Agripedia

गहू पिकाची पेरणी करण्यास उशीर झाल्यास योग्य उत्पादन तंत्राचा अंगीकार करून 15 डिसेंबरपर्यंत पेरणी करूनही बऱ्यापैकी गव्हाचे उत्पादन होऊ शकते. 15 डिसेंबर नंतर जसजसा उशीर होत, जाईल तसा-तसा गहू पिकाला थंडीचा कालावधी कमी मिळून उत्पादनात घट संभवू शकते.

Updated on 28 November, 2021 7:31 PM IST

गहू पिकाची पेरणी करण्यास उशीर झाल्यास योग्य उत्पादन तंत्राचा अंगीकार करून 15 डिसेंबरपर्यंत पेरणी करूनही बऱ्यापैकी गव्हाचे उत्पादन होऊ शकते. 15 डिसेंबर नंतर जसजसा उशीर होत, जाईल तसा-तसा गहू पिकाला थंडीचा कालावधी कमी मिळून उत्पादनात घट संभवू शकते.

उशिरा पेरणीसाठी कोणत्या प्रकारचे गहूची लागवड केली पाहिजे याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी दिली आहे. बागायती उशिरा पेरणी करता पीडीकेव्‍ही सरदार (AKAW 4210-6), AKAW 4627, AKAW 381, पूर्णा (AKAW 1071) यासारख्या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. गहू पिकाच्या पीडीकेव्‍ही सरदार (AKAW 4210-6) या वाणाचे अधिक उत्पादन व अधिक मीळकतीसाठी पेरणी 26 नोव्हेंबर ते दोन डिसेंबरच्या दरम्यान करावी अशी शिफारस प्रसारीत करण्यात आली आहे.

यासर्व संबंधित वाणाचे सर्व गुण वैशिष्ट्ये लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार ओलिताची सोय उपलब्धता लक्षात घेऊन योग्य त्या वाणाची तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष सल्ला घेऊन उशिरा बागायती पेरणीसाठी वाणाची निवड केली जाऊ शकते. सर्व संबंधित वाणाचे बियाणे उपलब्ध ते संदर्भात नामांकित शेतकरी बीज उत्पादक कंपन्या, संबंधित कृषी विद्यापीठे, महाबीज किंवा इतर शासन मान्यता प्राप्त बीज उत्पादक कंपन्या किंवा प्रगतिशील शेतकरी यांचेकडे विचारणा करून बियाणे उपलब्ध होऊ, शकते का याबद्दल माहिती आवश्यकतेनुसार घ्यावी.

 

बागायती उशिरा पेरणी करण्यासाठी गहू पिकाकरिता पेरणीसाठी दोन ओळींतील अंतर 15 किंवा 18 सेंटिमीटर ठेवावे. तसेच बागायती उशिरा पेरणीसाठी पेरणी करताना गहू पिकाकरिता साधारणत: प्रति एकर 60 किलो म्हणजेच 150 किलो बी प्रति हेक्टर या प्रमाणात बियाण्याचे प्रमाण ठेवावे. पेरणी करताना बियाणे पाच ते सहा सेंटीमीटरपेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी.
पेरणी करण्यापूर्वी गहू पिकाला प्रथम काजळी किंवा कानिया रोगाच्या प्रतिबंधासाठी Carboxin 37.5 टक्के + Thiram 37.5 टक्के डी.एस.या संयुक्त बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करून घ्यावी. ही रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया झाल्यानंतर साधारणता 15 ते 20 मिनिटानंतर अझोटोबॅक्टर व पीएसबी या जिवाणू खताची 250 ग्रॅम प्रति 10 ते 12 किलो बियाण्यास या प्रमाणात घेऊन बीज प्रक्रिया करून घ्यावी.

बागायती उशिरा पेरणीसाठी गहू पिकाला 80 किलो नत्र अधिक 40 किलो स्फुरद अधिक 40 किलो पालाश प्रती हेक्टर या प्रमाणात अन्नद्रव्यांच्या मात्रा शिफारशी करण्यात आले आहे. या अन्नद्रव्यांच्या मात्रापैकी नत्राची अर्धी मात्रा तसेच संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे उरलेली नत्राची अर्धी मात्रा पहिल्या पाण्याच्या पाळीच्या वेळेस म्हणजे साधारण पेरणीनंतर 18 ते 20 दिवसांनी द्यावी. साधारणपणे या शिफारशी गृहीत धरून एक एकर बागायती उशिरा पेरणी साठीच्या गहू पिकास पेरताना 15 :15 :15 हे रासायनिक खत साधारणता प्रती एकर 100 किलो म्हणजे दोन बॅग व त्यानंतर पहिल्या पाण्याच्या वेळेस साधनाचा 18 ते 20 दिवसांनंतर युरिया या खताची मात्रा प्रती एकर 37 ते 40 किलो या प्रमाणात देता येऊ शकते.

शेतकरी बंधूंनी गहू पिकास एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पतीचा अंगीकार करून माती परीक्षणाच्या आधारावर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या रूपात योग्य त्या शिफारशीत अन्नद्रव्यांच्या मात्रा गहू पिकास जातील या उद्देशाने तसेच आर्थिकदृष्ट्या परवडेल या उद्देशाने योग्य त्या रूपात रासायनिक खताच्या मात्रा द्यावी तसेच असंतुलित खताचा वापर टाळावा. काही कारणास्तव गहू पिकाला मर्यादित पाणीपुरवठा असल्यास हेक्टरी 60 किलो नत्र + 30 किलो स्फुरद प्रति हेक्‍टर पेरणी सोबतच, द्यावे अशी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाची शिफारस आहे.

हेही वाचा : एनआयडीडब्ल्यू -1949 या गव्हाच्या वाणाने भारी बनतील पास्ता, शेवया आणि कुरड्या; गव्हाचे नवे वाण विकसीत

गहू पिकाच्या वाढीच्या नाजूक अवस्थामध्ये पिकास पाण्याचा ताण पडणार नाही या दृष्टिकोनातून साधारणता 20 दिवसांच्या अंतराने गहू पिकास मुकुट मुळे फुटण्याची अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी धरण्याची उशिरा अवस्था, फुलोरा अवस्था, दाण्याची दुधाळ अवस्था, दाण्यात चिकाची अवस्था या गहू पिकाच्या अवस्थेत गहू पिकाला साधारणतः सहा पाणी जमिनीच्या मगदुरानुसार व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दिल्यास अधिक उत्पादन मिळते. जमिनीत ओल पुरेशी नसल्यास पेरणीपूर्वी शेताला पाणी देऊन वाफसा आल्यावर पेरणी करावी.

शेतकरी बंधूंनो काही शेतकर्याजवळ मर्यादित पाणीपुरवठा असल्यास एकच ओलीत उपलब्ध असल्यास पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी, दोन ओलीत उपलब्ध असल्यास 18 ते 20 दिवसांनी व पुन्हा 60 ते 65 दिवसांनी तसेच तीन ओलीत उपलब्ध असल्यास पेरणीनंतर 18 ते 20 दिवसांनी पुन्हा 40 ते 42 दिवसांनी तसेच पुन्हा 60 ते 65 दिवसांनी ओलित करण्याची मर्यादित पाणीपुरवठा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शिफारस आहे. शेतकरी बंधुंनो गहू पिकाला ओलित करताना आपल्या स्वतःच्या जमिनीच्या मगदुरानुसार संवेदनशील अवस्थेत ताण पडणार नाही या अनुषंगाने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ओलिताची व्यवस्थापन करावे.

 

गहू पिकात शेतकरी बांधवांनी पेरणीपासून तीस ते चाळीस दिवसाच्या आत तणाचे प्रमाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. आवश्यकतेनुसार तणनाशकाचा वापर एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शेतातील तनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे गरजेनुसार करावा. पिकात गहू पिकातील खोडकिडी च्या प्रतिबंधासाठी पिकांची फेरपालट, रासायनिक खतांचा संतुलित वापर पीक वाढीच्या अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडू न देणे या या बाबीचा अंगीकार केल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.

गहू पिकात मावा किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास Thimethoxam 25% डब्ल्यू जी दहा ते पंधरा ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 40 मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करावी. गहू पिकात उंदराचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त आमिषांचा वापर करण्याची शिफारस आहे. गहू पिकातील उंदीराच्या व्यवस्थापनासाठी आमिष तयार करण्यासाठी धान्याचा भरडा 49 भाग थोडे गोडेतेल व एक भाग Bromodialon 0.25 टक्के सीबी एकत्र मिसळावे. हे तयार केलेले चमचाभर आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळा जवळ ठेवावे.
शेतकरी बंधूंनो गहू पिकावर पानावरील करपा अथवा तांबेरा या रोगाची लक्षणे आढळल्यास ताबडतोब Mancozeb 75 टक्के डब्ल्यू. पी. 20 ते 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम

English Summary: Important formulas for higher yields if late sowing of wheat in horticultural fields
Published on: 28 November 2021, 07:30 IST