राज्यात मोठ्या प्रमाणात भुईमुगाची शेती केली जाते. भुईमुंग तेलबिया पिकांपैकी एक महत्त्वाचे पीक आहे. राज्यात जवळपास सर्वत्र भुईमूग पेरणी केली जाते. अनेक शेतकरी बांधव या पिकातून दर्जेदार उत्पन्न प्राप्त करतात. आज आपण इक्रिसॅट पद्धतीने भुईमूग पेरणी केल्याने कोणकोणते फायदे होतात याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया इक्रिसॅट पद्धतीने भुईमूग पेरणी. इक्रिसॅट पद्धतीस रुंद वाफा पद्धत म्हणून देखील शेतकरी बांधव संबोधत असतात. या पद्धतीने भुईमूग पेरणी करण्यासाठी, जमिनीची योग्य पद्धतीने पूर्व मशागत करून घ्यावी.
त्यानंतर मशागत केलेल्या जमिनीत ट्रॉपिकल्चर या यंत्राने गादी वाफे अर्थात रुंद सरीवाफे तयार करून घ्यावेत. असे वाफे तयार करतांना वाफ्याची जमिनी लगत रुंदी 150 सें.मी. तर वरची रुंदी 120 सें.मी. ठेवण्याची शिफारस केली जाते. वाफ्याची जमिनीपासून उंची 10 ते 15 सें.मी. ठेवावी असे सांगितले जाते. किंवा 1.50 मीटर अंतरावर 30 सें.मी.च्या नांगराने सऱ्या पाडाव्यात. या पद्धतीत 1.20 मीटर रुंदीचे आणि 15 सें.मी. उंचीचे वाफे तयार होतील. अशाप्रकारे तयार केलेल्या वाफ्याची लांबी जमिनीच्या उतारानुसार 40 ते 50 मीटर ठेवावी. हलक्या जमिनीत मधल्या दोन सऱ्यांपर्यंत पाणी पोहचत नाही. अशा वेळेस 90 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून गादी वाफे तयार करावेत. अशा वाफ्यावर 30 x 10 सें.मी. अंतरावर भुईमुगाची टोकण करावी व पाणी द्यावे.
इक्रिसॅट पद्धतीने भुईमूग पेरणी करण्याचे फायदे
गादी वाफ्यावरील जमीन भुसभुशीत राहत असल्याने मुळांची कार्यक्षमता वाढते त्यामुळे भुईमूग पिकाची वाढ अतिशय जोमदार होते, यामुळे भुईमूग पिकाच्या उत्पादनात घसघशीत वाढ होते. जमिनीत पाणी व हवा यांचे प्रमाण संतुलित ठेवता येते, त्यामुळे पिकाची कार्यक्षमता वाढते. पिकास पाण्याचा ताण बसत नाही, तसेच जास्त पाणी दिल्यामुळे सरीतून पाण्याचा निचरा करता येतो. या पद्धतीत तुषार सिंचन प्रणालीचा अवलंब करीत पाणी देणे सोयीस्कर होते.
तसेच इक्रिसॅट पद्धतीने भुईमूग पेरणी केल्यास पाटाने देखील पाणी देता येते. विशेष म्हणजे यासाठी वेगळी रानबांधणी करावी लागत नाही. या पद्धतीत खत व्यवस्थापन करण्यास देखील सोयीचे असते, परिणामी संतुलित खत पिकाला मिळत असते यमुलर पिकात अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे दिसत नाहीत आणि त्यामुळे सहाजिकच पिकाची दर्जेदार वाढ होते आणि पिकाच्या उत्पादनात देखील घसघशीत वृद्धी बघायला मिळते.
Published on: 05 February 2022, 02:51 IST