Agripedia

कपाशी आणि सोयाबीन पिकांतील महत्त्वाचे काही सूचना आणि सल्ला आपण आज जाणून घेणार आहोत.

Updated on 07 July, 2022 9:02 PM IST

कपाशी आणि सोयाबीन पिकांतील महत्त्वाचे काही सूचना आणि सल्ला आपण आज जाणून घेणार आहोत. जेणेकरून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.कापूस - पाण्याचा ताण किंवा अतिरिक्त पाऊस झाल्यास पीक पिवळे पडू लागते. अशावेळी पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) किंवा १९:१९:१९ हे विद्राव्य खत १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पिकात अतिरिक्त पाणी साचून राहिल्यास मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. तसेच करपा/कवडी या रोगाचा आणि रसशोषक कीडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.मूळकुजव्या रोगाच्या नियंत्रणासाठी, कॉपर

ऑक्‍झिक्‍लोराइड २.५ ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात झाडांच्या बुंध्याशी आळवणी करावी. चर काढून शेतामधून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.करपा/ कवडी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादुर्भाव अधिक असल्यास, डायमेथोएट (३० इसी) १ मिलि किंवा थायमिथोक्‍झाम (२५ डब्ल्यूजी) ०.४ ग्रॅम किंवा फिप्रोनील (५ एससी) २ मिलि किंवा फ्लोनिकॅमिड (५० डब्ल्यूजी) ०.३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

सोयाबीन - वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडींसाठीच्या पूरक वनस्पतींचे नियंत्रण करावे. कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडींसह नायनाट करावा. तंबाखूची पाने खाणारी अळी, केसाळ अळी यांची अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून किडींसह नष्ट करावीत. हिरवी घाटे अळी व तंबाखूची पाने खाणारी अळी यांच्या प्रादुर्भावाची पातळी समजण्यासाठी एकरी दोन कामगंध सापळे शेतात लावावेत. शेतात इंग्रजी ‘T’ अक्षरासारखे पक्षिथांबे लावावेत. सोयाबीनवरील किडींच्या जैविक नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

तंबाखूवरील पाने खाणाऱ्या (स्पोडोप्टेरा लिट्युरा) अळीच्या जैविक नियंत्रणासाठी एसएलएनपीव्ही (५०० एलई) विषाणूजन्य कीटकनाशक २ मिलि प्रतिलिटर पाणी किंवा नोमुरिया रिलाई या बुरशीजन्य कीटकनाशकाची ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव आढळून येताच फवारणी करावी.पाने खाणाऱ्या अळ्या (तंबाखूवरील पाने खाणारी अळी, हिरवी उंट अळी, केसाळ अळी, घाटे अळी) व चक्री भुंगा या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास, प्रोफेनोफॉस (५० इसी) २ मिलि किंवा थायमिथोक्झाम (१२.६%) + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ०.२५ मिलि किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

English Summary: Important agricultural advice - for cotton and soybean crops (7)
Published on: 07 July 2022, 09:02 IST