आपल्या आहारामध्ये प्रथिनांना महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील बहुसंख्य लोक शाकाहारी असल्यामुळे प्रथिनांचा पुरवठा त्यांना कडधान्यांमधून किंवा डाळींतून होतो. आपल्या देशातील कडधान्यांचे उत्पादन प्रजेची गरज भागविण्यासाठी पुरेसे नसल्यामुळे कडधान्यांची आयात दरवर्षी परदेशांतून करावी लागते.
भारतात कडधान्यांचे प्रमाण कमी किंवा उत्पादन कमी असण्याचे कारण म्हणजे चांगल्या प्रतीचे कडधान्यांचे बी शेतकऱ्यांना पुरेसे मिळत नाही. उदा. 2004-2005 साली भारतामधील हरभरा लागवडीचे क्षेत्रफळ 67.10 लाख हेक्टर होते आणि उत्पादन 54.7 मे. टन होते. दर हेक्टरी सरासरी हरभर्याचे उत्पादन 815 कि. ग्रॅ. होते. कडधान्यांच्या लागवडीच्या एकूण क्षेत्रफळापैकी सध्या 4 ते 5 टक्के क्षेत्रफळाला चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध आहे. जुन्या जातींच्या बियाणांऐवजी तुरीचे नवीन जातीचे बियाणे 4.8 टक्के क्षेत्रफळासाठीच उपलब्ध आहे आणि हरभरा बियाणे फक्त 2.5 टक्के क्षेत्रफळासाठीच उपलब्ध आहे. चांगल्या प्रतीचे कडधान्यांचे बीजोत्पादन कमी असल्याचे कारण अशा बियाणांसाठी शेतकर्यांची मागणी कमी आहे. त्यामुळे कडधान्यांचे नवीन जातींसंबंधी संशोधन कमी आहे तूर, मूग, हरभरा आणि उडीद या चार कडधान्यांच्या लागवडीखाली एकूण कडधान्यांच्या क्षेत्रफळाच्या 77 टक्के क्षेत्र आणि उत्पादन 75 टक्के आहे. त्यामुळे या चार कडधान्यांच्या उत्पादनावर भर दिला आहे.
कडधान्याच्या बियांची प्रत :
कडधान्याच्या लागवडीत केवळ चांगल्या प्रतीचे बी वापरल्याने कडधान्यांचे उत्पादन 15 ते 20 टक्के वाढते. चांगल्या प्रतीच्या कडधान्याचे पुढील गुणधर्म महत्त्वाचे असतातः भौतिक शुद्धता, आनुवंशिक, शुद्धता बी उगवण्याची टक्केवारी व निरोगी बियाणे वेगवेगळ्या परिस्थितीत बी उगवण्याची टक्केवारी वेगवेगळी असते. म्हणून कडधान्यांच्या संदर्भात बियांचा जोम हा महत्त्वाचा असतो. बियांचा जोम हा जटिल गुणधर्म आहे. याशिवाय बियांची पक्वता बी काढण्याची वेळ आणि मळणीची पद्धत यांचाही बियांच्या प्रतीवर परिणाम होतो.
कडधान्यांचे काही गुणधर्म फायद्याचे आहेत तर काही गुणधर्म हे तोट्याचे आहेत. सामान्यपणे शेंगावर्गीय झाडांची वाढ अमर्यादित होते आणि ही वाढ शेंड्यावरील आणि पानांच्या देठातील डोळ्यांपासून चालू असते. त्याच वेळी फुलधारणा व फळधारणा चालू असते. त्यामुळे झाडाच्या खालच्या भागापासून पक्व बी उपलब्ध असते. त्याच वेळी झाडाच्या शेंड्यावर नवीन फुले असतात. त्यामुळे बियांची काढणी केव्हा करायची याचा निर्णय शेतकर्यालाच घ्यावा लागतो. शेंगांच्या काढणीस उशीर झाला की वाळलेल्या शेंगा फुटून बी वाया जाते (उदा.मूग). बियांची काढणी जर लवकर केली तर हिरव्या बियांचे प्रमाण जास्त असते. असे बी आकसलेले असते. काही पिकांच्या वाळलेल्या शेंगा फुटत नसल्याने सवडीप्रमाणे शेंगांची मळणी करता येते (उदा. उडीद).
कडधान्याच्या बीजोत्पादनाविषयी भारतातील संशोधन :
तुरीचे पीक तयार होण्यासाठी लागणार्या वेळेनुसार तुरीच्या जातींचे वर्गीकरण केले जाते.
- अति लवकर तयार होणार्या जाती- कालावधी 110-115 दिवस, उदा. टीएटी-10
- लवकर तयार होणार्या जाती- कालावधी 135-160 दिवस, उदा. एकटी-8811
- मध्यम उशिरा तयार होणार्या जाती- कालावधी 160 ते 200 दिवस, उदा. बीडीएन-1
- उशिरा तयार होणार्या जाती- कालावधी 200 दिवसांपेक्षा जास्त, उदा. सी-19. तुरीच्या अशा तयार होणार्या जातींमध्ये बियांची घनता आणि बियांचे उत्पादन यांचा सकारात्मक संबंध असतो; पण हा संबंध लवकर व मध्यम मुदतीच्या जातीत आढळत नाही. बियांचा आकार वाढल्यामुळे बियांची उगवण, रोपांचा जोम, विद्युतवाहकता इत्यादी गुणधर्म वाढतात आणि कडक बियांची उगवण कमी होते. तुरीच्या बियांची प्रयोगाशाळेतील उगवण आणि शेतातील उगवण यामध्ये सकारात्मक संबंध असतो. दीर्घ मुदतीचे तुरीचे पीक दर हेक्टरी 200 कि. ग्रॅ. नत्राचा साठा जमिनीमध्ये करते. त्याचा फायदा दुबार पिकाला मिळतो. तुरीच्या संदर्भात अँथेसिसपासून 55 दिवसांनी शेंगेतील दाणे काढणी करण्यास पक्व होतात. शेंगेचा हिरवा रंग पूर्णतः बदलला की ते चिन्ह शरीरक्रियात्मक पक्वतेचे असते.
सालमन रंगाच्या काबुली जातीच्या बियांपेक्षा रंगीत सालीच्या देशी जातीच्या हरभर्याच्या बियांची उगवण जास्त होते. हरभर्याचे बी उगवण्याचा वेग, 100 बियांचे वजन ही हायड्रोजनेज अॅक्टिव्हिटी आणि ए ए टेस्ट यावरून हरभर्याच्या रोपांचा शेतातील जोम समजतो. उत्तम प्रतीचे बियाणे व बियांची उगवण यासाठी हरभरा पिकाच्या काढणीची वेळ महत्त्वाची असते. हरभर्याच्या जातींची शरीरक्रियात्मक पक्वता अँथेसिसपासून 56 दिवसांनी येते.
चवळी व मुगाच्या बियांच्या बाबतीत बी उगवण्याची टक्केवारी, शेतातील रोपांचे अंकुरण, रोपांचा जोम व विद्युतवाहकता हे गुणधर्म महत्त्वाचे आहेत. मुगाच्या 100 बियांचे वजनही महत्त्वाचे असते. की-3 या मुगाच्या जातीच्या पक्वतेचा अभ्यास धर्मलिंगम व बसू यांनी केलेला आहे. मुगाच्या बियांची शरीरक्रियात्मक पक्वता, बियांची उगवण व जोम अँथेसिस पासून 25 दिवसांनी येतो. या वेळी मुगाच्या शेंगांचा हिरवा रंग बदलून हिरवट पिवळा होतो आणि बियांतील ओलावा 18 टक्के असतो. अनेक कडधान्यांच्या बाबतीत शेंगांच्या रंगावरून पिकाची पक्वता समजते. वालाच्या बियांच्या सालीचे पांढरा आणि काळा रंगाप्रमाणे त्या बियांचे शेतातील अंकुरण अनुक्रमे 67 आणि 91 टक्के होते.
उत्तम प्रतीचे बियाणाचे घटक :
- बियांतील ओलावा बियाणे चालू वर्षीच्या काढणीपासून पुढील हंगामातील पेरणीपर्यंत साठवून ठेवावे लागते. बियाणाची प्रत बी साठविण्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते. विशेषतः बियाणांमधील ओलाव्यावर साठवणूक अवलंबून असते. काही बियाणे चांगले वाळविल्याशिवाय साठवण करता येत नाही. याला अपवाद आंबा व अॅव्हाकाडो आहे. कॉफी, रबर, ऑइल, पाम, कोको यांचे बी लवकर मरते. काही कडधान्यांचे बी हे साठविण्या अगोदर त्यातील ओलावा 12 ते 15 टक्के असावा लागतो. कोरडे बी दीर्घकाळ साठवून ठेवता येते. पण कडधान्याचे बी हे अधिक काळ वाळविले तर ठिसूळ बनते आणि हाताळणीत बियांना सहज इजा होते. बियाणातील ओलाव्याचे प्रमाण दर्शविणारे यंत्र महाग असते. म्हणून बी दातांखाली दाबून बियांतील ओलाव्याच्या प्रमाणाची चाचणी करतात. साठविण्यासाठी योग्य बी दातांखाली सापडले न जाता टिचले पाहिजे. कोरडे बी चांगले उगवते आणि रोपाची वाढ चांगली होते. ढोबळमानाने बियांतील ओलावा 1 टक्का कमी केला तर बी अंदाजे दुप्पट काळ साठविता येते. ओले बी बुरशी व किडीसाठी उत्तम खाद्य असते. ओले बी जास्त तापमानात साठविले की त्याची उगवणक्षमता नष्ट होते.
- स्वच्छ बी : बियाणांमध्ये तणाचे बी, खडे, धूळ आणि काडीचे तुकडे व भुस्सा मिसळलेला असतो. आपण बी वजनावर विकत घेतो तेव्हा या बियांतील कचर्यासाठी पैसे मोजावे लागतात. म्हणून स्वच्छ बी विकत घेतले पाहिजे. विशेषतः तृणधान्याचे बी तणांच्या बियांपासून मुक्त असले पाहिजे. शेतात तण वाढू दिले नाहीत तर तणांचे बी आपल्या बियांत मिसळणार नाही.
- बियांची साठवण बियांची उगवणक्षमता कमीत कमी 85 ते 90 टक्के असली पाहिजे. कडधान्यांच्या बियांची उगवणक्षमता कमीत कमी 80 टक्के असली पाहिजे.
- जोम बी उगवण्यासाठी प्रयोगशाळेप्रमाणे शेतामधील परिस्थिती आदर्श नसते. तृणधान्यांचे बी वाळविण्याचे तापमान 25 अंश से.पेक्षा अधिक नसावे. बी केव्हाही उन्हामध्ये वाळवू नये, तर भरपूर प्रकाश असणार्या हवेशील सावलीत वाळवावे. बी वाळविताना वारंवार हलवावे, म्हणजे सर्व बी समान वाळते. बी वाजवीपेक्षा जास्त वाळवू नये. वर निर्देश केलेले ओलाव्याचे प्रमाण असेपर्यंत बी वाळवावे. बियांसाठी कडधान्य पिकाची काढणी करतेवेळी शेतामधील झाडे उपटून गोळा करावीत आणि ती रॅकवर टांगून वाळवावी.
तुरीचा जगातील पहिला संकरित वाण :
1991 साली इक्रिसॅट या संस्थेने तुरीचा जगातील पहिला संकरित वाण तयार केला. या संकरित वाणाच्या तंत्रामध्ये दोन सर्वांत महत्त्वाच्या बाबींचा समावेश होतो. जास्त उत्पादनासाठी संकर जोम आणि आवश्यक ती ओळींची पैदास लागवडीच्या तुरीच्या जंगली प्रजातीच्या कॅनायनस कॅलानीफोलियसपासून सायटोप्लास्मिक मेल-स्टराइल वाण संकरासाठी तयार करण्यात आला. पैदासकर- सध्या या तंत्राचा उपयोग करून तुरीचे स्थिर संकरित वाण निर्माण करत आहेत. या तुरीच्या संकरित वाणाचे प्रति हेक्टर उत्पन्न 3 मे. टन आहे, म्हणजे सध्याच्या कोणत्याही सुधारित तुरीच्या जातीपेक्षा अधिक आहे. या तुरीच्या संकरित वाणाचे नाव आहे ‘आयसी पीएच-8’. प्रचलित सुधारित तुरीच्या जातीपेक्षा या संकरित वाणाचे उत्पन्न जवळजवळ दुप्पट आहे. बीजोत्पादनासाठी मजूर कमी लागतात आणि हा संकरित वाण अवर्षण सहन करणारा आहे.
भारतामधील गरीब जनतेच्या रोजच्या आहारात तुरीच्या डाळीचा बर्याच प्रमाणात समावेश असतो. कोट्यवधी लोकांना तुरीच्या डाळीपासून स्वस्त प्रथिनांचा पुरवठा होतो. परंतु सध्या तुरीच्या डाळीचे बाजारभाव इतके वाढले आहेत की सामान्य माणसाला ते परवडणारे नाहीत. याचा फायदा लहान शेतकर्यांना मिळू शकतो. स्वतःच्या कुटुंबाची गरज भागवून त्याला बाजारात तुरीची विक्री करता येते.
तुरीच्या संकरित बीजोत्पादनात सध्याच्या लागवडीच्या जातीचा तुरीचा रानटी जातीशी संकर करतात आणि तुरीची नपुसक जात तयार करतात. या नपुसक जातीचा संकर प्रचलित जातीशी करतात.
तुरीच्या संकरित वाणाच्या बियाणाचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि त्या वाणाच्या प्रतीमध्ये सुधारणा करण्यासाठी संकरित बीजोत्सापदनातील खालील बाबी समजणे आवश्यक आहे -
- पिकातील नपुसक झाडे काडून टाकण्याची योग्य वेळ
2.भेसळ टाळण्यासाठी तशी संपूर्ण झाडे काढून टाकणे
3.मातापित्यांची राखण.
4.झाडाचे गुणोत्तर.
5.मधमाश्यांची चांगली संख्या, जेणेकरून पुरेसे परागीकरण होते.
6.विलगीकरणाचे अंतर (200 मीटरपेक्षा अधिक).
7.बीजोत्पादन पिकाचा खोडवा.
कडधान्याच्या नवीन सुधारित जाती : भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने 16 सप्टेंबर 2005 रोजी मान्यता दिलेल्या कडधान्याच्या सहा नवीन सुधारित जाती खालीलप्रमाणे आहेत.
हरभरा- बीजीएम 547 : या जातीचे संशोधन भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे झाले असून या जातीच्या लागवडीची शिफारस वायव्य भारतातील मैदानी प्रदेशासाठी केली आहे. उशिरा पेरणीसाठी ही जात योग्य आहे. म्युटेशन ब्रीडिंगने ने ही जात तयार केली आहे. दर हेक्टरी 1800 कि.ग्रॅ. हरभरा उत्पन्न मिळते. पिकाची मुदत 135 दिवस असून, ही जात मर, खुज्या (स्टंट) व मूळकुज अशा रोगांना सहनशील आहे. ही जात बागायती व जिरायती लागवडीसाठी योग्य आहे.
हरभरा :
फुले जी 9425 : या जातीचे संशोधन महात्मा फुले कृषी विद्यापीठात झाले आहे. या जातीचे प्रति हेक्टरी 9800 कि. ग्रॅ. हरभर्याचे उत्पन्न मिळते. ही जात मर रोगाला प्रतिकारक असून पिकाची मुदत 130 दिवस आहे. ही जात उशिरा पेरल्या जाणार्या बागायती पिकासाठी योग्य आहे. याआधी म. फुले कृषी विद्यापीठाने विकास, विश्वास, विजय व विशाल या हरभर्याच्या जातींचा प्रसार केला आहे. 1995 साली प्रसारित केलेली ‘विशाल’ ही जात आकर्षक मोठ्या दाण्यांची असून, बागायती पिकाचे दर हेक्टरी 30 ते 35 क्विंटल आणि जिरायती पिकाचे दर हेक्टरी 14 ते 15 क्विंटल बियांचे उत्पन्न मिळते.
मूग : म. फुले कृषी विद्यापीठाने ‘फुले मूग (पीएम-2) ही जात 1989 साली प्रसारित केली. असून या जातीच्या टपोर्या दाण्यांचे उत्पादन प्रति हेक्टर 10 ते 12 क्विंटल मिळते. या जातीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात करता येते.
उडीद : सन 1992 उडदाची ‘टीपीयू-4’ ही जात प्रसारित केली. या जातीचे प्रति हेक्टर 11 ते 12 क्विंटल उत्पन्न मिळते. शिवाय 2000 साली ‘फुले जी-95498’ ही हरभर्याची जात, ‘फुले मूग-9339’ ही मुगाची जात आणि ‘एसीपीआर-90040’ ही राजमाची जात प्रसारित केली आहे.
वाटाणा : खझऋऊ-1-10 या कडधान्य वाटाण्याचे संशोधन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्च, कानपूर येथे आहे. ही जात मध्य भारतात आणि उत्तर भारतातील डोंगराळ प्रदेशात लागवडीसाठी योग्य आहे. या जातीचे दर हेक्टरी 2100 कि.ग्रॅ. उत्पन्न मिळते. ही जात भुरी रोगाला प्रतिकारक आहे. पिकाची मुदत 109 दिवस आहे. खरीप पिकानंतर या जातीची रब्बी हंगामात लागवड वेळेवर किंवा उशिरा करता येते.
मसूर : व्हीएल-507 या जातीचे संशोधन विवेकानंद पर्वती कृषी अनुसंधान संस्था अलमोरा येथे झालो आहे. उत्तर प्रदेशात या जातीची लागवडीसाठी शिफारस केली आहे. पिकाची मुदत 179 दिवस आहे. ही जात मर रोगाला प्रतिकारक आहे.
देशी हरभरा : पंजाब-2000 ही देशी हरभर्याची मोठ्या दाण्यांची जात पाकिस्तानमध्ये तयार केलेली आहे.
तूर : आयसीपीएल-87119 (अशा) या जातीचे संशोधन इन्क्रिसॅटमध्ये झाले आहे. ही जात मर आणि स्टरिलिटी मोझॅक रोगांना प्रतिकारक आहे. त्यामुळे कर्नाटकमधील गुलबर्गा व बिदर जिल्ह्यात लागवडीसाठी योग्य आहे.
तूर : आयसीपी-7035 या जातीचे संशोधन इन्क्रिसॅट संस्थेत झाली असून ही जात कडधान्य व भाजीसाठी योग्य आहे. बेंगळुरू येथे या जातीचे दर हेक्टरी 1692.6 कि.ग्रॅ. इतके उत्पादन मिळाले आहे. ही जात स्टरिलिटी मोझॅक रोगाला प्रतिकारक आहे. 100 वाळलेल्या दाण्यांचे वजन 19.2 ग्रॅम आहे आणि 19.6 टक्के प्रथिने आहेत.
काबुली हरभरा : म. फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे ‘विहार’ या जातीचे संशोधन झाले आहे. प्रति हेक्टरी 1811 कि.ग्रॅ. पांढर्या दाण्यांचे उत्पन्न मिळते. 100 बियांचे वजन 34 ते 36 ग्रॅम आहे. पिकाची मुदत 105 ते 115 दिवस आहे. या जातीच्या लागवडीची शिफारस दक्षिण भारतासाठी केली आहे. ही जात मर रोगाला त्याचप्रमाणे घाटेआळ्यांना प्रतिकारक आहे.
काबुली हरभरा : काक-2 या जातीचे संशोधन एनजी रंगा कृषी विद्यापीठामध्ये झाले आहे. ही जात आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील भारी जमिनीत जिरायत लागवडीस योग्य आहे. प्रति हेक्टरी 2.82 मे. टन उत्पन्न मिळते. 900 बियांचे वजन 38.2 ग्रॅम असते.
लेखक :
वैष्णवी वि. बहाळे.
शेतीशाळा प्रशिक्षक, (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई )
उपविभाग : अमरावती
ता. भातकुली जि. अमरावती.
Published on: 19 April 2021, 11:46 IST