी.
Fenpropathrin 30 % EC 5 ते 6 मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Pyriproxifen 10 % EC 10 मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Pyriproxifen 5 % EC + Fenpropathrin 15 % EC या संयुक्त कीटकनाशकाची 10 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी
(11) शेतकरी बंधूंनो लाल कोळी या अष्टपाद किडीचा प्रादुर्भाव भेंडी पिकात आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या बाहेर आढळून आल्यास योग्य निदान करून प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार खालील पैकी कोणत्याही एका रसायनाची फवारणी निर्देशित प्रमाणात करावी.
Dicofol (डायकोफॉल) 18.50% EC 25 ते 30 मिली अधिक दहा लिटर पाणी
किंवा
Spiromasifen 22.9 % SC 9 ते 10 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका रसायनाची गरजेनुसार योग्य निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरजेनुसार फवारणी करावी.
टीप : (१) वर निर्देशित उपाय योजनेचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित किडीचे योग्य निदान करून प्रत्यक्ष तज्ञाचा सल्ला घेऊन गरजेनुसार वापर करावा.
(२) वर निर्देशित रसायनाच्या फवारण्या करण्यापूर्वी लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करून घ्यावी व रसायने फवारताना लेबल क्लेम शिफारशीप्रमाणेच त्यांचा वापर करावा.
(३) वर निर्देशित रसायने फवारताना अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी व प्रमाण पाळावे.
(४) वर निर्देशित रसायने फवारताना सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा अंगीकार करावा तसेच रसायने फवारल्यानंतर संबंधित पिकात कीडनाशकांचे अंश राहणार नाहीत या दृष्टिकोनातून पीक काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधी लक्षात घ्यावा तसेच कीडनाशकांचे अंश संबंधित पिकात राहणार नाहीत याची संपूर्ण काळजी घ्यावी.
लेखक -राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 07 May 2021, 04:29 IST